प्रा. देवयानी फरांदे (नाशिक मध्य)
  विधान परिषदेचे माजी aसभापती  प्रा. ना. स. फरांदे यांची स्नुषा प्रा. देवयानी सुहास फरांदे या गेल्या ३० वर्षांहून अधिक काळापासून भाजपच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय आहेत. सामाजिक, शैक्षणिक तसेच राजकीय क्षेत्रात प्रभावीपणे काम करणाच्या शैलीमुळे नाशिक महापालिकेत त्या सलग तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत. या कालावधीत त्यांनी उपमहापौरपदाची धुरा नेटाने सांभाळली. शालेय जीवनात विविध स्पर्धामध्ये पारितोषिके पटकाविणाऱ्या प्रा. फरांदे यांनी विद्यार्थी मंडळाचे अध्यक्षपद सांभाळले. आदर्श विद्यार्थिनी या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. केटीएचएम महाविद्यालयात बी.एस्सी, पुणे विद्यापीठातून एम.एस्सी. (मायक्रोबायोलॉजी) शिक्षण घेतल्यानंतर त्या मविप्रच्या बी फार्मसी महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. या शिवाय, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून त्या पीएचडी करत आहेत. शिक्षण क्षेत्रात काम सुरू असतांना त्या पती सुहास फरांदे यांच्या सोबतीने राजकारणात सक्रिय झाल्या. १९९७ साली प्रथमच नगरसेवकपदाची निवडणूक लढविली आणि नगरसेविका झाल्या. तेव्हापासून त्यांनी राजकारणात कधी मागे वळून पाहिलेले नाही.  २०१२ मध्ये मनसेचे वारे असतांनाही प्रा. फरांदे यांनी प्रचंड मताधिक्याने विजय मिळवला. उपमहापौरपदी काम करताना त्यांनी घरपट्टी, पाणीपट्टी वाढ, घनकचरा व्यवस्थापन, गोदा प्रदुषणासह अन्य काही महत्वपूर्ण विषयांवर काम केले. त्यांच्या कामाचा आवाका लक्षात घेऊन भाजपने त्यांच्यावर प्रदेश महिला मोर्चाच्या जबाबदारीसह चिटणीसपद दिले. नऊ वर्ष त्यांनी ही जबाबदारी लिलया पार पाडत महिलांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडली. वुमेन्स फोरम आणि दुर्गा महिला बहुउद्देशीय विकास संस्थेची स्थापना करत प्रा. फरांदे यांनी महिलांना एक नवे व्यासपीठ खुले करून दिले.
सीbमा हिरे (नाशिक पश्चिम)
राजकारणात राहुनही शांतपणे आपले काम करणाऱ्या नगरसेविका अशी खरेतर सीमा हिरे यांची ओळख. आता त्या नाशिक पश्चिम मतदार संघाच्या आमदार झाल्या आहेत. कौटुंबिक राजकीय पाश्र्वभूमी लाभलेल्या हिरे या स्वत: वाणिज्य पदवीधर आहेत. सलग तीन वेळा नगरसेवक, भाजपचे प्रदेश चिटणीस, समर्थ महिला मंडळाच्या अध्यक्षा, इंडिपेंटन्स बँकेच्या उपाध्यक्ष, ग्रामोदय शिक्षण संस्थेच्या आजीव सदस्य आदींची जबाबदारी त्यांनी पेलली आहे. राज्यात भाजपच्या बांधणीत ज्या नेत्यांचा सहभाग होता, त्यापैकीच एक असलेले ज्येष्ठ नेते दिवंगत पोपटराव हिरे यांची सून आणि स्वामी समर्थ केंद्र दिंडोरीमार्फत राज्यात समर्थाच्या जीवनचरित्रावर व्याख्यान देणारे डॉ. यशवंत पाटील यांची कन्या सीमा हिरे. महापालिकेच्या