शहरातील अनेक भागांत सध्या गढूळ पाणीपुरवठा होत असल्याने घरोघरी पाणी शुद्ध करणाऱ्या यंत्रणेत मोठय़ा प्रमाणात बिघाड होत असल्याच्या तक्रारी आहेत. पाणी शुद्ध करणाऱ्या यंत्रणेचा (वॉटर प्युरिफायर) वापर करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. संबंधितांच्या यंत्रणेत दोष होत असताना ज्यांच्याकडे अशी काही व्यवस्था नाहीत, त्यांना नाइलाजास्तव गढूळ पाणी पिणे भाग पडले आहे. दुसरीकडे शहरातील पाचही जलशुद्धीकरण प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यरत असून काही अपवादात्मक स्थिती वगळता कुठेही गढूळ पाणी वितरित होत नसल्याचा दावा पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केला आहे.
शहरातील काही भागांत सुरळीत पाणीपुरवठा तर काही भागांत विस्कळीत पाणीपुरवठा या तक्रारी नवीन नाहीत. वारंवार हे प्रश्न उद्भवत असूनही त्यावर कायमस्वरूपी तोडगा अद्याप निघालेला नाही. पाणीपुरवठा व इतर मूलभूत समस्यांबाबत तक्रारींची संख्या वाढत असल्याने महापौर अशोक मुर्तडक यांनी त्यांची सोडवणूक करण्यासाठी खास उपक्रम सुरू केला आहे. त्या अंतर्गत ज्या ज्या भागातून तक्रारी येतील, तिथे पाहणी करून त्या सोडविण्याचा प्रयत्न आहे. शहरवासीयांना भेडसावणारी सध्याची बिकट समस्या आहे ती गढूळ पाण्याची. साधारणत: १८ लाख शहरवासीयांना पालिका पाणी पुरवठा करते. गंगापूर धरणातून थेट जलवाहिनी योजनेद्वारे हे पाणी उचलले जाते. उन्हाळ्यात धरणातील जलसाठा कमी झाल्यावर प्रामुख्याने गढूळ पाण्याची समस्या भेडसावते. परंतु, यंदा ऐन ऑक्टोबर महिन्यात अनेक भागांत गढूळ पाणी येत आहे. त्याचा फटका घरी पाणी शुद्ध करणारी यंत्रणा वापरणाऱ्यांना बसला आहे. दूषित पाण्यामुळे बळावणारे आजार लक्षात घेऊन मध्यम व उच्चमध्यमवर्गीय नागरिकांनी ही यंत्रणा कार्यान्वित केली आहे. पाणी शुद्ध करणाऱ्या यंत्रणेचा वापर करणाऱ्यांना पाणी किती गढूळ आहे याची माहिती यंत्रामार्फत मिळते. गढूळतेमुळे यंत्रातून शुद्ध होऊन बाहेर पडणाऱ्या पाण्याचा वेग मंदावतो अथवा बंदही होतो. यंत्रातील कांडय़ा बाहेर काढल्यास त्या गाळ्याने भरलेल्या आढळतात. या समस्येमुळे यंत्राचा वापर करणाऱ्या नागरिकांची दुरुस्ती दुकानांवर रीघ लागली आहे. दिवसाकाठी १०० ते १२० नागरिक आपली यंत्र घेऊन दुरुस्तीसाठी येत असल्याचे तंत्रज्ञांकडून सांगण्यात आले. पालिकेचे काही जलशुद्धीकरण प्रकल्प बंद असल्याने मागील काही दिवसांपासून ही समस्या भेडसावत असल्याची शंका संबंधित तंत्रज्ञांकडून व्यक्त करण्यात आली.
या संदर्भात पाणीपुरवठा विभागाचे अभियंता व्ही. एन. धनाईत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पाचही जलशुद्धीकरण प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू असल्याचे सांगितले. गंगापूर धरणातून नितळ पाणी उपलब्ध होत असून यामुळे गढूळ पाणीपुरवठय़ाचा काही प्रश्न उद्भवत नसल्याचा दावा त्यांनी केला. काही भागांत जल वाहिनीतील दोष, बांधकामामुळे होणारी खोदकामे, गटारीतून जाणाऱ्या वाहिन्या यामुळे असे घडू शकते. पण, त्याबाबत तक्रारी आल्यास त्याचे तात्काळ निराकरण केले जाते, अशी पुष्टीही त्यांनी जोडली. या स्थितीत अनेकांना ‘वॉटर प्युरिफायर’च्या कांडय़ा स्वच्छ करून अथवा बदली करून शुद्ध पाण्याची व्यवस्था करावी लागत आहे. तथापि, आजही बराच मोठा वर्ग पालिकेच्या नळातून येणाऱ्या पाण्याचा वापर करतो. त्यांच्याकडे पाणी शुद्ध करणारी यंत्रणा नाही. संबंधितांना मात्र गढूळ पाण्याचा जाच सहन करावा लागत आहे. डेंग्यूचे सावट व विविध आजारांनी डोके वर काढले असताना गढूळ पाणीपुरवठा आरोग्याचे वेगळे प्रश्न निर्माण करणारे ठरणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.