भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या मुंबईतील सभेचा पक्षाला काय फायदा-तोटा व्हायचा तो होईल. पण या सभेसाठी उसळलेल्या गर्दीमुळे सोडलेल्या २५० जादा गाडय़ांपोटी ‘बेस्ट’ला ६७ लाख रुपये अनामत रकमेचा लाभ झाला आणि सभेचा रविवार ‘बेस्ट’साठी घसघशीत फायद्याचाच ठरला.
मुंबईतील महत्त्वाच्या प्रसंगांसाठी ‘बेस्ट’ नेहमीच जादा गाडय़ा सोडत असते. मात्र या जादा गाडय़ांना म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे गेल्या काही प्रसंगांवरून दिसून आले आहे. मात्र, गेल्या रविवारी झालेल्या नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी जादा बसगाडय़ा सोडाव्यात अशी मागणीवजा विनंती मुंबई भाजपतर्फे करण्यात आल्यानंतर ‘बेस्ट’ने २५० जादा बसगाडय़ा सोडण्याचा निर्णय घेतला. या गाडय़ा मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, वांद्रे टर्मिनस, वांद्रे पूर्व, ठाणे (कोपरी) या भागांतून वांद्रे-कुर्ला संकुलाच्या दिशेने सोडण्यात आल्या. त्याशिवाय कुर्ला आणि वांद्रे या स्थानकांदरम्यानही गाडय़ांची सोय करण्यात आली होती. या जादा बसगाडय़ांसाठी ‘बेस्ट’ने आयोजकांकडून ६७ लाख ४१ हजार ६०० रुपये अनामत रक्कम घेतली होती.
‘बेस्ट’च्या या जादा बसगाडय़ा किती वापरण्यात आल्या, त्याचे उत्पन्न किती मिळाले, हे आकडे अद्याप स्पष्ट झालेले नाहीत. त्याचप्रमाणे अनामत रकमेतील काही रक्कम ‘बेस्ट’ला आयोजकांना परत करावी लागणार आहे. हा सगळा विचार करूनही ‘नमो गर्जना’ बेस्टसाठी फायद्याचीच ठरली आहे. या सभेच्या आदल्या रविवारी ‘बेस्ट’ला एकूण २,७९,५६,८५७ रुपये एवढे उत्पन्न मिळाले होते. तर या २५० जादा गाडय़ांचे उत्पन्न सोडून सभेच्या दिवशी ‘बेस्ट’ला २,७१,०२,१९७ रुपये एवढे उत्पन्न मिळाले. हा आकडा गेल्या रविवारच्या तुलनेत कमी असला, तरीही त्यात २५० जादा गाडय़ांचे उत्पन्न जमा केल्यास हा आकडा नक्कीच जास्त आहे.
पण ‘बेस्ट’च्या एकूण उत्पन्नात झालेली साडेआठ लाख रुपयांची घट ही सभेमुळेच असल्याचेही समोर आले आहे. सभेसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन अनेकांनी त्या दिवशी घराबाहेर पडण्याचे टाळले. परिणामी ‘बेस्ट’च्या नियमित प्रवाशांकडून मिळणाऱ्या उत्पन्नात घट झाली. मात्र ‘नमो गर्जने’ने हात दिल्याने ही तूट भरून वर ‘बेस्ट’ला फायदाच झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narendra modi mumbai rally helps out to best in a day