प्रत्येक निवडणुकीत त्यांचे मताधिक्य वाढत गेले. वैविध्यपूर्ण विकास कामांची दखल घेऊन नाशिक सिटीझन फोरमने त्यांना आदर्श नगरसेविका पुरस्काराने सन्मानित केले. भाजपने सलग दोनवेळा पक्षाच्या प्रदेश चिटणीसपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. पक्षाच्या माध्यमातून केली जाणारी आंदोलने, सदस्य नोंदणी, मतदार नोंदणी, मोर्चे यात त्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. संघ परिवाराच्या नियमित उपक्रमांतही त्यांचा सहभाग असतो. सीमा हिरे यांचे पती महेश हे भाजप शहर उपाध्यक्षपदाची धूरा सांभाळत आहेत. विद्यार्थ्यांसाठी समर्थ अभ्यासिका, गो. ह. देशपांडे उद्यान वाचनालय, वृक्षवल्ली उद्यान, समर्थ जॉगिंग ट्रॅक, आजी-आजोबा उद्यान, समर्थ बालोद्यान, ज्येष्ठ नागरीक विरंगुळा केंद्र अशी अनेक नाविण्यपूर्ण कामे त्यांनी प्रभागात केली आहेत. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त आनंद मेळ्याचे आयोजन करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. सलग १२ वर्षांपासून हा उपक्रम अव्याहतपणे सुरू आहे.
बाळासाहेब सानप (नाशिक पूर्व)
cमूळचे दिंडोरी तालुक्यातील ढकांबे गावातील असणारे बाळासाहेब सानप यांनी नगरसेवक, उपमहापौर, महापौर अशा एक एक पायऱ्या चढत आता थेट विधानसभेत प्रवेश केला आहे. फारसे न बोलता आपल्या कामात रममाण राहणारे हे व्यक्तीमत्व. इयत्ता सातवीपर्यंत शिक्षण झालेले सानप हे शेती, दूध आणि बांधकाम व्यावसायातही सक्रिय आहेत. १९९७ पासून आजतागायत ते महापालिकेत नगरसेवक म्हणून कार्यरत आहेत. या कार्यकाळात त्यांच्यावर १९९८ मध्ये उपमहापौरपद तर २००४ मध्ये महापौरपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. महापालिकेत भाजपचे गटनेते म्हणूनही त्यांनी काही काळ काम पाहिले. राज्याच्या महापौर परिषदेचे उपाध्यक्षपदही त्यांनी भूषविले. वसंतराव नाईक शिक्षण संस्थेचे संचालकपदाची जबाबदारी त्यांनी एक तप सांभाळली. विविध सामाजिक उपक्रमासाठी त्यांनी सातत्याने पुढाकार घेतला. श्रीराम वाचनालयाची उभारणी, ४० वे महाराष्ट्र राज्यस्तरीय ग्रंथालय अधिवेशनाचे आयोजन, श्री संत ज्ञानेश्वर अभ्यासिकेची उभारणी आदींचा त्यात समावेश आहे. नाशिक शहर तालीम संघाचे कार्याध्यक्ष, संगीत विद्यालयाचे संस्थापक, वसंत व्याख्यानमालेचे सदस्य, श्री छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळाचे संस्थापक आदी संघटनांमध्ये त्यांचे काम अव्याहतपणे सुरू आहे. समाजातील गरीब मुलांसाठी महापालिकेच्या माध्यमातून त्यांनी श्री संत ज्ञानेश्वर अभ्यासिकेची उभारणी केली. या अभ्यासिकेचा आज ८०० हून अधिक विद्यार्थी लाभ घेतात. राजकारणात असुनही कोणत्याही वादात न पडता सर्वाशी सलोख्याचे संबंध राखून असणाऱ्या बाळासाहेबांची मतदारांनी विधानसभेसाठी निवड केली आहे.
