केंद्र सरकारने रेल्वेच्या प्रवासी भाडय़ात १४ टक्के तर माल वाहतुकीच्या भाडय़ात साडेसहा टक्के वाढ केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी मैदानात उतरले आणि मनमाड, नाशिकरोड व इगतपुरी येथे रेल्वे रोको करत काही काळ वाहतूक बंद पाडली. राज्यात सत्ताधारी असणाऱ्या दोन मित्रपक्षांमध्ये आंदोलनावरून अहमहमिका लागल्याचे पाहावयास मिळाले. काँग्रेसने तीन ठिकाणी आंदोलन करत राष्ट्रवादीच्या वरचढ ठरण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी आंदोलनस्थळी अर्थात रेल्वे स्थानकावर पोहोचू नये यासाठी पोलिसांनी रस्त्यातच त्यांना अटक केली. तरीदेखील स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांंनी १० ते १५ मिनिटे रेल्वे वाहतूक बंद पाडली. यामुळे चार रेल्वे गाडय़ांना विलंब झाला.
भाजपप्रणीत केंद्र सरकारने रेल्वेच्या प्रवासी भाडय़ात प्रचंड वाढ केल्यामुळे सर्वसामान्यांवर प्रचंड आर्थिक बोजा पडला असल्याची तक्रार करत काँग्रेस व राष्ट्रवादी या मित्रपक्षांनी स्वतंत्रपणे आंदोलन पुकारले आहे. रेल्वे दरवाढ लागू होण्याच्या दिवशी रेल्वे रोको आंदोलन करण्याचे काँग्रेसच्या जिल्हा शाखेने जाहीर केले. ही बाब लक्षात आल्यावर राष्ट्रवादीने तत्पूर्वीच मंगळवारी नाशिकरोड स्थानकावर रेल्वे रोको करून सर्वसामान्यांसाठी आपणही झगडत असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला.
काँग्रेसने बुधवारी मनमाड रेल्वे जंक्शन, नाशिकरोड व इगतपुरी स्थानकावर आंदोलनाचे नियोजन केले होते. मनमाड स्थानकावर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी सहभागी होणार होते. हे पदाधिकारी सकाळी मनमाडच्या दिशेने निघाले असतानाच पिंपळगाव टोलनाक्यावर पोलिसांनी त्यांची वाहने रोखली. पानगव्हाणे यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांना अटक करून पोलीस ठाण्यात आणण्यात आले. पाच ते सहा तास त्यांना पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्यात आले. पदाधिकारी येऊ शकणार नसल्याचे समजल्यानंतर शहराध्यक्ष अफजलभाई शेख यांच्या नेतृत्वाखाली सुमारे दीडशे ते दोनशे कार्यकर्त्यांनी मनमाड काँग्रेस कार्यालयापासून मोर्चा काढून मनमाड रेल्वे स्थानकावर धडक मारली. आंदोलकांनी फलाट क्रमांक तीनवर उभ्या असलेल्या गोवा-निजामुद्दीन एक्स्प्रेसचे इंजिन व रेल्वे रुळांवर ठिय्या दिला. घोषणाबाजीने स्थानक परिसर दणाणून गेला. रेल्वे सुरक्षा दलाने निदर्शने करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले. या आंदोलनामुळे गोवा एक्स्प्रेसला १२ मिनिटे उशीर झाला.
नाशिकरोड रेल्वे स्थानकावर काँग्रेसच्या शहराध्यक्षा अश्विनी बोरस्ते यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. रेल्वे दरवाढीच्या विरोधात घोषणा देत आंदोलकांनी तपोवन व काशी या दोन एक्स्प्रेस रोखून धरल्या. १५ ते ५० मिनिटानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत आंदोलकांना बाजूला हटविले.
इगतपुरी रेल्वे स्थानकावर शक्तिप्रदर्शन करत काँग्रेसने विदर्भ एक्स्प्रेस रोखली. रेल्वे दरवाढीमुळे महागाईत वाढ होऊन सामान्य नागरिक भरडला जाईल. ही दरवाढ तातडीने मागे घ्यावी, अशी मागणी करण्यात आली. रेल्वे दरवाढीच्या प्रश्नावरून जिल्ह्यात काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये चढाओढ सुरू असल्याचे अधोरेखित झाले.
रेल्वे दरवाढीविरोधात जिल्ह्यात काँग्रेसचे आंदोलन
केंद्र सरकारने रेल्वेच्या प्रवासी भाडय़ात १४ टक्के तर माल वाहतुकीच्या भाडय़ात साडेसहा टक्के वाढ केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी काँग्रेसचे
First published on: 26-06-2014 at 12:24 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nashik district congress protest against rail fare hike