मार्स ऑर्बिटर यानाने (मंगळयान) बुधवारी सकाळी यशस्वीपणे मंगळ ग्रहाच्या कक्षेत प्रवेश केला आणि प्रत्येक भारतीयाची मान यावेळी अभिमानाने उंचावली. भारतीय अवकाश संशोधकांचे हे यश पाहण्यासाठी अवघे नागपूरकर आज टीव्हीवर टक लावून बसले होते. प्रवेश करताक्षणीच मोबाईल, व्हॉट्स अ‍ॅपवरून संदेशांची देवाणघेवाण सुरू झाली. सोशल नेटवर्कीगच्या सर्व माध्यमातून आज फक्त आणि फक्त मंगळ मोहीम फत्ते केल्याचे संदेश फिरत होते.
मंगळ मोहिमेत नागपूरकरांसाठी आणखी एक बाब अभिमानाची ठरली. इस्त्रोचेच एक माजी वैज्ञानिक हे नागपूरनिवासी आहेत आणि मंगळाच्या एका क्रेटरला नागपूरच्या एका विज्ञानप्रेमीचे नाव देण्याचे निश्चित झाले आहे. यावेळी या दोघांनीही ‘लोकसत्ता’शी संवाद साधत त्यांचा अनुभव आणि आनंद व्यक्त केला. दरम्यान, याच मंगळ मोहिमेवर मंगळवारला रामण विज्ञान केंद्रात ‘वैज्ञानिकांशी संवाद’ असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
चौकट
मंगळ मोहीम आखण्यापासून तर ती यशस्वी करण्यापर्यंतच्या प्रवासात इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी केलेली अचूक योजना, ती राबवण्यासाठीचे प्रयत्न आणि अनुभवांची जोड यामुळे पहिल्याच प्रयत्नात हे यश प्राप्त करता आले. सुरुवातीपासूनच अनुशासित राहिलेल्या इस्त्रोचे वैज्ञानिकसुद्धा तेवढेच मेहनती आहेत. मी स्वत: इस्त्रोचा एक भाग राहिलो आहे, त्यामुळे या यशाचा मला विशेष अभिमान आहे, असे डॉ. एम.के. तिवारी म्हणाले.
नागपूर निवासी डॉ. एम.के. तिवारी यांनी वैज्ञानिक म्हणून १९७७ मध्ये इस्त्रोत प्रवेश केला. आर्यभट, भास्कर, एसएलव्ही थ्री यासारख्या मोहिमांचा प्रवास मी पाहिलेला आहे. त्यापैकी एसएलव्ही थ्री या मोहिमेत माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलामांसोबत काम करण्याची संधी मिळाली. यानंतर भारतातून अंतराळ मोहिमांची सुरुवात झाली. आज या मोहिमेत सहभागी असलेले काही वैज्ञानिक माझे सहकारी होते आणि त्याचा मला विशेष अभिमानही आहे. अतिशय कमी खर्चात आणि पहिल्याच प्रयत्नात भारताने हे यश साध्य केले. कोटय़वधी किलोमीटरचा प्रवास करून आपल्या ध्येयापर्यंत पोहोचणे इतके सोपे नाही. यापूर्वी रशिया, अमेरिका आणि आणखी एका देशाने ही मोहीम यशस्वी केली, पण त्यासाठी त्यांना एकाहून अधिक प्रयत्न करावे लागले. भारताच्या यशानंतर आता इतर देशांनीसुद्धा त्यांचे सॅटेलाईट भारतातून लाँच करण्याची इच्छा प्रदर्शित केली आहे. भारतासाठी ही निश्चितच अभिमानाची बाब आहे. इस्त्रोचे यश अधिकाधिक उंचावत असल्याचेच हे प्रतीकआहे.
चौकट
मंगळाच्या एका क्रेटरला नागपुरातील एका विज्ञानप्रेमीचे नाव देण्याचे ‘यूडब्ल्यूआयएनजीयू’ या अमेरिकी संस्थेने निश्चित केले आहे, ही आणखी एक अभिमानाची गोष्ट नागपूरकरांसाठी घडली आहे. गेल्या २५ वषार्ंपासून शालेय विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाचा प्रचार आणि प्रसारासाठी सुरेश अग्रवाल काम करीत आहेत. आजदेखील नागपुरात शालेय विद्यार्थ्यांसाठी त्यांनी उत्तर अंबाझरी मार्गावरील सभागृहात मंगळ महोत्सव हे प्रदर्शन आयोजित केले.
‘असोसिएशन फॉर रिसर्च अँड ट्रेनिंग इन बेसिक सायन्स’ या संस्थेचे सुरेश अग्रवाल यांचे नाव आता मंगळावर जाऊन पोहोचले आहे. मुळातच ‘यूडब्ल्यूआयएनजीयू’ ही संस्था जगभरातील शाळांना विज्ञानाच्या अभ्यासासाठी वित्तीय आणि इतर मदत करते. या संस्थेने काही दिवसांपूर्वी मंगळावरच्या हजारो क्रेटरांपैकी काहींना विज्ञानप्रेमी आणि विज्ञानाच्या प्रचार आणि प्रसारासाठी कार्य करणाऱ्याचे नाव देण्याचे जाहीर केले. त्यासाठी त्यांनी प्रस्ताव आमंत्रित केले. वैदर्भीय विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण करणाऱ्या अग्रवाल यांच्या विद्यार्थ्यांच्याच एका समूहाने अग्रवाल यांच्या नावाचा प्रस्ताव पाठवला. त्यामुळे नुकतेच अमेरिकेच्या या संस्थेने प्रमाणपत्र पाठवत एक किलोमीटर क्षेत्रफळाच्या एका क्रेटरला सुरेश अग्रवाल यांचे नाव जाहीर केले आहे. विद्यार्थ्यांवरील नि:स्वार्थ प्रेमाचे हे प्रतीक असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. भारताच्या या यशस्वी मंगळ मोहिमेबद्दल त्यांनी अभिमान व्यक्त केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा