नालेसफाईची ८० टक्के कामे पूर्ण झाल्याचा दावा करत गेल्या काही दिवसांपासून स्वत:ची पाठ थोपटून घेणाऱ्या कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाचे पितळ आता उघडे पडू लागले असून महापालिकेतील विरोधी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमार्फत नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या एका पाहणी दौऱ्यात कल्याण आणि डोंबिवली अशा दोन्ही शहरांमधील नाल्यांमध्ये कचऱ्याचे अक्षरश: ढीग साचल्याचे चित्र दिसून आले. आचारसंहितेच्या काळातही नालेसफाईची कामे झपाटय़ाने केल्याचा दावा प्रशासन करत होते. शहरातील काही मुख्य नाल्यांमधील गाळ उपसण्याचे काम केले गेले असले तरी काही ठिकाणच्या नाल्यांमध्ये अजूनही कचऱ्याचे ढीग दिसून येत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे महापालिकेने केवळ नालेसफाईचा देखावा उभा केला आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
कल्याण-डोंबिवलीतील बहुतांशी मोठे नाले जागोजागी गाळाने भरले आहेत. नालेसफाईच्या कामावर सुमारे १ कोटी ६० लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. गाळ आणि कचऱ्याने भरलेले नाले पाहता हा खर्च नेमका कशावर करण्यात आला, असा सवालही या निमित्ताने उपस्थित होत आहे.  
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असताना तत्पूर्वीच सर्वपक्षीय नगरसेवकांनी नालेसफाईच्या कामांना मंजुरी दिली होती. आचारसंहिता असूनही नालेसफाईची कामे जोमाने सुरू असल्याचा छातीठोक दावा नालेसफाई विभागाकडून करण्यात येत होता. काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विश्वनाथ राणे यांनी पावसाळ्यापूर्वी नालेसफाईच्या कामांची पाहणी करावी म्हणून नुकताच एक दौरा आयोजित केला होता. या वेळी महापालिकेचे काही अभियंतेही उपस्थित होते. कल्याणमधील महालक्ष्मी हॉटेलजवळील जरीमरी नाला, लोकग्राम, काटेमानिवली नाला, डोंबिवलीत कोपर नाला, गांधीनगर नाला, गोपी सिनेमागृहाजवळील नाला कचऱ्याने तुडुंब भरले असल्याचे पाहणी पथकाच्या निदर्शनास आले. या नाल्यांमध्ये उतरण्यासाठी जेथे जागा आहे तेथेच जेसीबीच्या साहाय्याने सफाई करण्यात आली आहे. कोपर नाल्यावर तर कचऱ्याचा थर तयार झाला आहे.
पावसाळ्यात खाडीचे पाणी नाल्यात घुसले तर ते सर्व पाणी कोपर, टेल्कोसवाडी, शास्त्रीनगर भागांत घुसण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. नालेसफाईची कामे निष्काळजीपणे करणाऱ्या ठेकेदारांची देयके रोखणे, या कामावर नियंत्रण ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांची वेतनवाढ रोखणे, या नाल्यांची पुन्हा ठेकेदारांकडून सफाई करून घेण्यात यावी, अशी मागणी पक्षनेते विश्वनाथ राणे यांनी केली आहे. 

Story img Loader