बाळासाहेब ठाकरे आणि जांबुवंतराव धोटे हे नेते म्हणजे महाराष्ट्रातील एक वेगळेच रसायन असल्याची सतत चर्चा असते. बाळासाहेबांच्या संकट काळातील दिवसात जांबुवंतराव धोटे त्यांच्या मदतीला धावून गेले होते. विदर्भाचा हा शेर मुंबईच्या टायगरच्या इतक्या प्रेमात पडला होता की, आपला फॉरवर्ड ब्लॉक पक्ष सोडून तो टायगरच्या गुहेत जाऊन शिवसनिक झाला होता. त्यामुळे जांबुवंतराव आणि बाळासाहेब यांच्या बऱ्याचवेळा एकत्र बठका होत. धोटे यांना तंबाखू-सिगारेटचा अतिशय राग आहे. तर बाळासाहेबांना पाईपमध्ये तंबाखू पेरून धुराडे सोडण्याचा शौक होता. धोटे यांना आपल्या बाजूला बसून कोणी सिगारेट किंवा चिरूट ओढत आहे हे क्षणभरही सहन होत नाही. माझ्या बाजूला बसायचे असेल तर विडी-सिगारेट-चिरूट आधी विझवा, अशी सूचना जांबुवंतराव हमखास करतात. ती ऐकली गेली नाही तर त्या धुराडे सोडणाऱ्याला धोटेंनी झोडपल्याशिवाय सोडले नाही, अशा सत्यघटनाही आहेत.
धोटे एकदा बाळासाहेबांना ‘सिगारेट विझवा’ असे स्पष्ट शब्दात म्हणाले होते आणि बाळासाहेबांनी लगेच सिगारेट विझविली. धोटे यांनीच सांगितलेला हा किस्सा आहे. बाळासाहेब ठाकरे यांना दारव्हा येथे एका निवडणूक कार्यक्रमात १९९५ साली पत्रकारांनी याच्या सत्यतेबाबत विचारणा केली असता ठाकरे म्हणाले होते, धोटे यांनी अर्धसत्य सांगितले. पूर्ण सत्य असे आहे की, धोटे यांना तुमची विनंती आहे की आदेश आहे ? असे मी उलट विचारले. तेव्हा धोटे यांनी विनंती असल्याचे नम्रपणे सांगितले. धोटेंनी आदेश करून पाहावा, असेही आपण धोटे यांना म्हटले होते. पण धोटे ते समजूतदार असल्याने काही बोलले नाहीत. नंतर मी लगेच सिगारेट विझवली. गंमत अशी की, बाळासाहेबांचा हा किस्सा एका पत्रकाराने धोटे यांना सुनावला तेव्हा बाळासाहेब हे विनोदी आहेत असे सांगून धोटे यांनी ‘जुने जाऊ द्या मरणा लागून, जाळून अथवा पुरूनी टाका’ या कवितेच्या ओळी सांगून विषयाला विराम दिला.