महात्मा गांधी ग्रामीण विकास रोजगार हमी योजनेत (नरेगा) पाथर्डी तालुक्यात झालेल्या भ्रष्ट्राचाराची चौकशी सुरू झाली असून त्यात प्रत्येक कामावरच्या मजुरांच्या जबाबांचे व्हिडीओ चित्रिकरण करण्यात येणार आहे असे जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार यांनी सांगितले. या योजनासाठी राज्याला नुकताच ४२० कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला असून त्यातून जिल्ह्य़ाच्या वाटय़ाला ४० ते ४५ कोटी रूपये मिळतील असे ते म्हणाले.
नरेगासाठी आता इ-मस्टरची पद्धत संपुर्ण जिल्ह्य़ात सुरू करण्यात आली आहे. त्यात कामाची मागणी केल्या मजुराच्या नावासह कामावर असणाऱ्या सर्व मजुरांची नावे, पत्ते, बँक खाते क्रमांक, कामाचे स्वरूप, किती काळ लागेल अशी सविस्तर माहिती असेल व हजेरीही त्यात रोजच्यारोज नोंदवली जाईल. त्यामुळे यात आता गडबड होणार नाही. पाथर्डी तालुक्यात रस्त्यांच्या सुमारे २० कामांमध्ये गडबड झाल्याच्या तक्रारी आहेत. त्याची माहिती घेण्यात येत आहेत. या सर्व कामांची पाहणी करण्यापासून ते कामावर असणाऱ्या सर्व मजुरांचे जबाब घेण्यापर्यंत बारकाईने चौकशी करण्यात येत आहे असे जिल्हाधिकारी म्हणाले.
जिल्ह्य़ात सध्या ८५० कामांवर ९ हजार ५०० जण काम करत आहेत. येत्या काळात या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन गावनिहाय नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक गावात या योजनेतंर्गत कामे सुरू करता येतील असे नियोजन आहे. त्यामुळे मागणी आहे पण काम सुरू होत नाही अशी स्थिती निर्माण होणारच नाही असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. काही ठिकाणी थकीत रक्कम देणे आहे. त्यात अकुशल कामांचे ८ कोटी व कुशल कामांचे ४ कोटी रूपये देणे आहे, मात्र राज्याला या योजनेतंर्गत केंद्राकडून नुकतेच ४२० कोटी रूपये मंजूर झाले आहेत. जिल्ह्य़ाताला यातून ४० ते ५० कोटी रूपये मिळतील. त्यातून ही थकबाकी देण्यात येईल अशी माहिती डॉ. संजीवकुमार यांनी दिली.
लग्नांमुळे मजुरांची उपस्थिती रोडावली
जिल्हा प्रशासनाने दोन आठवडयांपुर्वी रोजगार हमीच्या कामांवर असणाऱ्या मजुरांची संख्या १० हजार पेक्षा जास्त दिली होती. आज ती ९ हजार ५०० सांगितली. मजुरांच्या संख्येत वाढ होण्याऐवजी घट कशी झाली असे विचारले असता जिल्हाधिकाऱ्यांनी या दोन आठवडय़ात विवाहाचे बरेच मुहुर्त होते त्यामुळे संख्या कमी झाली असावी असा अंदाज व्यक्त करत मात्र आगामी काळात मजुरांच्या संख्येत फार मोठी वाढ होईल हे गृहित धरून तसे नियोजन केले असल्याचे स्पष्ट केले.

Story img Loader