आरोग्य विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा आणि लघु उद्योग भारतीचे अधिवेशन या निमित्ताने शुक्रवारी नाशिक नगरीत आलेल्या मुख्यमंत्र्यांसमोर प्रशासनाने सिंहस्थाची कामे किती युद्धपातळीवर सुरू आहेत याचा देखावा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री उपरोक्त कार्यक्रमांसाठी शहरातील ज्या मार्गावरून मार्गस्थ होतील, त्या त्या ठिकठिकाणी कामे सुरू असल्याचे दर्शविण्याचा प्रयत्न झाला. रस्त्यांचे डांबरीकरण, सुशोभीकरण, दुभाजक उभारणी, जलवाहिनीची कामे यासाठी उपरोक्त मार्गावर विविध यंत्रसामग्री दिमतीला घेत यंत्रणा अचानक कार्यप्रवण झाल्याचे पाहावयास मिळाले.
शुक्रवारी मुख्यमंत्री िदडोरी रस्त्यावर होणाऱ्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा तसेच गंगापूर रस्त्यालगतच्या पाइपलाइन रस्त्यावर होणाऱ्या लघु उद्योग भारतीच्या अधिवेशनास उपस्थित राहणार होते. हेलिकॉप्टरने आलेले मुख्यमंत्री रस्तेमार्गे शहरात भ्रमंती करणार होते. मुख्यमंत्र्यांचा उपरोक्त ठिकाणी जाणारा मार्ग लक्षात घेऊन पालिका यंत्रणेने सिंहस्थासाठी चाललेली कामे दाखविण्यासाठी एकच धडपड केली. याच दौऱ्यात सिंहस्थ आढावा बैठक होणार असल्याने प्रशासकीय यंत्रणांनी कामांचे भव्यदिव्य चित्र तयार करण्याचा प्रयत्न केला.
इतकेच नव्हे तर, आरोग्य विद्यापीठ ज्या दिंडोरी रस्त्यावर आहे, त्या रस्त्यावरील सर्व पथदीप भर दिवसा सुरू ठेवून मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्यात आले. गंगापूर रोड, मखमलाबाद आणि दिंडोरी रस्त्यावर एकाच वेळी अनेक कामे सुरू असल्याचे दिसत होते. अगदी काल-परवापर्यंत उपरोक्त भागात इतक्या युद्धपातळीवर काही कामे सुरू असल्याचे दिसत नव्हते. पण, शुक्रवारी अचानक ठिकठिकाणी अनेक कामे सुरू असल्याचे दृष्टिपथास पडले.
दिंडोरी रोडवरील विद्यापीठाच्या मागील बाजूने मखमलाबाद गावातून एक रस्ता बाजार समितीच्या बाजूने चोपडा लॉन्सकडे येतो. हा रस्ता काहीसा कच्चा म्हणजे कुठे डांबरीकरण, तर कुठे खडी असा आहे. त्याची डागडुजी हे एकमेव ध्येय डोळ्यासमोर ठेवत यंत्रणा कामाला लागली. यासाठी जेसीबी, रोड रोलर, दुभाजक तसेच रस्ता साफ करणारे यंत्र, झाडू, केर उचलण्यासाठी गाडय़ा यांसह १५ ते २० प्रकारची यंत्रणा मागविण्यात आली. काही कर्मचारी रस्तावरील धुराळा साफ करत होते, काही दुभाजकावर जमा झालेली माती, काहींनी रस्त्यालगत किंवा दुभाजकावरील झाडांना पाणी टाकणे, दुभाजकांना रंगरंगोटी, रस्ता रुंदीकरणासाठी माप घेणे, कुठे डांबर टाकणे अशी कामे सुरू होती. शहरातील गर्दी टाळण्यासाठी मुख्यमंत्री या मार्गे मार्गस्थ झाले. दिंडोरी रस्त्यावर दुभाजक टाकण्याचे काम सुरू होते. कुंभमेळ्यासाठी चाललेली कामे अप्रत्यक्षपणे दर्शवत मुख्यमंत्र्यांना सुखद धक्का देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न लपून राहिला नाही.

Story img Loader