लोकसभा निवडणुकीसाठी अकोला मतदार संघातून आज काँग्रेसचे नारायणराव गव्हाणकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. हा अर्ज भरतांना अतिउत्साही गव्हाणकरांकडून निवडणूक आचारसंहितेचा भंग झालेला आहे. तुकाराम बीजेचा कार्यक्रम आटोपून लगेच नारायणराव गव्हाणकर जिल्हाधिकारी कार्यालयावर आपल्या अनेक समर्थकांसह मिरवणुकीने गेले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात ही उत्साही मंडळी शिरली व त्यांनी आयोगाच्या नियमांचा भंग केला.
गव्हाणकरांनी आज स्वत तीन अर्ज दाखल केले. त्यात दोन अर्ज अपक्ष म्हणून, तर एक अर्ज काँग्रेसच्या वतीने भरला. निवडणूक जाहीर झाल्यानंतर जिल्हाधिकारी अरुण िशदे यांनी पत्रकार परिषदेत माहिती देतांना सांगितले होते की, कोणत्याही उमेदवारासोबत अर्ज भरताना केवळ पाच जण राहू शकतील व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात त्यांच्याशिवाय अधिक कोणी असणार नाही. मात्र, आज नारायणरावांनी उमेदवारी अर्ज भरला तेव्हा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात त्यांचे अनेक कार्यकत्रे हजर होते. शिवाय, कार्यकर्त्यांच्या हातात काँग्रेसचे झेंडेही होते. या बाबी आचारसंहिता भंग करणाऱ्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाने यावर काय कारवाई केली, हे कळले नाही, पण नंतर कार्यालयाच्या आवाराचे फाटक बंद करण्यात आले होते.
काँग्रेसने जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल यांचे नाव काँग्रेसचा उमेदवार म्हणून घोषित केल्यावर संतापलेल्या नारायणराव गव्हाणकरांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी आता शब्द फिरवल्याचा आरोप करून आपण काँग्रेसच्या वतीने उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे सांगितले होते व त्यानुसार त्यांनी आज त्यांचा उमेदवारी अर्ज भरला.