नांदेड-वाघाळा महापालिका निवडणुकीचे मतदान उद्या (रविवारी) होत आहे. निवडणूक प्रचाराची रणधुमाळी तब्बल १० दिवस चालली. सत्ताधारी काँग्रेसविरोधात आखाडय़ात उतरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस व अन्य प्रमुख पक्षांतर्फे दिग्गज नेते प्रचारास आले, तरी काँग्रेसनेही शेवटच्या टप्प्यात प्रचार यंत्रणेच्या बळावर विरोधकांना तोडीस तोड उत्तर दिले. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या दृष्टीने ही निवडणूक महत्त्वाची मानली जाते.
मनपा निवडणुकीचा जाहीर प्रचार शुक्रवारी सायंकाळी थांबला. तत्पूर्वी काँग्रेस वगळता कोणत्याही पक्षाला मोठय़ा सभेने प्रचाराची सांगता करता आली नाही. दरम्यान, काँग्रेसच्या प्रचारासाठी उद्योगमंत्री नारायण राणे मुंबईहून ‘५३’चा आकडा खिशात ठेवून नांदेडमध्ये डेरेदाखल झाले. एका खासगी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून हा आकडा बाहेर आला होता. तत्पूर्वी पोलीस विभागाकडे गुप्तवार्ता विभागाकडून जो अहवाल आला होता, तो काँग्रेसला निम्म्या जागा मिळतील असे सांगणारा होता. तटस्थ निरीक्षक जागांचा नेमका आकडा सांगत नाहीत. पण मनपात काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळतील, असा दावाही ठामपणे केला जातो.
काँग्रेसने प्रत्येक प्रभागात बाहेरून आलेल्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांना निरीक्षक म्हणून नेमले होते. त्यांना रोजच्या रोज आपले अहवाल द्यावे लागत असत. पक्षाच्या उमेदवारांची स्थिती कमकुवत दिसली तेथे पक्षाच्या नेत्यांनी आवश्यक ते ‘पॅचवर्क’ केल्याचे सांगण्यात आले. पक्षाच्या एका ‘अभ्यासू’ पदाधिकाऱ्याकडे संकलित होत असलेल्या माहितीवरून अर्धशतकी पल्ला पार करता आला नाही तरी पक्षाला ४० ते ४५ जागा मिळतील, असे सांगितले जाते.
दरम्यान, निवडणुकीच्या निमित्ताने शहरातील सट्टेबाजार चांगलाच तेजीत आहे. प्रत्येक प्रभागात कोण येणार? कोण पडणार यावर मोठय़ा रकमांचा सट्टा लावण्यात आला. निवडणुकीत सेना-भाजपाने रिपाइंसह महायुती केली; पण मनपात परिवर्तन घडविण्यासाठी वातावरणनिर्मिती करण्याची क्षमता असतानाही महायुतीला संयुक्त मोठी सभा घेता आली नाही. भाजपाकडे देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार, एकनाथ खडसे, पाशा पटेल असे स्टार प्रचारक होते. पण गोपीनाथ मुंडे यांचा अपवाद वगळता कोणीही आले नाही. ‘राष्ट्रवादी’चे तीन शिलेदार आले, पण सभांमधून कोणालाही फारसा प्रभाव पाडता आला नाही. पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी एकमेव मोठय़ा सभेत हतबलतेचे, राजकीयदृष्टय़ा खचल्याचे प्रदर्शन घडविले. आपल्या किती जागा येणार, हे एकही विरोधी पक्ष ठाम सांगू शकला नाही.
राज्याच्या राजकारणात राजकीयदृष्टय़ा अडचणीत असलेले काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी, पक्षाच्या पहिल्याच मोठय़ा कार्यक्रमात अडचणींना तोंड देण्यास आपण समर्थ आहोत. विरोधकांनी काळजी करू नये, असे ठणकावून सांगितले. निवडणूक काळात स्थानिक व बाहेरून आलेल्या विरोधकांनी चव्हाण यांना ‘लक्ष्य’ करण्याचा प्रयत्न केला. राजकीयदृष्टय़ा उद्विग्न झालेल्या सूर्यकांता पाटील शेवटी माध्यमांवरही घसरल्या. पण आपल्या पक्षाचा या शहरासाठी काय जाहीरनामा आहे, काय संकल्प आहेत, पक्षाने दिलेले उमेदवार कसे सक्षम आहेत हे माध्यमांसमोर खणखणीत सांगायला त्या व त्यांचे सहकारी नेतेही पुढे आले नाहीत. अशोक चव्हाण यांनी पक्षाच्या ८० उमेदवारांसाठी १० दिवसांत २५हून अधिक सभा घेतल्या. प्रत्येक प्रभागावर करडी नजर ठेवून सूक्ष्म नियोजन केले. ही पाश्र्वभूमी लक्षात घेता नांदेडमध्ये मतदार मोठा चमत्कार घडवून ‘घडी’चा गजर करतील किंवा ‘बाण’प्रयोगाने काँग्रेसला सत्तेतून दूर लोटतील, असे वातावरण तयार झाल्याचे दिसत नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा