महापालिकेकडून होणाऱ्या दुर्लक्षामुळेच शहरात डेंग्यूसह विविध रोगांचा आणि अस्वच्छतेचा फैलाव होत असल्याचा आरोप करून शासनाने पालिका आयुक्तांना उपाययोजना करण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री दिलीप सोपल यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
येथील विश्रामगृहात राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शरद कोशिरे यांच्या नेतृत्वाखाली सोपल यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात शहरातील आरोग्य व अस्वच्छता हे प्रश्न मांडण्यात आले आहेत. महानगरातील आरोग्याचा प्रश्न बिकट झाला आहे. मलेरिया, डेंग्यूसारख्या आजारांनी उग्ररूप धारण केले आहे. राष्ट्रवादीच्या वतीने या समस्यांविषयी अनेक वेळा आयुक्तांना व पालिकेच्या विभागीय अधिकाऱ्यांना निवेदने देण्यात आली. परंतु आश्वासनांपलीकडे ठोस उपाययोजना करण्यास पालिकेतील सत्ताधारी मनसे व भाजप तसेच प्रशासन निष्क्रिय ठरले असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
शहरातील बहुतेक भागांत घंटागाडी वेळेवर येत नसल्याने नाइलाजास्तव नागरिक कुठेही कचरा टाकतात. कचऱ्यांचे ढीग साचून डासांचा उपद्रव वाढत जातो. परिणामी परिसरात आजार फैलावतात. डासांचा उपद्रव दूर करण्यासाठी औषधांची फवारणी सर्वत्र होत नाही. अनेक धूर फवारणी यंत्रे गोदामात पडून असून त्यांचा उपयोग करण्यात येत नाही. स्वच्छता निरीक्षक कोणत्याही विभागात फिरकत नसल्याने इतर कर्मचाऱ्यांचे फावते आणि त्यांच्याकडून कामचुकारपणा वाढत जातो. स्वच्छता निरीक्षकाने कर्मचारी काम करतात किंवा नाही याची पाहणी करण्यासाठी अचानक कोणत्याही भागास भेट दिल्यास कर्मचारी कामाच्या बाबतीत दक्ष राहतील, असेही निवेदनात म्हटले आहे.
डेंग्यू, मलेरिया यासारखे आजार झपाटय़ाने फैलावत असून पालिका व खासगी रुग्णालयांमध्ये या आजाराचे रुग्ण वाढत आहेत. काही रुग्णांवर वेळीच उपचार न झाल्याने ते दगावले आहेत. डासांचे प्राबल्य वाढत असल्याने त्यांचे निर्मूलन करणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. शहरवासीयांना नवनिर्माणाचे स्वप्न दाखविणारे सत्ताधारी आणि पालिका प्रशासन या समस्येला तोंड देण्यासाठी कोणत्याही प्रकारची विशेष उपाययोजना करताना दिसून येत नाहीत. नळांद्वारे येणारे पाणी सुरुवातीस अर्धा तास दरुगधीयुक्त असते.
 शासनाने पालिका आयुक्तांना व प्रशासनाला निर्देश करून योग्य त्या उपाययोजनेच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी सोपल यांच्याकडे करण्यात आली आहे. निवेदन देताना आ. जयवंत जाधव, देवांग जानी, रामू जाधव, बाळासाहेब सोनवणे, प्रमोद बोरसे, संजय चव्हाण, चिन्मय गाढे, मधुकर मौले आदी उपस्थित होते.

Story img Loader