मागील कुंभमेळ्यात शहरात दाखल होणाऱ्या भाविकांचे अनोख्या पध्दतीने स्वागत करणाऱ्या नाशिक-पुणे रस्त्यावरील वाहतूक बेटास बारा वर्षांच्या वनवासानंतर तरी पुन्हा नव्याने झळाळी प्राप्त होणार की नाही याबद्दल साशंकता आहे. आगामी सिंहस्थाच्या पाश्र्वभूमीवर, द्वारका ते नाशिकरोडपर्यंतच्या विस्तारीकरणाच्या कामाचा लवकर श्रीगणेशा होणार आहे. पण, त्यात नासर्डी पुलालगतच्या या वाहतूक बेटास नवसंजीवनी मिळणार काय, असा स्थानिकांचा प्रश्न आहे.
आगामी कुंभमेळ्याच्या पाश्र्वभूमीवर, शहरातील जवळपास ४२ वाहतूक बेट क्रेडाई या बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेमार्फत विकसित करण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. त्यात नाशिक-पुणे रस्त्यावरील या बेटाचा समावेश नाही. कारण, त्याची जबाबदारी आधीच अन्य एका कंपनीने घेतली होती. परंतु, पुढील काळात संबंधित कंपनीकडून बेटाच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाले. तेव्हा महापालिकेने ही आपली जबाबदारी आहे असे मानले नाही. परिणामी, या वाहतूक बेटास आज अवकळा प्राप्त झाली आहे. कुंभमेळा लक्षात घेऊन महापालिकेने काही रखडलेल्या प्रकल्पांकडे आपला मोर्चा वळविला आहे. शहर सुशोभिकरणासाठी विविध वाहतूक बेटांना गतवैभव प्राप्त करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
शहराच्या सौंदर्यात भर पडावी, शहरांचे संस्कृती, वैशिष्ठय़ बाहेरील पर्यटक वा नागरिकांसमोर ठळकपणे समोर यावे तसेच मुख्यत: वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक बेटाची संकल्पना मांडली गेली. या उपक्रमात खासगी संस्थांची मदत घेऊन प्रमुख रस्ते आकर्षक करण्याचा प्रयत्न झाला. आजमितीस शहरात जवळपास ५० हुन अधिक वाहतुक बेट आहेत. त्यातील अवकळा प्राप्त झालेले नाशिक-पुणे रस्त्यावरील सपट हे एक वाहतूक बेट. द्वारका ते नाशिकरोड या मार्गाच्या विस्तारीकरणाचे काम लवकर सुरू होणार असल्याचे सुतोवाच विभागीय आयुक्तांनी केले आहे. विस्तारीकरणात बेटाचा विचार होईल की नाही याबद्दल साशंकता आहे. मागील कुंभमेळ्यात सपट परिवाराने नाशिकच्या पूर्व विभागाच्या प्रवेशद्वारावर म्हणजे नासर्डी पुलालगतच्या या बेटात चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या महिलांचा देखावा मांडला होता. पुढील एक-दोन वर्ष सपट परिवार आणि राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण यांच्याकडून त्याची नियमीत देखभाल झाली. पण, नंतर बेटाच्या देखभालीकडे सर्वानी पाठ फिरविल्यामुळे त्याची दुरावस्था झाली आहे. चहाचा मळा गायब होऊन तिथे अस्ताव्यस्त झाडे झुडपे पसरली आहेत. या ठिकाणी घाणीचे साम्राज्य अन् तुटलेले कथडे अशी स्थिती आहे. बेटाचे झालेले विद्रुपीकरण पाहिल्यास पर्यटकांसमोर नाशिकचा काय चेहरा जाणार, याचा विचार न केलेला बरा. या संदर्भात नगरसेवक सचिन मराठे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हा परिसर आधी आपल्या वॉर्डात नसल्याचे सांगितले. आगामी सर्वसाधारण सभेत सपटच्या वाहतूक बेट सुशोभिकरणाचे काम महापालिकेने स्वत:कडे घ्यावे, असा प्रस्ताव मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले. शहर अभियंता सुनील खुने यांनी मात्र वाहतूक बेट सुशोभिकरणाचे काम सपट आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे असल्याचे सांगितले. या बाबत संबंधितांना सूचना केली जाईल, असेही ते म्हणाले. राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण व खासगी कंपनी यांनी वाहतूक बेटाकडे दुर्लक्ष करूनही त्याच्या सुशोभीकरणाची जबाबदारी आजही महापालिका आपल्याकडे घेण्यास तयार नाही. यामुळे आगामी सिंहस्थात तरी हे बेट भाविकांचे दिमाखात स्वागत करणार की आपली अवकळा अधोरेखीत करणार हा प्रश्न अनुत्तरीत आहे.
नाशिक शहरातील नाशिक-पुणे रस्त्यावरील नासर्डी पुलाजवळील अवकळा प्राप्त झालेले वाहतूक बेट.
(छाया – रोहन सांबरेकर)