‘नैंनो में सपना, सपनोंमें सजना’ या गाण्याने एके काळी अख्ख्या तरुणाईवर गारूड घातले होते. ‘हिंमतवाला’ या चित्रपटातील या गाण्यावर आणि त्या चित्रपटावर फिदा झालेली एक पिढीच त्या वेळी महाविद्यालयीन शिक्षण घेत होती. त्याच पिढीतील दोन मित्रांनी हा चित्रपट सलग २७ वेळा पाहिला आणि पुढे ‘मोठे’ झाल्यानंतर पुन्हा एकदा हा चित्रपट करण्याचे स्वप्न पाहिले होते. हे दोन मित्र म्हणजे साजिद खान आणि अजय देवगण! तब्बल ३० वर्षांनंतर या दोन मित्रांनी ते स्वप्न प्रत्यक्षात उतरवले आहे.
‘हिंमतवाला’ प्रदर्शित झाला, त्या वेळी आम्ही दोघे मुंबईच्या मिठीबाई महाविद्यालयात शिकत होतो. त्या वेळी चित्रपट पाहणे ही चैनीची गोष्ट होती. मात्र आम्ही पहिल्यांदा ‘हिंमतवाला’ पाहिला आणि अक्षरश: पागल झालो. तो चित्रपट पुन्हा पुन्हा पाहण्याचा छंदच आम्हाला जडला, अशी आठवण साजिद आणि अजय या दोघांनी एका वाहिनीवर मुलाखत देताना सांगितली.
विशेष म्हणजे त्या काळी खिशात पैसे नसूनही या दोघांनी हा चित्रपट सलग २७ वेळा पाहिला. त्यासाठी आम्ही दोघे जुहू चौपाटीवर जाऊन गाणी म्हणून, नाच करून लोकांकडून मोबदला गोळा केला. त्याच वेळी आम्ही दोघांनी ठरवले होते की, पुढे जाऊन आपण ‘कोणीतरी’ बनलो तर हा चित्रपट नक्कीच करायचा, असे ते म्हणाले.
‘हिंमतवाला’ चित्रपटाच्या रिमेकची जुळवाजुळव करण्यासाठी साजिद खानने सुरुवात केल्यानंतर त्याच्या डोळ्यासमोर स्वाभाविकच अजय देवगणचे नाव होते. चित्रपटासाठीचा हा विषय डोक्यात घेऊन आपण अजयकडे गेलो. त्याला सांगितले की, आपल्याला एक चित्रपट करायचा आहे आणि त्यात त्याने काम करावे, अशी आपली इच्छा आहे.
क्षणाचाही विलंब न लावता अजयने ‘कुठला, हिंमतवाला का?’ असे विचारले, असे साजिदने या मुलाखतीत स्पष्ट केले. आता हे दोन्ही मित्र महाविद्यालयीन आयुष्यात बघितलेले आपले स्वप्न मोठय़ा पडद्यावर साकार करत आहेत.