योगेश घोलप (देवळाली)
dसलग पाच वेळा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करणारे माजीमंत्री बबन घोलप यांचे पुत्र योगेश यांनी पुन्हा एकदा मतदार संघावर घोलप घराण्याचे वर्चस्व कायम ठेवण्यात यश मिळवले आहे. अर्थात, वडिलांनी केलेली विकास कामे आणि राखलेला जनसंपर्क या घटकांनी योगेश यांच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली. न्यायालयीन शिक्षेमुळे घोलप यांचा निवडणूक लढविण्याचा मार्ग बंद झाला. प्रदीर्घ काळापासून या मतदारसंघाचे नेतृत्व त्यांनी केले होते. शिवसेनेने घोलप यांचा मुलगा योगेशला तिकीट दिले. वडिलांच्या मार्गदर्शनाखाली योगेशने शिवसेनेच्या युवा सेनेच्या विविध जबाबदाऱ्या आजवर सांभाळल्या आहेत. निवडणुकीच्या राजकारणात सक्रिय होण्याची संधी त्यांना विधानसभेच्या माध्यमातून मिळाली. शहरातील उर्वरित तीन मतदारसंघात भाजपची लाट असताना शिवसेनेने या मतदारसंघावर आपले वर्चस्व अबाधित राखले. वयाच्या अवघ्या ३३ व्या वर्षी आमदार होण्याचा बहुमान त्यांना मिळाला आहे. १९९० ते २०१४ या कालावधीत बबन घोलप यांनी देवळाली विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व केले. योगेशची बहिण नयना यांनी नाशिकचे महापौरपदही भूषविले. सामाजिक तसेच राजकीय संस्काराचे बाळकडू घरातून मिळाल्याने योगेशने सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी आदींच्या प्रश्नावर त्यांनी काम केले. हे करताना नागरी सोयी-सुविधा असणाऱ्या रस्ते, पिण्याचे पाणी, सभा मंडप, जलकुंभ, सामाजिक सभागृह, शेतीसाठी बारमाही पाणी याकडे लक्ष केंद्रीत केले. घोलप कुटूंबियांच्या पाठ पुराव्याने मतदार संघात वालदेवी, दुडगांव, अंजनेरी, गौतमी-गोदावरी, कश्यपी धरणे बांधण्यासाठी पुढाकारत पाणी प्रश्नावर महत्वाची भूमिका निभावली. याच धर्तीवर आमदार म्हणून काम करताना लेव्हीट मार्केटचा प्रश्न, भूमीगत वीज पुरवठा, पर्यायी रस्ता, रस्ता चौपदरीकरण, ग्रीन जीम, आदिवासी तसेच मागासवर्गीय लोकांसाठी घरकुल योजना आदीं प्रश्नांवर काम करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे.
अनिल कदम (निफाड)
eआपल्या जमदग्नी स्वभावाने सातत्याने चर्चेत आणि कधीकधी वादाच्या भोवऱ्यातही सापडणाऱ्या अनिल कदम यांच्यावर निफाडकरांनी पुन्हा एकदा विश्वास टाकला आहे. मुळचे ओझरचे असणाऱ्या कदम घराण्याला राजकीय पाश्र्वभूमी लाभलेली आहे. अनिल यांचे काका दिवंगत रावसाहेब कदम यांनी विधानसभेत या मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. रावसाहेब यांच्या अपघाती निधनानंतर मतदारसंघाची जबाबदारी त्यांची पत्नी मंदाकिनी कदम यांनी सांभाळली. घरातून राजकारणाचे बाळकडू मिळालेल्या अनिल यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून काम सुरू केले. जिल्हा परिषद सदस्य म्हणूनही त्यांनी जबाबदारी स्वीकारली. गतवेळी ते विधानसभा निवडणुकीत विजयी झाले. शेतकरी व सर्वसामान्यांच्या प्रश्नावर त्यांची आक्रमक आंदोलने चर्चेचा विषय ठरली. शेतीसाठी धरणातून पाण्याचे आवर्तन सोडणे, भारनियमन अशा अनेक प्रश्नांवर त्यांनी आंदोलने केली. मुंबई-आग्रा महामार्गावर टोल नाक्यावर कदम यांनी महिला कर्मचाऱ्यांशी घातलेल्या वादावरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. सातत्याने चर्चेत असणाऱ्या अनिल कदम यांची मतदारांनी पुन्हा निवड केली आहे. स्थानिक समस्यांसह गटातटाचे राजकारण करण्यासाठी निफाड तालुका प्रसिध्द आहे. या राजकारणात तालुक्यातील वरिष्ठ मंडळी कोणती भूमिका घेतात यास महत्व असून कदम यांच्या विजयास ही भूमिका सहाय्यभूत ठरल्याचे मानले जाते.
