टपरीवरून चहा आणण्यापासून ते कुलगुरूंच्या समोरच्या भिंतीवरील दिनदर्शिकेचे पान उलटण्यापर्यंतची कामे करणाऱ्या विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बाबतीत विद्यापीठातील प्राधिकरणांचा दृष्टिकोण तुच्छतेचा असल्यानेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती केली जात नसून भरतीचा अनुशेष वाढतच आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळावी यासाठी ५१ उमेदवारांची प्रतीक्षा यादी असतानाही पदे भरली जात नसल्याने विद्यापीठ केव्हा ‘अनुकंपा’ दाखवणार याकडे उमेदवारांचे लक्ष लागले आहे.
नागपूर विद्यापीठात अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीसंबंधात नियम आहेत. त्यात एकूण रिक्त जागांच्या पाच टक्के जागा अनुकंपा तत्त्वावर भरणे आवश्यक आहे. तरीही वर्षांनुवर्षे अनुकंपाची पदे भरली जात नाहीत. विद्यापीठात एक नव्हे तर चार-चार शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संघटना कर्मचाऱ्यांच्या हिताच्या गोष्टी सांगत असतानाही कर्तव्याच्या ठिकाणी मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांची वर्णी विद्यापीठ सेवेत लागू शकलेली नाही. विद्यापीठाने गेल्या २० वर्षांत अनुकंपा तत्त्वावर केवळ ६२ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे भरली गेली आणि २०१३-१४पर्यंत एकूण ५१ उमेदवारांना अनुकंपा तत्त्वावर नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत.
नागपूर विद्यापीठाने दोन वर्षांपूर्वी ५३ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी जाहिरात दिली. ती परिनियमांच्या जंजाळात अडकून बसली. व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. बबन तायवाडे म्हणतात जुन्या जाहिरातीनुसार शिक्षकेतर पदे भरायची तर डॉ. डी.के. अग्रवाल म्हणतात, नवीन जाहिरातीनुसार ती पदे भरायची. मात्र, या वादामध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे भरली जात नसून अनुकंपा तत्त्वावरही पदे भरली जात नाहीत. जाहिरातींवर लाखो रुपयांचा खर्च करून पदे भरण्यापेक्षा अनुकंपा तत्त्वावर ती का भरली जात नाहीत, हा प्रश्नही यानिमित्त उपस्थित होतो.
यासंदर्भात विद्यापीठाच्या सिनेटचे सदस्य सुरेश पाटील म्हणाले, शासन निर्णयानुसार अनुकंपा तत्त्वावर पाच टक्के शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे आवश्यक आहे. जाहिराती देऊन बाहेरच्या लोकांच्या नियुक्तया केल्या जातात मात्र, अनुकंपाच्या जागा भरल्या जात नाहीत. बाहेरील लोकांना सामावून घेण्यापेक्षा ज्यांना गरज आहे आणि ज्यांचा हक्क आहे, अशा ५१ पैकी २८ उमेदवारांना विद्यापीठाने ताबडतोब सेवेत घेणे गरजेचे आहे. कारण दहा-दहा वर्षांपासून ते विद्यापीठात नोकरी मिळेल, या आशेवर आहेत. एकदा वय निघून गेल्यानंतर त्यांना कोठेही काम करणे शक्य होणार नाही. मात्र, विद्यापीठ अनुकंपाच्या उमेदवारांबद्दल सापत्न भाव ठेवून त्यांना सेवेत रूजू करून घेत नसल्याची खंत पाटील यांनी व्यक्त केली. जाहिराती देवून नव्याने नियुक्तया करण्यापेक्षा जाहिरातीचा खर्च वाचवून अनुकंपात नियुक्तया करून विद्यापीठ प्रशासनावरील ताण हलका करण्याची मागणी पाटील यांनी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा