०   मंडलनिहाय होणार स्वयंचलित  केंद्रांची उभारणी
०   जळगाव, धुळे, नंदुरबारच्या प्रस्तावांना अंतिम रूप
बदलत्या हवामानाचा शेती उत्पन्नावर होणारा परिणाम लक्षात घेऊन कृषी विभागाने हाती घेतलेल्या मंडलनिहाय स्वयंचलीत हवामान केंद्र उभारण्याच्या मोहिमेतील पहिल्या टप्प्यात उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक वगळता जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यात संबंधित केंद्रांची जागा निश्चित झाली आहे. नाशिकमध्ये ८८ हवामान केंद्रांसाठी प्राथमिक पातळीवर जागा निश्चित झाली असली तरी त्यावर जिल्हा प्रशासनाच्या मान्यतेची मोहोर उमटलेली नाही. परिणामी, उर्वरित जिल्ह्यांचे अंतिम प्रस्ताव कृषी आयुक्तालयाकडे गेले असताना नाशिकचा प्रस्ताव प्राथमिक अवस्थेतच असल्याची बाब पुढे आली आहे.
काही वर्षांपासून हवामानात सातत्याने होणाऱ्या बदलाचा विपरित परिणाम शेतीवर होत आहे. कधी अवकाळी पावसाने पिकांचे  नुकसान होते तर कधी दुष्काळामुळे हा व्यवसाय कोलमडून पडतो. या प्रक्रियेत हवामानाची स्थिती व त्याची माहिती महत्वपूर्ण भूमिका निभावते. हे लक्षात घेऊन कृषी विभागाने संपूर्ण राज्यात मंडलनिहाय स्वयंचलीत हवामान केंद्र कार्यान्वित करण्याची संकल्पना मांडली आहे.
या योजनेतंर्गत उत्तर महाराष्ट्रात तब्बल २५० पेक्षा अधिक स्वयंचलीत हवामान केंद्रांची उभारणी केली जाणार आहे. त्यात नाशिक जिल्ह्यात ८८, जळगाव ८६, धुळे ३९ आणि नंदुरबार जिल्ह्यात ३६ केंद्रांचा समावेश असल्याची माहिती विभागीय कृषी कार्यालयाने दिली. नाशिक वगळता उर्वरित तिन्ही जिल्ह्यात केंद्रांसाठी लागणाऱ्या जागांची निश्चिती
झाली आहे.
केवळ नाशिक जिल्ह्यात ही प्रक्रिया प्राथमिक पातळीवर आहे. नाशिकमध्येही जागांची निश्चिती झाली असली तरी त्यास जिल्हा प्रशासनाकडून अद्याप अंतिम मान्यता मिळाली नसल्याने पुण्याच्या कृषी आयुक्तालयाकडे संबंधित केंद्रांचे प्रस्ताव पाठविताना त्या जागा तात्पुरत्या स्वरूपात गृहीत धरण्यात आल्याचे सूत्रांनी नमूद केले. यामुळे त्यात काही बदलही होऊ शकतात, असे संबंधितांकडून सांगण्यात आले.
मंडलनिहाय हवामान केंद्र उभारणी योजनेच्या माध्यमातून शेतीला लाभ होण्याबरोबर शासनालाही नुकसान भरपाई निश्चित करताना उपयोग होणार आहे. पावसाळ्यात जवळच्या एखाद्या भागात जोरदार पर्जन्यवृष्टी होते तर एखादा भाग पूर्णत: कोरडा राहतो. मंडलनिहाय हवामान केंद्र कार्यान्वित झाल्यानंतर शासनाला प्रत्येक मंडलातील हवामान व पावसाची अधिकृत माहिती उपलब्ध होईल. त्यावरून नुकसान भरपाई निश्चित करताना त्याचा उपयोग होईल, असे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. साधारणत: ४० किलोमीटर अंतरातील मंडलाच्या परिघातील हवामान विषयक नोंदी त्या त्या भागातील स्थानिक शेतकऱ्यांना समजू शकेल. तसेच ही माहिती इंटरनेटवर प्रत्येक तासात अपलोड करता येईल. अत्याधुनिक स्वरूपाच्या या केंद्रामार्फत तापमान, आद्र्रता, र्पजन्यमान, मातीचे तापमान, थंडीमुळे बागेतील पानांवर किती पाणी राहिले, आदी माहिती मिळणार आहे. शेतीचे नियोजन करताना शेतकऱ्यांना ही बाब महत्वपूर्ण ठरणार आहे.  नाशिक जिल्हा कृषी कार्यालयाकडून जागा निश्चित करण्यात आल्याचे सांगण्यात आले. परंतु, प्राथमिक पातळीवर निश्चित केलेल्या जागा देण्यास जिल्हा प्रशासनाकडून अंतिम मान्यता मिळणे बाकी आहे. या बाबत पाठविण्यात आलेल्या प्रस्तावांना कृषी विभागाने हिरवा कंदील दाखविल्यानंतर हवामान केंद्र उभारण्याच्या या प्रक्रियेस सुरूवात होणार आहे. तथापि, नाशिकची स्थिती लक्षात घेता उर्वरित जिल्ह्यांच्या तुलनेत तो पिछाडीवर पडतो की काय, अशी साशंकता व्यक्त होत आहे.    

Story img Loader