विधिसभा सुरू असतानाच भाजयुमोचे कार्यकर्ते व विद्यार्थी घोषणा देत दीक्षांत सभागृहापर्यंत धडकल्याने पोलीस तसेच विद्यापीठ कर्मचाऱ्यांची सोमवारी दुपारी चांगलीच धावाधाव झाली. तासाभरानंतर प्र-कुलगुरूंनी शिष्टमंडळाशी चर्चा करून परीक्षा लांबणार नसल्याचे आश्वासन दिले.
प्राध्यापकांनी ऐन परीक्षेच्या तोंडावर आंदोलन पुकारल्याने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने उन्हाळी परीक्षा पुढे ढकलल्या. त्यामुळे विद्यार्थी संतप्त झाले. त्यातच आज विधिसभा होती. दीक्षांत सभागृहात कामकाज सुरू असतानाच साडेबारा वाजताच्या सुमारास भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते विद्यार्थ्यांसह विद्यापीठात शिरले. ते दिसताच विद्यापीठ कर्मचाऱ्यांची धावाधाव झाली. दीक्षांत सभागृहाच्या पूर्वेकडील दाराजवळ उभ्या कर्मचाऱ्यांनी दार लगेचच लावून घेतले. इतर तीनही दारे तातडीने लावून घेण्यात आली. या परिसरात यावेळी पोलिसांचा अत्यल्प बंदोबस्त होता. त्यांचीही धावाधाव झाली. तैनात पोलिसांनी लगेचच नियंत्रण कक्षाला सूचना देत अतिरिक्त पथक पाठविण्याची सूचना केली.
ही सूचना ऐकताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक जोशी यांच्यासह सीताबर्डी तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजरत्न बन्सोड यांच्यासह सदर पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. तोपर्यंत भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी दाराजवळ ठाण मांडून विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधात घोषणा देणे सुरू केले. पोलीस निरीक्षक विवेक जोशी यांनी कार्यकर्त्यांची समजूत घातली. याआधीही कुलगुरू, प्र-कुलगुरू तसेच कुलसचिवांना भेटण्यासाठी वेळ मागितली, मात्र त्यांनी भेटण्यास नकार दिला, असे या कार्यकर्त्यांनी पोलिसांना सांगितले. चर्चेस तयारी दर्शविल्याने पोलिसांनी कुलगुरू, प्र-कुलगुरू तसेच कुलसचिवांना विनंती केली असता प्र-कुलगुरू चर्चेस तयार झाले.
आठ विद्यार्थी व प्र-कुलगुरू महेश येंकी तसेच उपकुलसचिव प्रशांत मोहिते या दोघांनी चर्चा केली. विद्यार्थ्यांचे नुकसान व्हावे, असे विद्यापीठ प्रशासनाला अजिबात वाटत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. ४८ अभ्यासक्रमांच्या परीक्षा पुढे ढकलल्याने दीड लख विद्यार्थ्यांचे नुकसान होणार असल्याचे तसेच विधि तसेच रंपनी सचिव या परीक्षांचे वेळापत्रक सारखेच असल्यानेही नुकसान होईल, याकडे लक्ष वेधण्यात आले. १० ते १४ एप्रिलपासून परीक्षा सुरू करून निकाल वेळेत लावण्याचा प्रयत्न करू, असे प्र-कुलुगुरूंनी आश्वासन दिल्याचे शिवानी दाणी, सुधीर सावरकर, सूरज लोलगे, निधी कामदार या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा