महाऔष्णिक वीज केंद्राला मातीमिश्रित कोळसा पुरवठा व होणारे कोळसा चोरीचे प्रकार बघता सीसीटीव्ही व जीपीएस प्रणालीचा वापर करावा, असे निर्देश केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिले.
वीज केंद्राला मातीमिश्रित कोळसा पुरवठा केल्या प्रकरणी प्रकाश अग्रवाल व त्याचे सहकारी, अशा सहा जणांना दुर्गापूर पोलिसांनी अटक केली आहे. हे प्रकरण गाजत असतांनाच केंद्रीय खते व रसायन मंत्री हंसराज अहिर यांनी वीज केंद्राच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कोळसा चोरी रोखण्यासाठी सीसीटीव्ही व जीपीएस प्रणाचीचा उपयोग करण्याचे निर्देश दिले. २३४० मेगाव्ॉट क्षमतेच्या चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रात वेकोलि, तसेच अन्य ठिकाणाहून आयात केलेला कोळसा वापरला जातो, परंतु येथे मोठय़ा प्रमाणात कोळसा चोरी व मातीमिश्रित कोळसा पुरवठा होत असल्याने ५० टक्के वीजनिर्मिती होत नाही. ती पूर्ण क्षमतेने होत नसल्याने महाजनकोला वर्षांला कोटय़वधीचा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. कंत्राटदार व अधिकाऱ्यांचे संगनमत असल्यामुळेच हे प्रकार धडाक्यात सुरू आहे.
हा संपूर्ण व्यवहार बंद व्हावा त्या दृष्टीने मुख्य अभियंत्यांनी पावले उचलावी, असेही निर्देश अहीर यांनी दिले.
हे विद्युत केंद्र वीजनिर्मितीत मागे व प्रदूषणात समोर आहे. त्यामुळे प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीनेही पावले उचलावी, असेही ते म्हणाले. तसेच खासगी सुरक्षा यंत्रणेऐवजी प्रकल्पग्रस्तांना नोकरीवर घेऊन प्रशिक्षण देण्याची सूचना केली.
प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेण्याचे प्रकरण १९८३ च्या शासन निर्णयाप्रमाणे मार्गी लावण्याचे निर्देश दिले. कंपनीने सामाजिक दायित्व निधीतून प्रकल्पग्रस्तांच्या गावात विकास करावा, विद्युत केंद्रात जे कंत्राटदार ३० वर्षांंपासून आहेत त्यांच्या सोयीच्या अटी व शर्तीनुसार निविदा काढल्या जातात. यात मोठय़ा प्रमाणात चुकीच्या नियतीतून भ्रष्टाचार होत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या धर्तीवर विद्युत नियामक मंडळात ६० लाखापर्यंतची कामे बेरोजगार सिव्हील इंजिनिअर्सना देण्याची कार्यवाही करण्याबाबत सूचना दिल्या. या बैठकीला चंद्रपूर महानगर जिल्हाध्यक्ष विजय राऊत, खुशाल बोंडे, जिल्हा परिषद सदस्य ब्रिजभूषण पाझारे, राहुल सराफ, मुख्य अभियंता आर.पी.बुरडे, उपमुख्य अभियंता सोनी उपस्थित होते.

Story img Loader