पृथ्वीराज चव्हाण आपला कार्यकाळ पूर्ण करतील. ते नेहमी चांगले काम करतात. मुख्यमंत्र्यांच्या यशस्वी कारकीर्दीला आपला पूर्ण पाठिंबा, असे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी येथे जाहीरपणे सांगितले. त्यास उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात ‘दाद’ दिली. चव्हाण यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील नेतृत्व बदलाच्या चर्चेला या निमित्ताने पूर्णविराम मिळाल्याचे मानले जाते.
दरम्यान, गेल्या ५ वर्षांत नांदेड शहराचा कायापालट झाला. देशात इतक्या वेगाने विकसित झालेले एकही शहर नसावे. सुंदर-स्वच्छ शहराचे स्वप्न शंकरराव चव्हाण यांनी पाहिले. त्यांच्या पावलावर पाऊल टाकून विकासाचा विक्रम करणारे अशोकराव जात आहेत. त्यांच्या कार्याला तुमची सोबत पाहिजे. सुसंवादातून नांदेड शहराचा अधिक विकास करण्यासाठी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून नांदेडच्या विकासासाठी उभा आहे. आपण अशोकरावांना साथ द्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘सुसंवाद बुद्धिजीवींशी’ कार्यक्रमात बोलताना केले.
शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुद्धिजीवींशी सुसंवाद साधला. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, रोहयो मंत्री नितीन राऊत, पालकमंत्री डी. पी. सावंत, वस्त्रोद्योगमंत्री आरिफ खान (नसीम खान), गृहराज्यमंत्री सतेज पाटील, खासदार भास्करराव पाटील खतगावकर, आमदार ओमप्रकाश पोकर्णा, रावसाहेब अंतापूरकर, माधवराव पाटील जवळगावकर व वसंतराव चव्हाण, महापौर अजयसिंह बिसेन, जि.प. अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर, निरीक्षक शरद रणपिसे, अ‍ॅड्. ललित पाटील आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले की, नांदेड शहराचा जवाहरलाल नेहरू नागरी पुनरूत्थान योजनेत समावेश झाल्यानंतर शहर विकासासाठी २ हजार कोटी निधी मिळाला. पाच वर्षांत शहराचा कायापालट झाला. जाहीरनाम्याची काहीच गरज नाही. पैशाचा योग्य वापर झाल्याने शहराचा कायापालट झाला. एवढय़ा अल्पकाळात देशात एकही शहर विकसित झाले नसावे, ते नांदेडने करून दाखवून दिले. विकासाचा पाया नांदेडने घातला आहे. स्वच्छ, सुंदर शहराचे स्वप्न शंकरराव चव्हाण यांनी पाहिले होते. त्यांच्याच पाऊलावर पाऊल ठेवून अशोकरावांचे काम सुरू आहे.
देशात महाराष्ट्र हे सर्वात श्रीमंत राज्य आहे. गुंतवणूक, निर्यात, दरडोई उत्पन्नात आपला दुसरा क्रमांक येतो. मागास भागाच्या विकासासाठी विजय केळकर समितीची स्थापना करण्यात आली. नांदेडच्या औद्योगिक विकासासाठी रोजगार निर्मिती व पर्यटनासाठी जे काही करता येईल त्यासाठी अशोकरावांच्या पाठीशी मी उभा आहे असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले व काँग्रेस पक्षाच्या हातात बहुमताने सत्ता द्या, असे आवाहन केले. अशोक चव्हाण यांनी विकासाच्या आड काळे ढग जमा झाले आहेत. त्यात विकासाचे विमान अडकू नये यासाठी नांदेडवासीयांनी काँग्रेसला साथ द्यावी असे सांगून सांडपाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी धोरण आखावे तसेच मुंबईच्या धर्तीवर नांदेडमध्ये खासगी पार्किंगसाठी काय करता येईल याची आखणी केली जात आहे. हज यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंना नांदेड विमानतळावरून सोय व्हावी, एक्सपोर्टसाठी विमान लवकर जावे, ‘कार्बो हब’साठी प्रयत्न तसेच जिल्ह्य़ातील पर्यटन विकसित करण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण व्हाव्यात यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
शैक्षणिक संस्थातून बाहेर पडणाऱ्या तरुणांना जिल्ह्य़ात रोजगार मिळावा यासाठी नांदेडमध्ये उद्योग आणण्यासाठी प्रयत्न व्हावेत. मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत भरीव मदत मराठवाडय़ाला द्यावी व ‘बॅकलॉग’ दूर करण्यासाठी प्रयत्न करावेत असे सांगितले. विरोधकांनी विरोधाला विरोध न करता सकारात्मक विकासाची दृष्टी ठेवावी. शहराच्या विकासासाठी बुद्धिजीवींनी संवाद साधला काँग्रेस पक्षाला बहुमत द्यावे असे सांगितले. प्राचार्य लक्ष्मीकांत तांबोळी यांनी वा. रा. कांत (कविवर्य) यांची जन्मशताब्दी करावी, नरहर कुरुंदकरांचे स्मारक व्हावे, मराठवाडा साहित्य परिषदेचे मध्यवर्ती कार्यालय व्हावे अशा सूचना केल्या. डॉ. शिवाजी शिंदे यांनी गोदावरीचे प्रदूषण थांबवावे, भाजी मंडईची समस्या सोडवावी, उड्डाण पुलाखाली फळ विक्रेते व फुल विक्रेत्यांना जागा द्यावी असे सांगितले. अ‍ॅड्. रहेमान सिद्दिकी यांनी बीयूएमएसच्या डॉक्टरांना नोकरीची संधी द्यावी असे सांगितले तर जयप्रकाश फुलोर यांनी लघु उद्योगासाठी कर सवलत व औद्योगिक विकासासाठी जागा देण्याची भूमिका मांडली.
‘अभंग’च्या वतीने संजीव कुलकर्णी यांनी मुख्यमंत्र्यांना समग्र भालेराव ‘खंड दुसरा’ ग्रंथ भेट दिला. मंत्री सावंत यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्रा. विश्वाधर देशमुख यांनी केले.