राजाभाऊ वाजे (सिन्नर)
fमागील विधानसभा निवडणुकीत अल्पमतांनी वडिलांना पराभूत व्हावे लागल्याची परतफेड यंदा सिन्नरचे शिवसेनेचे उमेदवार राजाभाऊ तथा पराग प्रकाश वाजे यांनी केली आहे. विडी कारखानदार ही वाजे कुटुंबियांची पाश्र्वभूमी. समाजकारण व राजकारणात रमलेल्या वाजे कुटुंबियांनी यापूर्वी तालुक्याचे प्रतिनिधीत्व केले आहे. राजाभाऊ यांचे आजोबा दिवंगत शंकरराव वाजे हे सिन्नरचे आमदार होते. आजी दिवंगत मधुराबाई वाजे यांनी महाराष्ट्रातील पहिल्या महिला नगराध्यक्ष म्हणून सिन्नर नगरपालिकेच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. इतकेच नव्हे तर, आजी दिवंगत रुक्मिणीबाई वाजे यांनी जिल्ह्यातील पहिला महिला आमदार होण्याचा मान सिन्नरला मिळवून दिला. राजाभाऊ यांचे वडील प्रकाश वाजे २००९ मध्ये शिवसेनेच्या तिकीटावर रिंगणात होते. अल्पमतांनी त्यांना पराभूत व्हावे लागले. वडिलांच्या पराभवाचे उट्टे राजाभाऊंनी या निवडणुकीत काढले. १४ डिसेंबर १९६५ रोजी जन्मलेले राजाभाऊ वाणिज्य शाखेचे पदवीधर आहेत. शेती आणि पेट्रोलपंप हा त्यांचा व्यवसाय. सामाजिक उपक्रमासाठी तालुक्यात सक्षम व्यासपीठ हवे म्हणून त्यांनी जनसेवा मंडळाची स्थापना केली. या माध्यमातून करिअर मार्गदर्शन, नामवंत वक्त्यांची व्याख्याने, रुग्णवाहिका, कृत्रिम अवयवांचे वितरण, अंत्यविधीसाठी वैकुंठरथाची मोफत सेवा, मृतदेह ठेवण्यासाठी शीत शवपेटीची मोफत सुविधा आदी उपक्रम राबविले जातात. लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे पतसंस्थेचे राजाभाऊ संस्थापक अध्यक्ष आहेत. डुबेरे गावात ऐतिहासिक वेशीची पुर्नबांधणी तसेच जिल्हा परिषद शाळेचे प्रवेशद्वाराचे बांधकाम अशा विविध कामात त्यांनी पुढाकार घेतला. आजारपण, अपघात अशा कोणत्याही संकटात मदतीसाठी धावणाऱ्या या कार्यकर्त्यांची सिन्नरकरांनी निवड केली आहे.
