‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ पॉलिटिकल रिसर्च अँड अ‍ॅनालिसिस’ची पाहणी
नागपुरातून आम आदमी पार्टी निवडणूक  लढविणार आहे हे बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे. मोठय़ा प्रमाणात गरीब वस्त्या व झोपडपट्टी असलेल्या भागात या पक्षाबद्दल लोकांना अजिबात माहिती नाही. कष्टकरी व कामकरी असलेल्या झोपडपट्टय़ांमध्ये दूरचित्रवाणी संच असले तरी त्यावर ते फक्त मनोरंजनाचेच कार्यक्रम बघतात. चोवीस तास बातम्या ऐकणे व त्यावरील होणारे चर्चासत्राचे कार्यक्रम पाहणे हे त्यांच्या दैनंदिन जीवनाचाच भागच नाही. त्यामुळेच त्यांना आम आदमी पार्टीबद्दल माहितीच नाही. हा मतदार एकूण मतदारसंख्येच्या चाळीस टक्केच असून नियमितपणे मतदान करणारा आहे. या बाबींकडे राजकीय पक्षांनी दुर्लक्ष करून चालणार नाही. ही बाब जशी आम आदमी पार्टीला लागू होते तशीच ती नरेंद्र मोदींनाही लागू पडते. हाच मुद्दा राष्ट्रीय स्तरावरदेखील कळीचा मुद्दा ठरण्याची शक्यता आहे.
खास प्रतिनिधी, नागपूर
वर्तमान केंद्र व राज्य सरकारच्या कामांवर तसेच नगरसेवकांची जनसंपर्क पद्धती व समस्यांकडे पाहण्याच्या दृष्टीकोनाबाबत नागपूर लोकसभा मतदारसंघातील नागरिकांची नाराजी असल्याचे ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ पॉलिटिकल रिसर्च अँड अ‍ॅनालिसिस’ने केलेल्या नमुना सर्वेक्षणात आढळून आले आहे. नितीन गडकरींना मतदान करण्याची इच्छा ५४ टक्के नागपूरकरांनी व्यक्त केली असून ६५ टक्के लोक महागाईच्या मुद्दय़ावर मतदान करणार आहेत, हे विशेष.  हे निवडणूकपूर्व सर्वेक्षण १८ फेब्रुवारी ते ८ मार्च २०१४ या कालावधीत करण्यात आले. ४ हजार २०० नमुन्यांच्या आधारे निघालेला हा निष्कर्ष असून ते सर्व नियमित मतदार असल्याचा दावा या संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक नरेंद्र जोशी यांनी केला आहे.
एकूण अकरा प्रश्न ४ हजार २०० नागरिकांना विचारण्यात आले. वर्तमान केंद्र सरकारच्या कार्यावर आपण संतुष्ट आहात काय, या प्रश्नावर ८४० जणांनी (२० टक्के) होय तर २ हजार ९८२ जणांनी (७१ टक्के) तर ३७८ जणांनी (९ टक्के) सांगू शकत नसल्याचे उत्तर दिले. वर्तमान राज्य सरकारच्या कार्यावर  आपण संतुष्ट आहात काय, या प्रश्नावर एकूण १ हजार ५० जणांनी (२५ टक्के) होय, २ हजार ५२० जणांनी (६० टक्के) नाही तर ६३० जणांनी (१५ टक्के) सांगू शकत नसल्याचे उत्तर दिले आहे. नागपूर महापालिकेच्या कामावर ५४ टक्के नागपूरकर नाखुश असल्याचे या सर्वेक्षणातून उघड झाले आहे.
या आधी २००९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणूकपूर्व सर्वेक्षणात केंद्र व राज्य सरकारच्या कामावर नागपूर तेवढे नाराज नव्हते. डॉ. मनमोहन सिंग सरकारचे पहिले पर्व लोकांना आवडले होते. दुसरे पर्व लोकांसाठी खूपच क्लेशदायी ठरले आहे. त्याचा राग यंदा लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला नुकसानदायक ठरू शकतो. महापालिकेच्या कामाबाबत नाराजी नसली तरी नगरसेवकांच्या जनसंपर्क पद्धतीवर व समस्येकडे पाहण्याच्या दृष्टीकोनाबाबत लोकांमध्ये नाराजी असल्याचे आढळले. वर्तमान खासदारांच्या जनसंपर्क व कार्य ५९ टक्के लोकांनी संतुष्ट नसल्याचे तर ३१ टक्के लोकांनी संतुष्ट असल्याचे दर्शविले आहे. मागील कालावधीपेक्षा ती वाढली असल्याचे आढळते.  भाजपचे उमेदवार नितीन गडकरी राहणार असल्याचे ८२ टक्के नागपूरकरांनी सांगितले. दहा टक्के लोकांनी माहिती नसल्याचे तर ८ टक्के जणांनी सांगू  शकत नसल्याचे सांगितले. ५४ टक्के लोकांनी गडकरींना, २६ टक्के लोकांनी काँग्रेस, १० टक्के लोकांनी आप तर ७ टक्के लोकांनी बसपाच्या उमेदवाराला मतदान करणार असल्याचे सांगितले. भ्रष्टाचार, महागाई, बेरोजगारी, विजेचे भारनियमन, मिहानकडे दुर्लक्ष यापैकी कुठल्या एका मुद्दय़ावर मतदान करणार, या प्रश्नावर ६५ टक्के जनतेने महागाई, २५ टक्के जनतेने भ्रष्टाचार, १० टक्के जनतेने बेरोजगारी असे उत्तर दिले. भारनियमन व मिहानसंबंधी एकानेही उत्तर दिले नाही. महागाई हा मुद्दा या निवडणुकीत कळीचा ठरला असून तोच निर्णयकही ठरी शकतो. पंतप्रधान म्हणून ४६ टक्के जनतेने नरेंद्र मोदी तर राहूल गांधींना ४१ टक्के जनतेने पसंती दिली आहे. सात टक्के
लोकांनी सागू शकत नसल्याचे म्हटले असून लालकृष्ण अडवाणी यांना चार टक्के तर डॉ. मनमोहन सिंग यांना केवळ दोन टक्के लोकांनी पसंती दिली आहे.

Story img Loader