जवळचे भाडे नाकारणाऱ्या रिक्षांची नोंदणी तसेच नियमापेक्षा अधिक प्रवासी बसविणाऱ्या रिक्षाचा परवाना रद्द करण्याची मागणी नाशिक जिल्हा ग्राहक पंचायतीने परिवहन विभाग आणि पोलीस आयुक्तांकडे केली आहे.शहरात रिक्षाचालकांकडून मन मानेल त्याप्रमाणे भाडे आकारणी करण्यात येत आहे. रिक्षात तीन प्रवासी बसविण्याचा नियम असतानाही ५ ते १० प्रवाशांना बसविले जाते. सर्व रिक्षांना प्रमाणित इलेक्ट्रॉनिक मीटर बसविण्यात यावे. महामार्ग, सीबीएस पंचवटी व ठक्कर बाजार येथे पुण्याच्या धर्तीवर ‘प्री-पेड’ रिक्षासेवा सुरू करावी, नवीन रिक्षांसाठी परवाना द्यावा, परवाना देताना रिक्षाचालकांकडून नियमानुसार सेवेचे हमीपत्र घ्यावे, सर्व रिक्षांमध्ये प्रमाणित प्रवास दरपत्रक लावण्याचे बंधनकारक करावे, वाहतूक पोलिसांनी प्रवाशांना ‘रिक्षा सेवा तक्रार कार्ड’ विनामूल्य उपलब्ध करावे, अशा मागण्या नाशिक जिल्हा ग्राहक पंचायतीचे विलास देवळे, सुहासिनी वाघमारे, कृष्णा गडकरी, अनिल नांदोडे यांनी केल्या आहेत.