छगन भुजबळ (येवला)
gअतिशय चुरशीच्या निवडणुकीत सलग तिसऱ्यांचा येवलेकरांनी राष्ट्रवादीचे दिग्गज नेते छगन भुजबळ यांच्या गळ्यात विजयाची माळ घातली आहे. राजकारण कोळून प्यालेले हे व्यक्तीमत्व. काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांना दारूण पराभवास सामोरे जावे लागले होते. या पाश्र्वभूमीवर, ही निवडणूक भुजबळांसाठी अस्तित्वाची लढाई होती. त्यात ते विजयी झाले. नाशिक येथे जन्मलेल्या भुजबळ यांची खरी राजकीय कारकिर्द घडली ती मुंबईत व शिवसेनेत. मुंबई महापालिकेत १९७३ मध्ये ते नगरसेवक म्हणून निवडून गेले. मुंबई महापालिकेत विरोधी पक्षनेतेपद भूषविल्यानंतर सलग दोन वेळा ते महापौर झाले. मुंबई शहराच्या सौंदर्यीकरणासाठी विविध उपक्रम राबविण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. पुढील काळात शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन ते काँग्रेसमध्ये दाखल झाले. काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार यांचे नेतृत्व स्वीकारत भुजबळांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.  १९८५ व १९९० अशा दोनवेळा भुजबळ हे मुंबईतील माझगाव मतदारसंघातून ते विजयी झाले. राज्याचे महसूल, गृह, सार्वजनिक बांधकाम, पर्यटन अशा विविध विभागांच्या मंत्रीपदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे. मुंबईतील नायर हॉस्पिटल, प्रिन्स आगाखान हॉस्पिटल, व्हीजेटीआय यासारख्या सामाजिक संस्थांवर त्यांनी विश्वस्त काम काम केले आहे. मुंबई येथे मुंबई एज्युकेशन ट्रस्टची स्थापना करून संस्थेचा नाशिकपर्यंत विस्तार केला. महात्मा फुले समता परिषदेची स्थापना करून ओबीसींचे नेते म्हणून त्यांनी देशपातळीवर संघटन करण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक सदस्यांपैकी एक असणाऱ्या भुजबळ यांनी या पक्षाचे पहिले प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केले आहे. चित्रपट आणि क्रिकेट यांची आवड असणाऱ्या भुजबळांनी दैवत आणि नवरा-बायको या दोन मराठी चित्रपटांची निर्मिती केली आहे.
दीपिका चव्हाण (बागलाण)
hकाही दिवसांपूर्वी नेहमीप्रमाणे घरकामात व्यस्त असणाऱ्या दीपिका चव्हाण ऐनवेळच्या उमेदवार ठरूनही आज आमदार झाल्या आहेत. माजी आमदार संजय चव्हाण यांचे जात पडताळणीपत्र रद्द ठरविले गेल्यामुळे ऐनवेळी राष्ट्रवादीने त्यांची पत्नी दिपिका यांना उमेदवारी दिली. उमेदवारी अर्ज भरण्यापर्यंत दीपिका चव्हाण यांचे नांवही फारसे कोणाला ज्ञात नव्हते. परंतु, संजय चव्हाण यांचा जनसंपर्क, नियोजनबध्द प्रचार यंत्रणा आणि आमदारकीच्या काळात केलेली कामे ही पत्नी दीपिका यांच्या विजयात महत्वाचे भागीदार ठरले. चव्हाण कुटुंब तसे आधीपासून राजकारणात सक्रिय आहे. दीपिका चव्हाण यांच्या सासू सुलोचना चव्हाण या सटाण्या नगरपालिकेच्या अध्यक्षा आहेत. सासरे कांतीलाल चव्हाण सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. हॉटेल व पेट्रोलपंपचा व्यवसाय करणाऱ्या या कुटुंबाने त्या माध्यमातून लोकप्रतिनिधी असो वा नसो जनतेशी सातत्याने संपर्क राखला. २००४ ते ०९ या कालावधीत संजय चव्हाण यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले. इयत्ता बारावी उत्तीर्ण असलेल्या दीपिका यांच्याकडे राजकारणाचा तसा फारसा अनुभव नाही. घराची जबाबदारी सांभाळताना अचानक उमेदवारी स्वीकारावी लागली आणि कुटुंबियांचे प्रयत्न व जनतेच्या पाठबळाने त्या आमदार बनल्या आहेत.
