पाठिंब्याच्या विचारावर रामदेवबाबांचे मंथन
देशाच्या राजकारणात चांगले लोक यायला हवेत, यासाठी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत कुणाला पाठिंबा द्यायचा हे ठरविले जाणार असून भाजप वा एनडीए काय करतात, याचा आढावा घेतला जात असल्याचे भारत स्वाभिमान न्यास पतंजली योग समितीचे प्रमुख स्वामी रामदेव यांनी सोमवारी नागपुरात स्पष्ट केले. काँग्रेस हे राष्ट्रीय संकट असल्याची टीकाही त्यांनी केली.
आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने ‘व्यवस्था व सत्ता परिवर्तन तथा राष्ट्र निर्माणमें युवाओकी भागिदारी’ विषयावर संघटनेची कार्यकर्त्यांची महाराष्ट्रव्यापी बैठक सोमवारी नागपुरातील जैन कलार समाज भवनात झाली. त्यापूर्वी स्वामी रामदेव पत्रकारांशी बोलत होते. सध्या दोन व्यक्तींकडे देशाचे लक्ष केंद्रित झाले आहे. एक असा व्यक्ती जो हिमालयातील संकटत अडकून पडेल्यांना मदतीसाठी धावतो आणि एका असा तरुण तो मैत्रिणीसह विदेशात जातो, या शब्दात रामदेव यांनी दोन व्यक्तींची तुलना केली.
नरेंद्र मोदी हे गरिबीतून संघर्ष करीत पुढे आले आहेत व त्यामुळे ते गरिबांचे दु:ख जाणतात. बहुसंख्य व अल्पसंख्य असा भेदभाव करीत नाहीत. अल्पसंख्यांकांचाही त्यांनी सर्वागीण विकास केला आहे. त्यामुळेच ते देशाचे पंतप्रधान व्हावे, असे जनतेलाही वाटते. प्रत्येक बुथवर अकरा तरुण, असे मजबूत संघटन केले जात असल्याचे रामदेव यांनी सांगितले.
काँग्रेस हे राष्ट्रीय संकट असल्याचा आरोप स्वामी रामदेव यांनी केला. देशात सध्या पंतप्रधान आहेत असे वाटतच नाही. ते कळसूत्री बाहुल्यांप्रमाणे आहेत. त्यांचे रोबोटसारखे काम आहे. रिमोट कंट्रोल दुसरा आहे. विदेशातून भारतात गुंतवणूक करणाऱ्यांची यादी जाहीर केली जात नाही. याचाच अर्थ हा पैसा देशातीलच आहे. विदेशात पाठविलेला हाच पैसा गुंतवणुकीच्या नावे भारतात आला आहे. काँग्रेस सरकारला दृरदृष्टी नाही. हे सरकार निष्क्रिय व नपुंसक सरकार असल्याची टीका रामदेव यांनी केली. बिहारमध्ये शनिवारी नरेंद्र मोदी यांनी नितीश सरकारला धडा शिकविण्याचे आवाहन केल्यानंतर तेथे स्फोट झाले, असे म्हणणाऱ्या दिग्विजयसिंह यांना स्फोट कुणी घडवून आणले हे माहिती असावे स्फोट करणाऱ्यांनीच त्यांना सांगितले असावे, असा टोला त्यांनी लगावला.
इशरत जहँाचा संबंध दहशतवाद्यांशी होता की नाही हे सरकारच्या तपास यंत्रणेलाही शोधता आलेले नाही, पण केवळ मोदींना लक्ष्य करण्यासाठी काँग्रेस त्या प्रकरणाचा राजकीय वापर करीत असल्याचा आरोप रामदेव यांनी केला. केजरीवाल यांच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तर देण्यास नकार दिला.

Story img Loader