मुख्यमंत्र्यांनी मनात आणलं तर मराठीची दुसरी इंडस्ट्री इथे उभारता येऊ शकेल. इथे कलावंत आहेत, निर्माते आहेत, दिग्दर्शक आहेत आणि मुख्य म्हणजे चित्रीकरणासाठी लागणारं वातावरण इथे आहे. रामोजीच्या तोडीची दुसरी चित्रपटनगरी उभारता येईल, पण त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन जागा उपलब्ध करून द्यायला हवी. ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी त्यांच्या आजोळी मराठी चित्रपटनगरी उभारण्यासाठी लोकसत्ताजवळ व्यक्त केलेली इच्छा आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कधी पूर्ण करतात, हे पाहणे औचित्याचे ठरेल.
मराठी चित्रपटांनी गेल्या काही वर्षांत १५-२० चित्रपटांवरून शंभरी गाठली. अर्थातच नव्या पिढीचासुद्धा यात तितकाच महत्त्वपूर्ण सहभाग असल्याचे मोहन जोशींनी अगदी सहजपणे मान्य केले. साधारपणे ज्येष्ठ कलावंतांकडून नवोदितांची वाहवा किंवा नवोदितांना श्रेय देण्याची मानसिकता अतिशय कमी कलावंतांमध्ये असते. मात्र, जोशींनी रवी जाधव या दिग्दर्शकाच्या उदाहरणातून नवी पिढी मराठीचे रूपडे कसे पालटत आहे आणि मराठीचा आलेख उंचावत आहे, हे अगदी भरभरून सांगितले. मराठीचा प्रेक्षकही वाढला कारण हिंदीच्या तुलनेत नवे विषय त्यांना हाताळायला मिळत आहेत. याचा परिणाम म्हणा किंवा आणखी काही, पण हिंदीतला निर्माता, दिग्दर्शक, कलावंत मराठीकडे वळतो आहे. हिंदीसारखेच मराठी चित्रपटांचे प्रमोशन अलीकडे सर्व शहरांमध्ये व्हायला लागले. त्याचा कितपत फायदा होतो किंवा होत नाही हे सांगता येणार नाही. एवढे मात्र खरे की चित्रपटगृहात जो पहिला रसिकश्रोता वर्ग येऊन जातो, त्याच्या प्रतिक्रियेनंतरच चित्रपटाची खरी स्थिती कळते. रसिक चोखंदळ झालाय हे नक्की कारण चित्रपटाचा दर्जा त्यांच्याकडून सर्वच अंगानी तपासला जातो. म्हणूनच रसिकांसाठी जेवढे चोखंदळ विषय चित्रपटातून हाताळले जातात तेवढेच किंबहूना त्याहूनही अधिक उत्तम दर्जाचे चित्रपट तयार करणारा सुमित्रा भावे, मोकाशे यासारखा वर्ग आपल्याकडे आहे. केवळ हौसेखातर आणि केल्याचे चीज व्हावे म्हणून या मंडळींकडून वेगवेगळया विषयांवरील उत्तमोत्तम चित्रपट तयार होत आहेत. ते रसिकांपर्यंत पोहोचत नाही ही खंत आहे.
मजूर परवडले इतकी वाईट स्थिती आज टीव्हीवर काम करणाऱ्या मालिकांमधील कलावंतांची आहे. मालिकांच्या गुणवत्तेबद्दल तर न बोललेलेच बरे. प्रेक्षकांना आवडतं म्हणून आम्ही ते देतो, असा दावा करणारी मालिकेशी संबंधित प्रत्येक व्यक्ती तद्दन खोटी बोलते. प्रेक्षकांना आवडत नाही, तर प्रेक्षकांवर आपण ते लादतो. पर्याय नसल्यामुळे किंवा घरात असणारी ज्येष्ठ मंडळी ते बघतात आणि टीआरपीच्या नावाखाली ते खपवले जाते. अभ्यास न करता या क्षेत्रात उतरलेल्या तरुणाईकडून आलेले अनुभव मोहन जोशींनी यावेळी सांगितले.
दोन वर्ष झाडीपट्टी रंगभूमीवर काम केल्यानंतर इथल्या रंगभूमीवरचा अनुभव चांगलाच होता. व्यावसायिक नाटकांच्या तुलनेत इथे अभिनयाची दिशा मात्र बदलावी लागते हे वास्तव मोहन जोशींनी मांडले.
प्रचंड पैसा आणि रसिकांचा प्रचंड प्रतिसाद यावर झाडीपट्टी रंगभूमी वाटचाल करीत आहे. मात्र, काही कलावंत इथे निश्चितच चांगले आहेत आणि अशा कलावंतांना हेरूनच आम्ही दरवर्षी त्यांना नाटय़संमेलनाला घेऊन जातो, असे मोहन जोशी म्हणाले.

Story img Loader