सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पाश्र्वभूमीवर महापालिका आणि जिल्हा प्रशासनाकडून विकासकामांचा गवगवा करण्यात येत असला आणि त्यावर कोटय़वधी रुपये खर्च करण्यात येत असले तरी या कामांमध्ये नियोजनाचा अभाव असल्याचे पदोपदी जाणवत आहे. त्यामुळे कामांवर होणारा खर्च कितपत कारणी लागत आहे, याविषयीही शंका उपस्थित करण्यात येत असून शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे करण्यात येत असली तरी वेगवेगळ्या कामांसाठी पुन्हा रस्ते उखडले जात आहेत.
सिंहस्थात येणाऱ्या लाखो भाविकांच्या स्वागतासाठी नाशिक नगरी सजू लागली आहे. देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांसमोर नाशिकचं रूपडं सुंदर दिसावं म्हणून महापालिका आणि जिल्हा प्रशासनाकडून विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. भविष्यात पर्यटनाद्वारे होणारा ‘अर्थ’लाभ हाही एक दूरवरचा विचार त्यामागे आहे. नगरीच्या सौंदर्यीकरणासाठी प्रमुख रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आली आहे, तर काही रस्त्यांवर अजून हे काम सुरू आहे. रस्त्यांच्या या कामांमध्ये दर्जावर कितपत लक्ष  दिले जात आहे, याबद्दल अनेकांनी शंका उपस्थित केली आहे. दुरुस्ती झालेल्या रस्त्यांचे रंगरूप बदलल्याचे जाणवत असले तरी ते किती दिवस आकर्षक राहील, हे सांगता येणे अवघड असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यातच रस्त्यांची कामे करताना कोणत्याही प्रकारचे नियोजन नसल्याने विविध त्रुटी दिसून येत आहेत. कोणत्याही रस्त्याच्या दुरुस्तीचे काम करताना त्या रस्त्याशी संबंधित भुयारी गटार, भुयारी वायर किंवा पाणीपुरवठय़ासाठी पाइपलाइन टाकणे आदी कामे दुरुस्तीआधी होणे आवश्यक असते. म्हणजे दुरुस्तीनंतर रस्ता उखडण्याची गरज पडू नये. परंतु सध्या शहरात सुरू असलेल्या रस्ता दुरुस्तीच्या कामांमध्ये या साध्या गोष्टीचा प्रशासनाला विसर पडला आहे की काय, असे जाणवू लागले आहे.
अशोकस्तंभाजवळ पशुवैद्यकीय दवाखान्यासमोर रविवारी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने डांबरीकरण केलेला रस्ता उखडला. हेच काम या विभागाच्या वतीने डांबरीकरण करण्याआधी होऊ शकले असते. परंतु ते डांबरीकरण होण्याची वाट पाहात होते की काय, असेच वाटते. रस्ता उखडल्यामुळे त्या ठिकाणी जो खड्डा झाला आहे, तो संपूर्णपणे भरून रस्ता पूर्ववत करण्यात आला तरी त्या ठिकाणी खोलगट भाग कायम राहण्याची शक्यता आहे. हा एकप्रकारे ‘शेखचिल्ली’ कारभाराचा नमुना असून अशी अनेक उदाहरणे शहरात विविध ठिकाणी दिसतील. प्रशासनाच्या गलथान नियोजनाचा अशा कामात निश्चितच मोठा वाटा आहे. परंतु काही ठिकाणी तर नागरिकही चक्क काँक्रीटीकरण केलेला रस्ताही फोडण्यात मागेपुढे पाहात नाहीत. विद्युत जोडणी किंवा नळ जोडणी टाकावयाची असल्यास महापालिका प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता परस्पर रस्ता फोडून काम उरकून घेतले जाते. पावसाळ्यात मग त्याच जागेवर पाणी साचून खड्डे तयार होतात.
गंगापूर रस्ता हा शहरातील एक प्रमुख रस्ता. या रस्त्याचे रुंदीकरण आणि डांबरीकरण असे दुहेरी काम सध्या सुरू आहे. त्यापैकी रुंदीकरणाचे काम भोसला शाळेपासून गंगापूपर्यंत करण्यात येत आहे. याशिवाय या रस्त्यावर इतरत्र डांबरीकरण करण्यात येत आहे. परंतु या डांबरीकरणाचे स्वरूप अतिशय विचित्र असून अनेक ठिकाणी त्यात असमतोलपणा असल्याने वाहनधारकांनाही त्याचा त्रास होत आहे.
काही ठिकाणी रस्त्याच्या रुंदीकरणात कमी-अधिक प्रमाण आढळून येत असल्याने विशेषत: दुचाकीधारकांची अवस्था अतिशय बिकट होत आहे. रात्री तर हे संकट अधिकच भीषण वाटते. डोंगरे वसतिगृह चौफुलीपासून गंगापूर रस्त्यावरील प्रत्येक चौफुलीचा भाग ओबडधोबड झाला आहे. त्यामुळे या रस्त्यावरून दुचाकी चालविताना क्षणात स्थिरतेचा तर क्षणात खडखडाटाचा अनुभव येतो. विशेष म्हणजे या रस्त्याने शहरातील अनेक माजी नगरसेवक, दोन माजी महापौर, दोन विद्यमान आमदार ये-जा करत असतात. त्यांच्याकडूनही कधी रस्त्याच्या या विचित्र स्थितीबद्दल आवाज उठविण्यात आलेला नाही.