विदर्भात मोदींची लाट असून  त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीला अभूतपूर्व यश मिळेल, अशीच परिस्थिती विदर्भातील दहाही मतदारसंघात आहे. महागाई आणि भ्रष्टाचारामुळे काँग्रेसला जनता कंटाळली आहे. विदर्भात दहाही जागा जिंकू अशा विश्वास भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
गोंदिया- भंडारा लोकसभा मतदारसंघात मोठय़ा प्रमाणात ईव्हीएम मशीन दोषपूर्ण असून त्यामागे कोण अधिकारी आहेत आणि कोणाच्या सांगण्यावरून हा सर्व प्रकार झाला आहे. याची संपूर्ण चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. भारतीय जनता पक्षाला मिळत असलेला जनतेचा प्रतिसाद बघता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपच्या विरोधात अप्रचार सुरू केला आहे. गोंदिया- भंडारा मतदारसंघातील एका ईव्हीएम मशीनमध्ये क्रमांक ३ चे बटन दाबल्यास पटेल यांच्या नावावर दिवा लागत होता. त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांंनी सर्व मशीनची तपासणी करण्याची मागणी केली असता अशा नऊ ईव्हीएम मशीन आढळून आल्या आहेत. या संदर्भात मुख्य निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे. जोपर्यंत भंडारा- गोंदिया मतदारसंघातील सर्व ईव्हीएममशीनची तपासणी होत नाही. तोपर्यंत या मतदारसंघातील निवडणूक घेऊ नये, अशी मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात पक्षाचे ज्येष्ठ नेते मुख्य निवडणूक आयोगाची भेट घेणार आहेत. एका मशीनच्या सॉफ्टवेअरमध्ये घोळ असू शकतो मात्र अशा नऊ मशीन सापडल्या असून त्यात तोच घोळ आहे.
कोणाच्या सांगण्यावरून हा प्रकार करण्यात आला असेल तर त्यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली. विदर्भातील प्रत्येक मतदारसंघात कार्यकर्ते सजग झाले असून लक्ष ठेवून आहेत. विदर्भातील प्रचार संपला असून सगळीकडे महायुतीला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. दलित आणि अल्पसंख्याकांची मते मिळतील. काँग्रेसने दलित आणि मुस्लिम समाजामध्ये भाजपच्या विरोधात केलेला प्रचार त्यांच्याही लक्षात आला आहे. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात दलित समाजातील लोकांचे समर्थन मिळत आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघात भाजपला चांगली आघाडी मिळेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. यावेळी प्रवक्ता गिरीश व्यास, चंदन गोस्वामी, प्रवीण दटके, संदीप जोशी उपस्थित होते.

Story img Loader