निर्मला गावीत (इगतपुरी)
iकाँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीत न पडता सर्वाना सोबत घेऊन जनतेच्या प्रश्नांवर काम केल्याची पावती इगतपुरीवासीयांनी आ. निर्मला गावीत यांना सलग दुसऱ्यांदा निवडून दिली आहे. आ. गावित यांची कौटुंबिक पाश्र्वभूमी राजकीय आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व प्रदीर्घ काळ नंदुरबार  जिल्ह्यावर आपले वर्चस्व कायम ठेवणाऱ्या माणिकराव गावीत यांच्या निर्मला या कन्या आहेत. नाशिक महापालिकेत दोन वर्ष नगरसेविका म्हणूनही त्यांनी काम केले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने त्यांना इगतपुरी मतदारसंघातून उमेदवारी दिली. राजकारणातील अनुभवाच्या बळावर या मतदारसंघात त्यांनी विजय संपादीत केला होता. आदिवासीबहुल असलेल्या इगतपुरी-त्र्यंबकेश्वर पट्टय़ात मूलभूत समस्या व प्रश्न सोडविण्यावर त्यांनी भर दिला. पाणी, आरोग्य, शिक्षण या प्रश्नावर त्यांनी सातत्याने लढा दिला. स्त्री भ्रृणहत्येला अंकुश बसावा यासाठी मतदार संघात विविध उपक्रम राबविले. त्यांच्या कारकिर्दीत जलप्राधिकरणच्या विविध योजनांच्या कामाला मतदार संघात सुरूवात झाली. त्र्यंबक येथील आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्यादृष्टीने त्यांनी विविध विकासकामांचे नियोजन केले. पक्षाने महिला काँग्रेस अध्यक्षपदाची दिलेली जबाबदारी त्यांनी सांभाळली. विधानसभेत महिला व हक्क समितीचे अध्यक्ष, वन हक्क समितीचे सदस्य म्हणून काम पाहिले. ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे सदस्य म्हणून काम पाहताना त्यांनी पक्ष बांधणीकडे लक्ष केंद्रीत केले. महापालिकेत नगरसेविका असताना स्थायी समिती सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले. रेल्वे सुरक्षा मंडळावर सदस्य असणाऱ्या निर्मला गावित यांनी देवमोगरा माता सेवाभावी संस्थेची स्थापना करत त्या मार्फत सामाजिक उपक्रम राबवत आहेत.
डॉ. राहुल आहेर (चांदवड)
jविधानसभेच्या रिंगणात पहिल्या वेळी अपयश पदरी पडल्यानंतर दुसऱ्या वेळी मात्र डॉ. राहुल आहेर यांना यश मिळाले आहे. पेशाने डॉक्टर असलेल्या राहुल यांना राजकीय पाश्र्वभूमी लाभली आहे. माजीमंत्री डॉ. दौलतराव आहेर यांचे ते चिरंजीव. अस्थीरोग विषयात एम.एस. पदवी संपादन करून वैद्यकीय क्षेत्रातील कामास सुरुवात केली. राजकारणाच्या ओढीने त्यांनी वडिलांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या राजकीय कामाचाही श्रीगणेशा केला. वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवत डॉ. राहुल यांनी महापालिका निवडणुकीच्या राजकारणात सक्रिय होत नगरसेवकपदाची निवडणूक लढविली आणि ते विजयी झाले. सध्या ते गंगापूर रोड भागातील प्रभागाचे नगरसेवक आहेत. मुळचे देवळ्याचे असणाऱ्या आहेर कुटुंबियांचा परिसरात चांगला प्रभाव व जनसंपर्क आहे. या कारणास्तव भाजपने चांदवड विधानसभा मतदार संघातून त्यांना उमेदवारी दिली. मागील विधानसभा निवडणुकीत डॉ. राहुल यांनी नशिब अजमाविण्याचा प्रयत्न केला होता. नाशिक पश्चिम मतदारसंघात त्यांना पराभूत व्हावे लागले होते. पण, गतवेळी हुकलेली संधी त्यांनी यंदा प्राप्त केली आहे. सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रात आजवर त्यांनी विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. शताब्दी हॉस्पिटलचे संचालक, अस्थीरोग तज्ज्ञ, सुमन शताब्दी हॉस्पिटलचे संचालक ही जबाबदारी ते सांभाळत आहेत. राजलक्ष्मी सहकारी बँक, इंडियन मेडिकल असोसिएशन, कसमादे परिसर विकास मंडळ विठेवाडी देवळा, नाशिक अर्बन बँक्स असोसिएशन ते अध्यक्ष आहेत. तसेच, नाशिक अर्बन बँक्स असोसिएशनचे संचालक, शिवसत्य क्रीडा मंडळाचे कार्याध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले. या शिवाय राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियाना अंतर्गत गठित झालेल्या जिल्हा नियोजन समितीचे ते सदस्य आहेत. सामाजिक प्रश्नांवर काम करणाऱ्या जे.सी.आय.चे ते कार्यकारी सदस्य आहेत.
