स्पष्टवक्तेपणा, समयसूचकता यासाठी जिल्ह्याला परिचीत असलेले नामदेवराव तोताराम पाटील यांचे गुरूवारी पहाटे आजाराने निधन झाले. त्यांच्यावर नाशिक येथील वोक्हार्ट रुग्णालचात उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, तीन मुली, नऊ नातवंडे, तीन भाऊ व तीन बहिणी असा परिवार आहे.
जिल्ह्यातील राजकारणात आपल्या कर्तृत्वाची छाप उमटविणाऱ्या नामदेव पाटील यांचा जन्म १७ जानेवारी १९३९ रोजी तालुक्यातील मोराणे येथे झाला. पाणलोट विकासाचे महत्व पटवून देताना त्यांनी ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ या संकल्पनेला चालना दिली. १३ जून १९७९ ते २४ ऑक्टोबर १९९७ या कालावधीत १८ वर्षे बिनविरोध सरपंचपदाची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे सांभाळली. मार्केट फेडरेशनचे अध्यक्ष असताना महाराष्ट्रात कांदा खरेदी योजना त्यांनीच राबविली. संचालक काळात ४०० तरुणांना नोकऱ्या व पदोन्नती दिली.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाच एकर जमिनीवर शेतकऱ्यांचा माल, खते साठवणुकीसाठी आठ हजार टन क्षमतेची दोन गोदामे बांधली. सरकारने १९९४-९५ मध्ये अभ्यासासाठी बँकॉक, मलेशिया, सिंगापूर, हाँगकाँग व चीन या देशात त्यांना पाठविले होते. दुपारी मोराणे येथे त्यांच्या शेतातच पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.