तालुक्यातील वाडी बुद्रुक येथे नियोजित नरसिंह साखर कारखान्यास परवानगीसाठी आयोजित ग्रामसभेत ग्रामस्थांनी गोंधळ घातल्याने सरपंच मीना आहेर यांना ग्रामसभा तहकूब करावी लागली.
अस्वली, एकलहरे आणि वाडी बुद्रुक या ग्रुपग्रामपंचायतींच्या हद्दीत खासगी मालकीचा नरसिंह साखर कारखाना आणि डांबर, खडीक्रेशर प्रकल्पास परवानगी द्यावी किंवा नाही, या विषयावर चर्चा करण्यासाठी वाडी बुद्रुक येथील ग्रुपग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात तहसीलदार अनिल पुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष ग्रामसभेचे आयोजन अभोणा पोलिसांच्या बंदोबस्तात करण्यात आले होते. प्रारंभी विधीतज्ज्ञ अमोल निकम यांनी कारखाना आणि प्रकल्पासंदर्भात माहिती दिली. कार्यक्षेत्रातील वसंतदादा सहकारी साखर कारखाना बंद पडल्याने शेतकऱ्यांना ऊस विक्रीसाठी इतर कारखान्यांचे उंबरठे झिजवावे लागत असून त्यांच्याकडून शेतकऱ्यांची पिळवणूक होत आहे. कार्यक्षेत्रात कारखाना झाल्यास ऊस विक्रीची समस्या दूर होईल. तसेच परिसरातील बेरोजगारांना रोजगार मिळेल. त्यामुळे ग्रामस्थांनी कारखाना होण्याच्या बाजूने मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले. तर, कारखाना व प्रकल्पाविरोधात मत मांडताना अभिमन्यू निकम यांनी कारखाना झाल्यास आपल्या शेतीला लागणारे हक्काचे पाणी कारखान्यास द्यावे लागेल.
परिणामी, बागायती शेती उद्ध्वस्त होऊन शेतकरी कर्जबाजारी होईल, अशी भीती व्यक्त केली. कारखान्यामुळे परिसरात वायू व पाणी प्रदूषित होऊन नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या सुरू होतील. संबंधितांना जर कारखानाच सुरू करावयाचा असेल तर त्यांनी बंद पडलेला वसंतदादा सहकारी कारखाना भाडेतत्वावर चालविण्यास घ्यावा, अशी सूचना अभिमन्यू निकंम यांनी केली.
यानंतर ग्रामसेवक रवींद्र ठाकरे यांनी मतदानासाठी ठराव मांडताच समर्थक आणि विरोधक यांनी एकच गोंधळ घातल्याने तहसीलदार पुरे, पोलीस निरीक्षक मधुकर गावित, उपनिरीक्षक कावेरी कमलाकर यांनी गोंधळ घालणाऱ्यांना समजाविण्याचा प्रयत्न केला. परंतु कोणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने सभेच्या अध्यक्षा सरपंच मीना आहेर यांनी ग्रामसभा तहकूब करण्याची घोषणा केली. दरम्यान, कळवण, देवळा, चांदवड, बागलाण, मालेगाव या पाच तालुक्यात कार्यक्षेत्र असलेला सहकारी तत्वावरील शेतकऱ्यांच्या मालकीचा वसंतदादा सहकारी साखर कारखाना असताना कळवण तालुक्यात खासगी मालकीचा कारखाना नको, अशी मागणी भाजपचे कळवण शहर अध्यक्ष निंबा पगार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा