पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी म्हणजे गुरुवारी शासकीय कार्यालये, शहरातील विद्यालय-महाविद्यालये, विद्यापीठ, पोलीस ठाणे, न्यायालय, पर्यटन स्थळे आदी ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सुटीचा दिवस असूनही शासकीय अधिकारी व कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी दाखवलेली उत्स्फूर्तता चकित करणारी होती. एरवी जळमटलेल्या, कोंदट असलेल्या काही शासकीय वास्तूंना मोहिमेद्वारे वेगळीच झळाळी प्राप्त झाल्याचे दिसले. जिल्हाधिकारी कार्यालयात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. पण जमलेला कचरा कुठे कोपऱ्यात टाकून दे, तर कुठे पेटवून दे असेही प्रकार घडले.
महात्मा गांधींच्या ‘स्वच्छ भारत’ या स्वप्नपूर्तीच्या दिशेने पाऊल उचलण्यासाठी त्यांच्या जयंतीच्या दिवशी पंतप्रधानांनी स्वच्छता अभियानाची सुरुवात केली. शहर परिसरात त्यास शासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, सामाजिक संघटना व विद्यार्थी वर्गाचा प्रतिसाद मिळाला. या अभियानामुळे येथील बी. डी. भालेकर हायस्कूल परिसर घंटागाडी कर्मचारी संघटना तसेच शाळा विकास समिती यांच्यातर्फे स्वच्छ करण्यात आला. यावेळी सफाई कर्मचाऱ्यांनी शाळेचे तुंबलेले शौचालय स्वच्छ केले, शिवाय, इमारतीवरील पिंपळ आदी झाडांच्या फांद्या तोडून जिना व गच्ची स्वच्छ केली. प्रत्येक वर्गाची स्वच्छता करण्यात आली. विद्यार्थी, मुख्याध्यापक व निवृत्त शिक्षकांनी या मोहिमेत सहभाग नोंदविला. मात्र कायम सेवेतील शिक्षकांनी कार्यक्रमास दांडी मारली. अभियान सुरू असताना पालिकेचे आरोग्य अधिकारी, उपायुक्त, शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी यांनी पूर्वसूचना देऊनही शाळेकडे येण्याची तसदी घेतली नाही. शाळेचा बदललेला चेहेरामोहरा पाहून विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त करत ही मोहीम अशीच सुरू ठेवण्याचा संकल्प केला.
जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी आवारातील पालापाचोळा, कागदाचे कपटे उचलून गोळा केले. परिसर चकाचक केला. मात्र जमा झालेला सर्व कचरा एकाच ठिकाणी जमा करण्यात आला. दुसरीकडे काही कर्मचाऱ्यांनी जमविलेला कचरा जाळून विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. सातपूर-त्र्यंबक रस्त्यावरील नांदूरमध्यमेश्वर पालखेड पाटबंधारे विभागातील कर्मचाऱ्यांनी कार्यालयाच्या बाहेर वाढलेले गवत, झाडाच्या अस्ताव्यस्त पसरलेल्या फांद्या कापून स्वच्छता मोहीम राबविली. या ठिकाणी पालापाचोळा जाळण्याचा प्रयत्न झाला.
नाशिक सेंट्रल रोटरीच्यावतीने पांडवलेणी परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. पर्यटकांच्या अनास्थेमुळे परिसरास बकाल स्वरूप प्राप्त झाले होते. अभियानांतर्गत प्रकल्प समन्वयक प्रमोद गायकवाड, अध्यक्ष डॉ. आशीष चौरसिया आणि सचिव रुपेश झटकारे यांच्यासह रोटरीच्या पदाधिकारी तसेच सभासदांनी परिसरातून वेफर्स, डाळी, गुटख्याच्या पुडय़ा, शीतपेय व पाण्याच्या बाटल्या असा दोन पोती प्लास्टिक कचरा जमा केला. स्वच्छता मोहीम सुरू असताना तेथे येणारी मंडळी या सर्व कामाकडे तटस्थपणे बघत होती. काहींनी नावापुरते सहभाग दर्शवत आपले छायाचित्र फेसबुक तसेच व्हॉट्स अ‍ॅपवरही अपलोड केले. नाशिकरोड येथील चांडक बिटको महाविद्यालयात एनसीसी आणि एनएसएस विद्यार्थी सभा, कमवा व शिकाचे विद्यार्थी तसेच एचएससी व्होकेशनल विभाग यांच्यावतीने ‘स्वच्छता अभियानाचा’ श्रीगणेशा करण्यात आला. हे अभियान महाविद्यालयात वर्षभर सुरू ठेवण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी केला. आडगाव येथील मविप्रच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रांगणात भावी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्वच्छतेची शपथ घेत गांधीजींना अभिवादन केले. संस्थेच्या परिचर्या शिक्षण संस्था, भौतिकोपचार महाविद्यालयाच्यावतीने स्वच्छ भारत व व्यसनमुक्ती जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी स्वच्छता व व्यसनमुक्तीवर पथनाटय़ सादर केले.
‘असेही स्वच्छता अभियान’
नाशिक शहर व परिसरात गुरुवारी स्वच्छता अभियानाचा दणक्यात श्रीगणेशा झाला. शासकीय कर्मचाऱ्यांनी या कामात झोकून देत अस्ताव्यस्त पसरलेल्या झाडांच्या फांद्या कापण्यापासून ते हाती झाडू घेत रस्ता व कार्यालय परिसर स्वच्छ करण्याचे काम केले. मात्र, हा उत्साह काही तासांत मावळल्याने गोळा झालेला संपूर्ण कचरा एका बाजूला लोटण्यात आला. काही ठिकाणी जमलेला कचरा पेटवून त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न झाला. नाशिक सेंट्रल रोटरीच्यावतीने पांडवलेणी परिसरात स्वच्छता करण्यात आली. नांदगाव येथील शाळेच्या आवाराची विद्यार्थ्यांनी स्वच्छता केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा