मराठा विद्या प्रसारक समाजाच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेचे उद्घाटन संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांच्या हस्ते झाले.
या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष खा. प्रताप सोनवणे, सभापती अ‍ॅड. नितीन ठाकरे, उपसभापती नाना दळवी, चिटणीस डॉ. सुनील ढिकले उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा व त्यांच्या सर्वागीण विकासासाठी हा सांस्कृतिक महोत्सव आयोजित केला जातो. खास करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना संधी मिळावी हा या स्पर्धेचा मूळ उद्देश असल्याचे नीलिमा पवार यांनी सांगितले. अ‍ॅड. ठाकरे यांनी अभ्यासाला खेळ व सांस्कृतिकतेची जोड मिळाल्यास व्यक्तिमत्त्व विकास वेगाने होतो असे नमूद केले. प्रास्तविक शिक्षणाधिकारी सी. डी. शिंदे यांनी केले. आभार सी. टी. साळवे यांनी मानले. महाअंतिम स्पर्धेत वैयक्तिक वाद्य वादन व वैयक्तिक गीतगायन स्पर्धेचे उद्घाटनही नीलिमा पवार आणि तबला वादक जयंत नाईक, नितीन पवार, हार्मोनियम वादक भक्ती बोरसे, शिक्षणाधिकारी सी. डी. शिंदे यांच्या उपस्थितीत झाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयश्री बस्ते व सविता जाधव यांनी केले.
‘बिटको गर्ल्स’चे आज बक्षीस वितरण
येथील वाय. डी. बिटको गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या शालेय क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन प्रभाकर कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. बक्षीस समारंभ आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू अनुराधा डोणगावकर यांच्या हस्ते उद्या, शुक्रवारी होणार आहे.
शैक्षणिक जीवनात खेळाचे अत्यंत महत्त्व असून, ते आयुष्यभर उपयुक्त ठरते. वैयक्तिक मूल्यमापनासाठी खेळाचा प्रारंभ झाला असावा, असे मत त्यांनी व्यक्त केले. जास्तीतजास्त विद्यार्थिनींनी खेळात सहभाग नोंदवून प्रावीण्य मिळवले पाहिजे असे त्यांनी सांगितले. खेळात सातत्य, सराव व परिश्रम घेण्याची तयारी असली तर यश हमखास मिळते. आरोग्यही चांगले राहते, असे विचार त्यांनी मांडले. उद्घाटनप्रसंगी राज्यस्तरीय खेळाडू धनश्री मिठगर व प्राजक्ता पाटील यांनी क्रीडा ज्योत आणली. या वेळी उपमुख्याध्यापिका जयश्री पेंढारकर यांसह उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक तसेच वासंती पेठे, क्रीडा विभाग प्रमुख सुभाष महाजन, शगुफ्ता शेख, दिनेश जाधव आदी उपस्थित होते.

चांदोरी महाविद्यालयाजवळ बस थांबा मंजूर
येथील क. का. वाघ शिक्षण संस्थेच्या चांदोरी येथील महाविद्यालयासाठी राज्य परिवहन मंडळाने विनंती बस थांबा मंजूर केला असून शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष काशिनाथ टर्ले, प्राचार्य प्रा. संतोष वाघ यांच्या हस्ते ‘विनंती बस थांबा’ फलकाचे उद्घाटन करण्यात आले.
नाशिक व लासलगाव आगाराचे व्यवस्थापक तसेच काशिनाथ टर्ले यांच्या प्रयत्नामुळे या थांब्यास मान्यता मिळाली. चालक व वाहक यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सहकार्य करण्याच्या भावनेने थांब्यावर नियमितपणे बस थांबवावी व विद्यार्थ्यांनीही सुरक्षिततेच्या दृष्टीने बसनेच प्रवास करावा, असे आवाहन प्राचार्य प्रा. संतोष वाघ यांनी केले आहे.

वैशंपायन महाविद्यालयात क्रीडा महोत्सव
येथील दि न्यू एज्युकेशन इन्स्टिटय़ूट संचालित वैशंपायन महाविद्यालयात वार्षिक क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा उत्साहात झाल्या.
दोन दिवस चाललेल्या या स्पर्धामध्ये विद्यार्थ्यांनी विविध कौशल्ये दाखवून पारितोषिके मिळविली. क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन समन्वयक प्रा. अनिल महाजन यांच्या हस्ते तर प्रा. रवींद्र कदम यांच्या हस्ते सांस्कृतिक स्पर्धाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन प्रा. भास्कर कविश्वर, प्रा. पंकज अहिरे यांनी केले. आभार प्रा. स्मिता निकम यांनी मानले.
गोळा फेकमध्ये नामदेव निंबेकर (प्रथम), हेमराज कुंभार (द्वितीय), प्रभावी भोये (प्रथम), अश्विनी चव्हाण (द्वितीय), धावण्यात व्यंकटराव देशमुख (प्रथम), मनोहर गायकवाड (द्वितीय), कोमल काथवटे (प्रथम), सुनयना सावळे (द्वितीय), संगीत खुर्चीमध्ये प्रतिभा देवरे (प्रथम), सुनयना साळवे (द्वितीय), पुष्परचनामध्ये सपना चौधरी (प्रथम), देवंगण गावित (द्वितीय), रांगोळीमध्ये योगिता कारवाल (प्रथम), वृषाली शेवाळे (द्वितीय) आले. सांस्कृतिक स्पर्धेत नृत्य- सुनयना साळवे (प्रथम), इंद्रप्रतापसिंग ठाकूर (द्वितीय), गायन- गणेश अहिरे (प्रथम), योगिता कारवाल (द्वितीय), काव्यवाचन – सपना चौधरी (प्रथम), सीमा यादव (द्वितीय) यांनी परितोषिक पटकावले. सूत्रसंचालन अक्षय जाधव व रोहित चव्हाण यांनी केले.
सावंत महाविद्यालयात स्पर्धा परीक्षेवर व्याख्यान
गोदावरी शिक्षण मंडळ संचालित येथील जी. डी. सावंत महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रांतर्गत स्पर्धा परीक्षेचे महत्त्व लक्षात घेऊन करिअर डेव्हलपमेंट अकॅडमीच्या सहकार्याने ‘स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी ?’ या विषयावर व्याख्यान झाले.
प्रमुख मार्गदर्शक प्रा. सायली वायदंडे यांनी स्पर्धा परीक्षेला कसे जामोरे जावे, परीक्षेची तयारी कशी करावी, एमपीएससी अंतर्गत कोणकोणत्या परीक्षा आयोजित केल्या जातात, त्याचे स्वरूप कसे असते, कोणत्या घटकाला किती गुण असतात, या विषयीचे अमूल्य मार्गदर्शन करताना आत्मविश्वास किती महत्त्वाचा असतो हेदेखील स्पष्ट केले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. एन. एच. रौंदळ यांनी सामाजिक उत्तरदायित्व फेडण्याची संधी सनदी सेवेतून मिळत असल्याने विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांकडे वळावे, असे आवाहन केले. सूत्रसंचालन स्पर्धा परीक्षा व व्यवसाय मार्गदर्शन केंद्राचे समन्वयक प्रा. सुनील कनकटे यांनी केले. आभार रूपाली धाकड यांनी मानले

सारडा कन्या विद्या मंदिरतर्फे पारितोषिक वितरण
येथील ना. ए. सोसायटी संचालित मा. रा. सारडा कन्या विद्या मंदिरच्या वतीने वार्षिक स्नेहसंमेलनात प्रथम पारितोषिक वितरण सोहळा शाळेची माजी विद्यार्थिनी अभिनेत्री नेहा जोशी-दातार यांच्या प्रमुख उपस्थितीत तर शाळा समितीचे अध्यक्ष रमेश देशमुख यांच्या अध्यतेखाली पार पडला.
या वेळी जोशी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शालेय जीवनात अभ्यासाबरोबर आपल्या आवडीचे छंद जोपासताना मोठे ध्येय व स्वप्न समोर ठेवून मार्गक्रमण करणे आवश्यक आहे. म्हणजेच जीवनात यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास बाळगा असे त्यांनी सांगितले. नेहा यांची वेदांगी पंढरपूरकर व वेदांगी कुलकर्णी या विद्यार्थिनींनी मुलाखत घेतली. मुलाखतीत नेहा यांनी दिलखुलासपणे शालेय जीवनातील विविध प्रसंगांची आठवण करून दिली. नाटक, अभिनय, गायन, विविध खेळ, वक्तृत्व स्पर्धा यात सातत्याने भाग घेऊन माझ्यातील सुप्त कलागुणांना शाळेने संधी दिल्याचे त्यांनी सांगितले. मुळातच घरातील वातावरण, आई-वडिलांचे प्रोत्साहन, विश्वास यामुळेच या क्षेत्रात आजवरचा प्रवास शक्य झाला. काम करताना आपण हट्टी असायला हवे, मात्र त्यामुळे भविष्यात रडण्याची वेळ यायला नको हेही लक्षात ठेवणे गरजेचे आहे. यशस्वी होण्यासाठी कष्ट करण्याची तयारी, प्रामाणिकपणा आणि जिद्द महत्त्वाची असते असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, मान्यवरांच्या  हस्ते वक्तृत्व, कथाकथन, समूहगीत, केशरचना, रांगोळी, मेहंदी, फुलांचा गालिचा, निबंध लेखन या स्पर्धामधील विजेत्यांना स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी शालेय समिती अध्यक्ष रमेश देशमुख, कार्यकारणी सदस्य पां. म. अकोलकर, मुख्याध्यापिका सरोजिनी तारापूरकर आदी मान्यवर उपस्थित होते. बक्षीस यादीचे वाचन वैष्णवी कविश्व, समृद्धी अहिरे यांनी केले.

बिटको महाविद्यालय मार्गदर्शन वर्ग
नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयातर्फे आयोजित सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट कार्यक्रमाचे उद्घाटन उपप्राचार्य डॉ. डी. जी. बेलगांवकर यांच्या हस्ते झाले. पुस्तकी वाचनासोबत प्रात्यक्षिक व व्यावहारिक ज्ञानाची योग्य सांगड घातल्यास अभ्यास अधिक सोपा होतो. उत्तम यश संपादन करता येते, असे बेलगावकर यांनी सांगितले. या वेळी मान्यवरांच्या हस्ते कॉमर्स असोसिएशनचेही उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन सोहळ्यानंतर मोनाली देशपांडे व श्रीकृष्ण देशपांडे यांनी आपत्ती व्यवस्थापन या विषयावर स्लाइड शो व प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य व्ही. पी. पगार होते. त्यांनी विद्यार्थ्यांना एस, क्यू ३, आर या त्रिसूत्रीचे पालन करण्याचे आवाहन केले. प्रा. एच. एल. सबनीस यांनी प्रास्ताविक केले तर प्रा. जयंत भाभे यांनी आभार मानले. दुसऱ्या सत्रात राजू चौधरी यांनी इलेक्ट्रॉनिक्स तर पी्रतम सूर्यवंशी यांनी वॉटर प्युरिफायरबाबत माहिती दिली. बँक ऑफ महाराष्ट्रचे विपणन अधिकारी मनोज खरे यांनी बँकेच्या विविध सेवा व कर्जपुरवठा योजनेसंबंधी माहिती दिली.
पुष्पावती रुंगटा कन्या विद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रम
नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या पुष्पावती रुंगटा कन्या विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. माजी विद्यार्थिनी वर्षां गायधनी व जयश्री अभोणकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. या वेळी विद्यार्थिनींनी बालगीते, शेतकरी, नृत्य व निसर्गगीते, सण व उत्सवावर आधारित नृत्य असे विविध लोककलांवर आधारित नृत्य सादर केले. विविध स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमास मुख्याध्यापिका मुग्धा कुलकर्णी, पर्यवेक्षिका स्वाती गलांडे आदी पदाधिकारी उपस्थित होते. संयुक्ता कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.    

Story img Loader