मूळचा नागपूरकर असलेला, मात्र गेल्या अनेक वर्षांंपासून पुण्यात स्थायिक झालेला नाटय़, चित्रपट कलावंत आनंद अभ्यंकर यांच्या निधनाने मित्रत्वातील ‘आनंद’ गमावून बसलो आहे, अशा शब्दात आनंदच्या नागपूरच्या सर्वच जुन्या-नव्या सहकाऱ्यांनी दुख व्यक्त केले.
ज्येष्ठ अभिनेते नाना उजवणे म्हणाले, आनंदच्या अपघाताची बातमी कळली आणि धक्का बसला. आनंद मूळचा नागपूरकर असल्यामुळे आम्ही दोघांनी अनेक मालिकांमध्ये सोबत कामे केली. दोन दिवसांपूर्वीच एका नव्या मालिकेसंदर्भात आमचे बोलणेही झाले होते. त्यांची प्रमुख भूमिका असलेली ‘मला सासू हवी’ ही मालिका फार गाजत आहे. संजय सुरकरांनंतर आनंदचे जाणे, आम्हा सर्व नागपूरकर कलावंतांना मोठा धक्का आहे. त्यांच्या निधनाने मित्रत्वातील आनंदच जणू गमावून बसलो आहे.
आनंद अभ्यंकर यांच्या आठवणींना उजाळा देताना अभिनेता सचिन देशपांडे म्हणाला, आनंददादांशी गेल्या काही वर्षांत मालिकांच्या निमित्ताने इतकी जवळीक वाढली की, आम्ही जणू एका कुटुंबातील होऊन गेलो होतो. त्याहीपेक्षा तो नागपूरचा असल्यामुळे त्यांच्याविषयी खूपच आत्मियता होती. ‘सासू मला हवी’ या मालिकेच्या निमित्ताने आनंददादासोबत जवळपास एक ते दीड वर्षांंपासून सोबत काम करीत असताना त्यांनी कधी लहान-मोठा असा भेद कलावंतात केला नाही. खरे तर, आनंद अभ्यंकर यांच्या तुलनेत मी कुठेच नाही, मात्र त्यांनी खूप सांभाळून घेतले. मालिकेत वडिलांची भूमिका करणारे आनंददादा दैनंदिन जीवनातही वडिलांसारखे पाठीशी राहिले. गेल्या दोन वर्षांत तर महिन्यातून २२ दिवस रोज आठ ते दहा तास आम्ही सोबत राहत होते. अतिशय निर्मळ, प्रत्येकावर मनापासून प्रेम करणारा आणि स्वच्छ प्रतिमेचा आनंददादा अचानक काळाच्या पडद्याआड जाणे सहन करूच शकत नाही.
चित्रपट आणि मालिका दिग्दर्शक आशिष उबाळे म्हणाले, आनंद अभ्यंकर हा अष्टपैलू कलावंत होता. कुठलेही काम दिले तरी तो तितक्यात ताकदीने करीत होता. एका श्वासाचं अंतर, किमयागार, अशक्य, कल्याणी, अशा अनेक मालिकेत त्यांनी काम केले. आनंद अभ्यंकर ज्येष्ठ कलावंत असले तरी मोठेपण दाखविले नाही. मित्र म्हणून तो सर्वांसोबत राहत होता. अतिशय दिलदार आणि प्रत्येकाला मित्रत्वाच्या भावनेतून मदत करणारा कलावंत गमावला.
ज्येष्ठ नाटय़ कलावंत मदन गडकरी म्हणाले, आनंद अभ्यंकर यांचे वडील मोरुभाऊ अभ्यंकर यांच्याशी माझे चांगले संबंध होते. नागपूरला अभ्यंकरनगरात राहताना त्यांच्याकडे अनेकदा जात होतो. त्यापूर्वी महालातील राममंदिर गल्लीत राहत होते. आनंदचे प्राथमिक शिक्षण नागपुरातील नूतन भारत शाळेत झाले. त्याची रंगभूमीच्या क्षेत्रातील खरी कारकीर्द पुण्याला सुरू झाली. नागपुरात फारच कमी नाटकात त्याने कामे केली. राज्य नाटय़ स्पर्धेच्या निमित्ताने मुंबईला गेलो असताना ‘आई थोर तुझे उपकार’ या चित्रपटात आनंदसोबत काम केले. नागपूरला आला की, भेट घेतल्याशिवाय जात नव्हता. अतिशय नम्र आणि सच्चा कलावंत म्हणून आनंदने स्वतला घडविले. ऐन उमेदीच्या काळात त्यांच्या कारकीर्दीला चांगले दिवस आले असताना काळाने अशा पद्धतीने ओढून घेणे मनाला पटणारे नाही.
आनंद अभ्यंकर यांचे मित्र प्रभाकर आंबोणे म्हणाले, झाडीपट्टी रंगभूमीचे आनंदला आकर्षण असल्यामुळे एकदा तरी या रंगभूमीवर काम करण्याची इच्छा आनंदने व्यक्त केली होती. त्याप्रमाणे त्याने ‘वंदेमातरम’ या नाटकात झाडीपट्टी रंगभूमीवर काम केले. आनंद नागपूरकर कलावंतांचा चांगला मित्र होता. त्यामुळे त्यांच्या निधनाने एक चांगला कलावंत आम्ही गमावला आहे.
नागपुरी ऋणानुबंधांचा ‘आनंद’ हरवला
मूळचा नागपूरकर असलेला, मात्र गेल्या अनेक वर्षांंपासून पुण्यात स्थायिक झालेला नाटय़, चित्रपट कलावंत आनंद अभ्यंकर यांच्या निधनाने मित्रत्वातील ‘आनंद’ गमावून बसलो आहे, अशा शब्दात आनंदच्या नागपूरच्या सर्वच जुन्या-नव्या सहकाऱ्यांनी दुख व्यक्त केले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 25-12-2012 at 02:24 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpuri anand has lost