जिवा पांडू गावित (कळवण)
kप्रदीर्घ काळ सुरगाणा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या आणि पुनर्रचनेनंतर कळवण मतदार संघातून पराभूत व्हावे लागलेल्या माकपच्या जिवा पांडू गावित यांनी पुन्हा एकदा या मतदार संघावर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यात यश मिळविले. आदिवासींना त्यांच्या हक्काची जमीन मिळवून देण्यासाठी ते ५० वर्षांपासून अविरत लढा देत आहेत. कॉम्रेड नरेंद्र (नाना) मालुसरे यांनी आदिवासी भागात चळवळ बांधण्यास सुरुवात केली, तेव्हा त्या भागातून त्यांना मिळालेला कार्यकर्ता अशीही गावित यांची ओळख आहे. इंटपर्यंत शिक्षण झालेले गावित तरुणपणीच माकपकडे आकर्षित झाले. थोडी थोडकी नव्हे तर तब्बल सहा वेळा त्यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. या निकालाने त्यांना सातव्यांदा पुन्हा काम करण्याची संधी मिळाली आहे. आणीबाणीनंतरच्या निवडणुकीत गावित यांना कोणी पराभूत करू शकले नव्हते.
आदिवासी भागातील शेतीचे उत्पन्न वाढविण्यासाठी कोल्हापूर पध्दतीने बंधारे बांधणे, शेतीपर्यंत पाणी नेण्यासाठी कालवे तयार करण्याकडे प्राधान्यक्रमाने त्यांनी लक्ष दिले. घरपोहोच धान्य पुरवठा योजना त्यांनी आदिवासी भागात यशस्वीपणे राबविली. नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक म्हणून त्यांनी काम केले. आदर्श शिक्षण संस्थेची स्थापना करून हजारो आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. यंदाची निवडणूक धरून आतापर्यंत नऊ पैकी सात निवडणुकांमध्ये ते काम आणि जनसंपर्काच्या बळावर सातत्याने विजयी झाले आहेत.
आसिफ शेख (मालेगाव मध्य)
lप्रथमच आमदार झालेले ४० वर्षीय काँग्रेसचे आसिफ शेख हे माजी आमदार शेख रशिद यांचे सुपुत्र आहेत. पित्याच्या पावलावर पाऊल ठेऊन गेली २० वर्षे ते काँग्रेसमध्ये सक्रिय आहेत. सध्या त्यांच्याकडे काँग्रेसच्या मालेगाव शहराध्यक्षपदाची धुरा आहे. २००२ मध्ये प्रथमच ते  महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले होते. २००४ मध्ये पालिकेतील सत्ताधारी जनता दलात फूट पडल्यावर शेख यांना महापौर पदाची संधी चालून आली. अडीच वर्षे महापौर म्हणून काम करतांना त्यांनी आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटविला. मुस्लीम आरक्षण फोरम या संघटनेच्या माध्यमातून मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे यासाठी त्यांनी राज्यभर चळवळ उभारली होती. तेव्हा या आरक्षणाच्या मागणीकडे सत्ताधाऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी काढलेल्या मालेगाव ते मुंबई अशा पदयात्रेमुळे आसिफ शेख हे राज्यपातळीवर चर्चेत आले होते.
