प्रशासकाची नियुक्ती झाल्यानंतर येथील नाशिक र्मचट्स बहुराज्यीय सहकारी बँकेच्या नफ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. मार्च २०१४ अखेर सर्व तरतुदीनंतर बँकेला ३८ कोटी ८० लाख रुपयांचा विक्रमी नफा झाला आहे. बँकेच्या स्थापनेपासून आतापर्यंत नफ्याचा हा विक्रम असून गतवर्षांच्या तुलनेत त्यामध्ये ५४ टक्के वाढ झाली.
याबाबतची माहिती बँकेचे प्रशासक जे. बी. भोरिया यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. नाशिक र्मचट्स बँकेचे संचालक मंडळ रिझव्‍‌र्ह बँकेने जानेवारी महिन्यात तडकाफडकी बरखास्त करून प्रशासकाची नियुक्ती केली होती. प्रशासकीय नियुक्ती झाल्यावर गोंधळाची स्थिती निर्माण होऊन बँकेतून पैसे काढण्याचा एकच सपाटा सुरू झाला. सुमारे पावणे दोन लाखहून अधिक सभासद असणाऱ्या नाशिक र्मचट्स बँकेवरील या कारवाईचा धसका घेऊन कोटय़वधी रुपये काढण्यात आले. पाच ते सहा दिवस चाललेला हा संभ्रम पुढे कमी झाला आणि ग्राहकांनाही बँकेची आर्थिक स्थिती मजबूत असल्याची जाणीव झाली. ठेवीदारांनी मुदतपूर्व ठेवी काढून व्याजाचे नुकसान करून घेतले. मात्र, त्यानंतर बँकेवर पूर्वीप्रमाणे विश्वास दाखवून पुढील काळात ठेवी ठेवून विश्वास कायम ठेवल्याचे भोरियांनी नमूद केले. नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षांत बँकेचा ढोबळ नफा ६२ कोटी ६० लाख रुपये आहे. बँकेच्या ठेवी १२२१ कोटी ९७ लाख आणि कर्ज ९४४ कोटी तीन लाख आहे. बँकेने ५४० कोटी ३१ लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे. मापदंडानुसार भांडवल पर्याप्तता प्रमाण किमान आठ टक्के आवश्यक आहे. मार्चअखेरीस नामकोचे हे प्रमाण २५.६५ टक्के इतके असून, आंतरराष्ट्रीय मानदंडाच्या तुलनेत हे प्रमाण अनेक पटींनी अधिक आहे. तसेच गतवर्षीप्रमाणे यंदाही निव्वळ एनपीएचे प्रमाण शून्य असल्याचे भोरिया यांनी सांगितले. कोअर बँकिंग प्रणालीच्या माध्यमातून बँकेच्या सर्व ८० शाखा व प्रशासकीय कार्यालय एकमेकांना जोडले गेले आहेत. अशी प्रणाली स्वीकारणारी उत्तर महाराष्ट्रातील नामको पहिली बँक असल्याचे भोरिया यांनी सांगितले.

Story img Loader