अनुसंधान केंद्राच्या श्रेणीवर्धनामुळे ५६८ खाटांचे रुग्णालय सुरू करण्यासह रुग्णालयात पदव्युत्तर शोधन पदवी व अतिविशेषोपचार अभ्यासक्रमाची संस्था सुरू होणार आहे. सध्या बाह्य़ सेवा पुरविण्यात येत आहे. ४९ हजार ६९३ चौरस मीटर जागेवर बांधकाम प्रस्तावित करण्यात आले आहे. विविध विभागासाठी आवश्यक यंत्रसामुग्री, फर्निचर, आदी खरेदी करण्यात येणार आहेत. या परसिरातील सर्वसामान्य रुग्णांना खासगी रुग्णालयाचा आधार न घेता येथे उच्च दर्जाचे उपचार उपलब्ध होणार आहेत.
शहरातील डॉ. बाबासाहेब रुग्णालय व संशोधन केंद्राचे श्रेणीवर्धन करून पदव्युत्तर पदवी आणि विशेषोपचार संस्था सुरू करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने सोमवारी मंजुरी दिल्यामुळे नागपूर शहराची आता मेडिकल हब होण्याच्या मार्गाने वाटचाल सुरू झाली. रोजगार हमी योजना मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी गेल्या ६ वर्षांपासून प्रयत्न चालविले होते. नागपूरची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे येथे उपचारासाठी छत्तीसगड, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश आदी ठिकाणांहून लोक येतात. त्यामुळे रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यांना योग्य आणि आधुनिक वैद्यकीय सुविधा मिळण्याची गरज होती. डॉ. आंबेडकर रुग्णालयाच्या श्रेणी वर्धनामुळे व उपरोक्त अभ्यासामुळे विदर्भ व मध्य भारतात आवश्यक वाटणारी अतिविशेषोपचार वैद्यकीय संशोधनाची व सुविधांची उणीव भरून निघणार आहे. वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात तज्ज्ञ पॅकल्टी उपलब्ध होणार असून याचा फायदा विदर्भातील जनतेसह मध्य भारत आणि आजूबाजूच्या राज्यातील जनतेलाही होणार आहे. डॉ. आंबेडकर यांच्या नावाचे हे वैद्यकीय शिक्षण व सेवा क्षेत्रातील रुग्णालय व संशोधन केंद्र हे मध्य भारतातील पहिले पदव्युत्तर अभ्यासक्रम असलेले रुग्णालय आहे. ५६८ खाटांचे अद्ययावत असे रुग्णालय होणार असून येथे २३ अभ्याक्रम शिकविले जाणार आहेत. बालरोग चिकित्साशास्त्र, औषधवैद्यक शास्त्र, त्वचा व गुप्त रोग, मनोविकृती शास्त्र, बधिरीकरणशास्त्र, अतिविशेषोपचार संशोधन, नाक-कान-घसा शास्त्र, हृदयरोग शल्यचिकित्सा आदी अभ्यासक्रमांचा यात समावेश आहे. इंदोरा, उत्तर नागपूर या केंद्रासाठी पहिल्या ३ वर्षांत अनावर्ती खर्च २०९.९० कोटी कोटी रुपये व आवर्ती रुपये ४७.६२ कोटी रुपये असे एकूण २५७.५२ कोटी रुपये अपेक्षित आहेत. अनुसूचित जाती उपयोजनेतून उपलब्ध होणाऱ्या निधीतून हा खर्च करण्यात येणार आहे. त्यानंतर मान्य झालेल्या या केंद्रामुळे नागपूरचे नाव मेडिकल हब म्हणून निश्चितच घेतले जाणार आहे.