दादा भुसे (मालेगाव बा)
mतिसऱ्यांदा विजयी झालेल्या सेना आमदार दादा भुसे यांना कोणतीही राजकीय पाश्र्वभूमी नव्हती. स्वातंत्र्यसैनिक दगडू बयाजी भुसे यांचे सुपुत्र अशी त्यांची ओळख. स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदविका मिळविल्यावर काही काळ त्यांनी पाटबंधारे खात्यात नोकरी केली. नोकरीच्या काळात ठाणे येथे असताना दिवंगत सेना नेते आनंद दिघे यांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव पडला. पुढे सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन जाणता राजा या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी मालेगावातून समाजकार्य सुरू केले.
कालांतराने हिंदू नेता अशी त्यांची प्रतीमा पुढे आली. २००४ च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष लढतांना राष्ट्रवादीचे प्रशांत हिरे व भाजपचे प्रसाद हिरे या दोघा चुलत बंधूंना पराभूत करून त्यांनी सर्वानाच चकीत केले होते. आमदारकी मिळविल्यावर सेनेत दाखल झालेले भुसेंनी २००९ च्या निवडणुकीत ही जागा कायम राखण्यात यशस्वी झाले. आता तिसऱ्यांदा विजय मिळवतांना गतवेळच्या तुलनेत त्यांच्या मताधिक्यात सात हजारांनी वाढ झाली आहे. गेल्यावेळी त्यांना सुमारे एक लाख तर त्यांच्या विरोधकास सत्तर हजार मते पडली होती. आता त्यांना ८२ हजार तर विरोधकास ४५ हजार मते पडली आहेत. पन्नास वर्षीय भुसे यांना मतदार संघात असलेला दांडगा जनसंपर्क आणि तळागाळातील जनतेशी जुळलेली घट्ट नाळ या वैशिष्ठय़ांमुळे ‘हॅट्रिक’ करणे सहज सुलभ झाले.
पंकज भुजबळ (चांदवड)
अभियांत्रिकीचे पदव्युत्तर शिक्षण घेणारे पंकज भुजबळ सलग दुसऱ्यांदा विधानसभेत जाणार आहेत. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज हे शिक्षण संस्थेची जबाबदारी सांभाळतात. शेती हा त्यांचा व्यवसाय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून त्यांनी सदस्य व युवा कार्यकारिणीच्या कामात सहभाग नोंदविला. राष्ट्रवादी युवक काँग्रेस मुंबईचे उपाध्यक्षपदाची धुराही त्यांनी सांभाळली. मुंबई एज्युकेशन ट्रस्ट या संस्थेचे विश्वस्तपद ते सांभाळत आहेत. गरजु नागरिकांसाठी ग्रामीण विकास कार्यक्रम, गरीब व होतकरु तरुणांना मार्गदर्शन, महिला सबलीकरण तसेच व्यवसाय विषयक प्रशिक्षण कार्यक्रम असे उपक्रम त्यांनी राबविण्यासाठी पुढाकार घेतला.
श्री सिध्दीगणेश संस्था, भायखळा भाजीपाला मार्केट प्रिमायसेस सोसायटी, माझगाव सेवा सहकारी संस्था, शिवडी सेवा सहकारी संस्था या संस्थांचे ते सल्लागार म्हणून काम पाहतात. विद्यार्थी सेवा संघ, एसएससी सराव परीक्षा व विद्यार्थी मार्गदर्शन उपक्रम, माझगाव मुंबई विभागात आरोग्य व नेत्रज्ञान शिबीर व विविध सामाजिक उपक्रमांचे त्यांनी आयोजन केले. कोणत्याही निवडणुकीचा अनुभव नसताना गतवेळी ते नांदगाव विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले. अर्थात. वडिलांचा अनुभव त्यांच्या कामी आला. वाचन, संगीत, क्रिकेट, फुटबॉल व टेनिस यांची विशेष आवड असणाऱ्या पंकज यांच्याकडे नांदगावकरांनी पुन्हा मतदारसंघाची धुरा सोपविली आहे.f j i h g k l

Story img Loader