लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री क्षेत्र नृसिंहवाडीला आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून देण्यासाठी आपला प्रयत्न राहील, असे प्रतिपादन गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी शनिवारी श्री क्षेत्र नृसिंहवाडी (ता.शिरोळ) शनिवारी बोलतांना केले. राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत ३ कोटी ८० लाख रूपये खर्च करून नृसिंहवाडी येथे नवीन नळपाणी योजना राबविली जाणार आहे. या योजनेचे भूमिपूजन मंत्री पाटील यांच्याहस्ते झाले. या वेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ आमदार डॉ.सा.रे.पाटील होते.
पाणी योजनेबद्दल बोलतांना मंत्री पाटील म्हणाले,की पाण्याचे उत्तम प्रकारचे नियोजन होईल अशाप्रकारे आपल्याला सतर्कपणे काम करावे लागेल. गावोगावी राष्ट्रीय पेयजल सारख्या चांगल्या योजना राबवाव्या लागतील. याद्वारे २४ तास शुद्ध व मुबलक पाणी उपलब्ध होऊ शकेल. पाण्यासाठी मीटरची सक्ती करण्याचा शासनाने घेतलेला निर्णय योग्य आहे. यामुळे पाण्याचा वापर मर्यादित होऊन वसुली चांगली होण्याबरोबरच पाणी योजनाही सक्षम होणार आहे. लोकसहभाग असल्याशिवाय कोणतीही योजना लोकांना आपलीशी वाटत नाही. याकरिता शासनाने पाणी योजनेसाठी लोकवर्गणी १० टक्के करण्याचा घेतलेला निर्णय समर्थनीय आहे.
१९५१ पासून नृसिंहवाडीशी असलेला आपला ऋणानुबंध स्पष्ट करीत आमदार सा.रे.पाटील म्हणाले,‘‘या गावामध्ये परिपूर्ण तीर्थक्षेत्र विकसित व्हावे, यासाठी माझे सदैव प्रयत्न राहतील. इथले लोक प्रामाणिक असल्याने लोकवर्गणीचा हिस्सा ते निश्चितपणे अदा करतील.’’
जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.दीपक म्हैसेकर यांनी योजनेची तांत्रिक माहिती दिली. तीर्थक्षेत्राच्या या गावी पुढील २५ वर्षांचा वेध घेऊन पाणी योजनेचे नियोजन केले आहे. या तालुक्यातील दोन गावांमध्ये जिल्हा परिषदेमार्फत स्वयंपूर्ण पाणीयोजना राबविणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
स्वागत ग्रामपंचायत सदस्य अशोक पुजारी यांनी केले. प्रास्ताविक पेयजल योजनेचे अध्यक्ष आनंद धनवडे यांनी केले. दत्त देवस्थान समितीचे अध्यक्ष रघुनाथ रूक्के-पुजारी यांनी पाणी योजनेची लोकवर्गणी लवकरच अदा करण्याचे आश्वासन दिले. ग्रामपंचायत सदस्य अरूधंती पुजारी यांनी आभार मानले. कुरूंदवाडचे माजी नगराध्यक्ष जयराम पाटील, अफसर पटेल, डॉ.किरण अनोजे आदी उपस्थित होते. सरपंच राजश्री कांबळे यांच्या समर्थकांची अनुपस्थिती हा चर्चेचा विषय बनला होता.

Story img Loader