टोलविरोधी मनसेच्या आंदोलनात जिल्ह्य़ात २७ ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
जिल्ह्य़ाच्या हद्दीत ४ टोल नाके आहेत. पोलिसांनी नाक्यांच्या परिसरात आधीच मोठा बंदोबस्त तैनात केला होता. हे सर्व नाके नेहमीप्रमाणे सुरू होते. पण आंदोलनामुळे मुख्य रस्त्यांवर वाहतूक तुरळक प्रमाणात होती. जिल्ह्य़ात रास्ता रोको करणाऱ्या ८०० आंदोलकांना ताब्यात घेऊन पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. पोलिसांच्या सूचनेमुळे एस. टी. महामंडळाने दुपारी दोनपर्यंत बाहेरगावी जाणाऱ्या बसगाडय़ा नांदेडातच थांबवून ठेवल्या. सायंकाळनंतर बस वाहतूक सुरू झाल्याचे सांगण्यात आले. जिल्हाप्रमुख प्रकाश मारावार यांच्या नेतृत्वाखाली २०० कार्यकर्त्यांनी आसना नदीवर रास्ता रोको आंदोलन केले. दिवसभरात कोठेही अनुचित प्रकार घडला नाही.
जालन्यात २०० आंदोलक ताब्यात
जिल्ह्य़ात ८-९ ठिकाणी मनसेतर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. पोलिसांनी जिल्हाभरात २०० आंदोलकांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले. तीर्थपुरी व कुंभार पिंपळगाव परिसरात दोन, तर वडिगोद्रीजवळ एका एस. टी. बसवर दगडफेक झाली. या संदर्भात पोलिसांनी गुन्हे नोंदविले.
शहरातील बारवाले महाविद्यालयाजवळील चौफुली, तसेच अंबड चौफुलीवर रास्ता रोको करण्यात आले. अंबड तालुक्यातील शेवगा, वडिगोद्री, भोकरदन, बदनापूर आदी ठिकाणी आंदोलन झाले. आंदोलनादरम्यान ठिकठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. भोकरदन येथे जाफराबाद नाक्यावरील आंदोलकांना पोलिसांनी हुसकावण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी काहीसा गोंधळ उडाला. तेथे सौम्य लाठीमार झाल्याची चर्चा होती. सुदामराव सदाशिवे, सुनील आर्दड, रवी राऊत, सांडूअण्णा पुंगळे, पी. एन. यादव आदी कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. तीन बसवर झालेल्या दगडफेकीचा अपवाद वगळता आंदोलन शांततेत झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
दहा मिनिटांत आंदोलन गुंडाळले!
टोलची वसुली तत्काळ बंद करावी, या मागणीसाठी बुधवारी जिल्हाभर मनसेतर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
शहरात सांजा परिसरातील राष्ट्रीय महामार्गावर माजी जिल्हाध्यक्ष अनिल मंजुळे, उपाध्यक्ष दिनेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सकाळी ११ वाजता आंदोलन झाले. वाहतूक संघटनेचे अध्यक्ष मनुद्दीन पठाण आदींनी आंदोलनास पािठबा दर्शविला. आंदोलनादरम्यान वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्याचे दिसून आले. तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथे राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन झाले. मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे, जिल्हा सचिव अमर परमेश्वर, नळदुर्ग शहराध्यक्ष ज्योतिबा येडगे यांच्यासह २० कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथेही रास्ता रोको करण्यात आले. येणेगूर गावाजवळील टोलनाक्याची मुदत संपूनही केवळ राजकीय आश्रयामुळे या नाक्यावर गेल्या अनेक वर्षांपासून टोलवसुली केली जात होती. पालकमंत्र्यांसह खासदार व दोन आमदारांनीही या प्रकाराकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप जिल्हाध्यक्ष नवगिरे यांनी या वेळी बोलताना केला.
कळंब तालुक्यातील येरमाळा येथील मुख्य चौकात रास्ता रोको करण्यात आले. परंतु हे आंदोलन फुसका बार ठरल्याचा प्रत्यय आला. आंदोलनकत्रे कमी व पोलीस कुमक जास्त हे चित्र येथे होते. पोलिसांनी चोहोबाजूंनी मनसेच्या मोजक्या कार्यकर्त्यांना घेराव घालून जागीच स्तब्ध केले. अवघ्या १० मिनिटांत पोलिसांनी आंदोलन गुंडाळले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा