ज्येष्ठ नाटय़कर्मी आणि चित्रपट अभिनेते नसिरुद्दीन शाह नागपूरकरांशी तब्बल २७ वर्षांनंतर मुक्त संवाद साधणार आहेत. १९८७ साली सप्तकच्याच व्यासपीठावरून शाह यांनी ‘वेटिंग फॉर गोदो’ हे नाटक नागपुरात सादर केले होते. आता सप्तक आणि छाया दीक्षित वेलफेअर फाऊंडेशनच्या संस्थेने येत्या ९ एप्रिलला हा योग जुळवून आणला आहे. डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात सायंकाळी ७ वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
पद्मश्री, पद्मभूषण, संगीत नाटक अकादमी, या प्रतिष्ठीत सन्मानांसह तीन वेळा अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त करणाऱ्या नसिरुद्दीन शाह यांनी नाटक आणि चित्रपटक्षेत्रातील अनेक पारितोषिके पटकावली आहेत. श्याम बेनेगल यांच्या ‘निशांत’मधून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. भारतीय साहित्य आणि प्रयोगशिलना यांच्याशी इमान राखणारी समांतर चित्रपटांची चळळ खऱ्या अर्थाने त्यांच्या सहभागामुळे बहरली. सकस आणि सशक्त अभिनयाच्या जोरावर मंथन, भूमिका, पार, अर्धसत्य, आक्रोश, मंडी, मिर्च मसालासारखे अनेक दर्जेदार व अविस्मरणीय चित्रपट त्यांनी केले. सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर नेमके बोट ठेवणाऱ्या जाने भी दो यारो, अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यू आता है, मोहन जोशी हाजीर हो, या सारख्या चित्रपटांसाठी ते नेहमीच आठवणीत राहतात. समांतर चित्रपटांसोबत मासूम, उमराव जान, सरफरोश, वेनस्डे यासारख्या व्यावसायिक चित्रपटातूनही त्यांनी उल्लेखनीय भूमिका केल्या. ‘द लिग ऑफ एक्स्ट्राऑर्डनरी जेंटलमेन’ या हॉलीवूडपटातील सीन कॅनरी या जगप्रसिद्ध अभिनेत्यासह केलेली त्यांची कॅप्टन निमोची भूमिका जगभरात वाखाणली गेली. सई परांजपे यांच्या ‘स्पर्श’ या चित्रपटात साकारलेली अंध नायकाची व्यक्तिरेखा भारतीय चित्रपटांच्या इतिहासात अजोड मानली जाते. हिंदी चित्रपटात व्यस्त असूनही रंगभूमीशी असलेली त्यांची नाळ कधीच तुटली नाही. मोटली या त्यांच्या संस्थेद्वारे अनेक नाटकांची निर्मिती करून जगभरात त्यांचे प्रयोग सुरू आहेत.
नाटक, चित्रपट आणि मालिका या सर्वच माध्यमांवर हुकुमत गाजवणारे नसिरुद्दीन शाह अभिनय, नाटक, आत्मचरित्र, अभिनयक्षेत्रातील संघर्ष, समांतर चित्रपटांची चळवळ, अॅक्टिंग स्कुल, सहकलाकार, दिग्दर्शक, हिंदी व्यावसायिक चित्रपटांमधील जुने-नवे प्रवाह आणि जागतिक चित्रपट, अशा विविध विषयांवर रसिकांशी संवाद साधणार आहेत. कार्यक्रमाची संकल्पना अजेय गंपावार यांची असून रूपेश पवार, प्रसन्न वानखेडे आणि संदीप बारस्कर यांचाही त्यात सहभाग आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा