केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पॅरामेडिकल अभ्यासक्रमाच्या नव्या केंद्रासाठी जागेची पाहणी केल्यानंतर गेल्या वर्षभरापासून त्या ठिकाणी काम सुरू करण्यात आले नाही. शिवाय या विषयावर एकही बैठक झाली नाही त्यामुळे औरंगाबादला ऐवजी नागपूरला मिळालेल्या या केंद्राबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
केंद्रीय व कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे देशात आठ ठिकाणी पॅरामेडिकल सायन्सेससंदर्भातील प्रादेशिक संस्था सुरू करण्यात येणार असून त्यात प्रारंभी औरंगाबादचा समावेश करण्यात आला होता मात्र तिथे काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे औरंगाबाद ऐवजी नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव समोर आला आणि त्याला मान्यता मिळाली होती. पॅरामेडिकल अभ्यासक्रमासाठी नव्याने टीबी वॉर्ड परिसरातील सहा एकर परिसरात प्रादेशिक केंद्र स्थापन करण्याचे निश्चित होऊन या जागेची पाहणी करण्यासाठी दिल्लीवरून केंद्राची स्वास्थ्य व कुटुंब कल्याण विभागाची पाच सदस्यीय समिती आली होती. या समितीमध्ये केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाच्य अतिरिक्त महासंचालक डॉ. मंगला कोहली, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे सहसंचालक डॉ. एन. आंभोरे, मुख्य आर्किटेक्ट मुकेश बाजपेयी, एच एल एल कंपनीचे प्रतिनिधी अनुराग सालवान यांचा समावेश होता.
समितीने त्या जागेची पाहणी करून शासनाकडे अहवाल देऊन सहा महिन्यात काम सुरू करण्याचे आश्वासन दिले होते मात्र, या प्रकल्पाला मंजुरी आणि पाहणी करून वर्ष होत आले तरी अजूनपर्यंत त्या ठिकाणी काम सुरू करण्यात आले नाही. शिवाय गेल्या वर्षभरात या केंद्रा संदर्भात मेडिकलमध्ये एकही बैठक झाली नसल्याची माहिती सूत्रानी दिली. पॅरामेडिकल केंद्रासाठी केंद्र सरकार ८५ आणि राज्य सरकार १५ टक्के अनुदान देणार होते मात्र, अजूनपर्यंत निधी उपलब्ध करून देण्यात आला नाही. मेडिकलच्या पाच सदस्य समितीने केंद्राच्या समितीला अहवाल दिला होता. परंतु, त्या अहवालाचे काय झाले ते कळले नाही. केंद्र सरकारने देशातील आठ विभागीय केंद्रासाठी एकूण ११,५५५ कोटी ४३ लाख निधी मंजूर केला असून त्यातील नागपूरसाठी ८० कोटी रुपये मंजूर केले आहेत. या केंद्राचा उपयोग गुजरात, आंध्रप्रदेश, गोवा, मध्यप्रदेश, छत्तीसगढ आणि महाराष्ट्र या राज्याला होणार आहे. हे केंद्र मिळविण्यासाठी पुन्हा औरंगाबाद सक्रिय झाले असल्याची माहिती मिळाली.
पॅरामेडिकल अभ्यासक्रमासाठी सुरू करण्यात येणाऱ्या केंद्रासंदर्भात केंद्र सरकारकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. शिवाय मेडिकलमध्ये स्थापन करण्यात आलेल्या समितीने केंद्र सरकारला अहवाल दिला आहे मात्र त्या अहवालावर अजूनपर्यंत चर्चा झाली. नागपूरला पॅरामेडिकल अभ्यासक्रमासाठी केंद्र मिळाले असताना त्याचे काम लवकर सुरू होणे अपेक्षित आहे. केंद्रीय आरोग्य विभाग आणि वैद्यकीय संचालकांशी या विषयावर चर्चा झाली असून दिवाळीनंतर काम सुरू होण्याची शक्यता असल्याचे मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. राजाराम पोवार यांनी सांगितले.
पॅरामेडिकल केंद्र नागपूरच्या हातून पुन्हा निसटण्याची चिन्हे
केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पॅरामेडिकल अभ्यासक्रमाच्या नव्या केंद्रासाठी जागेची पाहणी केल्यानंतर गेल्या वर्षभरापासून त्या ठिकाणी काम सुरू करण्यात आले नाही.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 17-09-2013 at 08:10 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur will loose the paromedical center