तालुक्यातील लखमापूर फाटा ते वरखेडा या रस्त्याचे डांबरीकरण निकृष्ट दर्जाचे होत असून काम होऊन चोवीस तासही होत नाही तोच खडी बाहेर येऊ लागल्याने रस्ता किती दिवस टिकणार, असा प्रश्न ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.
लखमापूर फाटा ते कादवा कारखानामार्गे जाऊळके वणी हा रस्ता अत्यंत वर्दळीचा असून या मार्गाने दररोज शेकडो वाहनांची ये-जा सुरू असते. त्यामुळे संपूर्ण रस्ता मजबूत होणे अत्यावश्यक आहे. ज्या ठिकाणी रस्त्याची अवस्था अतिशय बिकट आहे, त्या ठिकाणी रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येत आहे. कामाचा योग्य दर्जा राखला जात नसल्याने लागलीच रस्त्यावरील खडी उघडणे, रस्ता दुतर्फा खचणे, खड्डे निर्माण होणे असे प्रकार होत आहेत. वरखेंडा गावाजवळही अलीकडेच रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. जुन्या डांबरी रस्त्यावरच नव्याने डांबरीकरण उरकण्यात आले. सुरुवातीला वरवर पाहता डांबरीकरण अत्यंत चांगले झाल्याचे दिसत होते. परंतु अवघ्या काही महिन्यात रस्ता काही ठिकाणी खचू लागला आहे. तर परमोरी ते लखमापूर फाटा दरम्यान काही ठिकाणी सुरू असलेल्या डांबरीकरण कामात जुन्या डांबरी रस्त्यावर खडी पसरवत त्यावर डांबर टाकण्यात आले आहे. खडी पुरेशी दाबली जात नसल्याने आणि त्यावर कमी डांबर वापरले जात असल्याने तसेच घाईघाईने काम उरकण्यात येत असल्याने दुसऱ्याच दिवशी ठिकठिकाणी रस्त्यावरील खडी निखळू लागली आहे. रस्त्याच्या पायाचे काम चांगल्या दर्जाचे होत नसल्याने हा रस्ता पुढे किती दिवस तग धरणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. रस्त्याचे काम योग्य पद्धतीने न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. तसेच तालुक्यात सर्वत्र विकास कामे सुरू असताना सदर कामाच्या माहितीचे फलक अभावानेच दिसत आहेत. सर्व कामाच्या ठिकाणी कामासंदर्भात माहिती देणारे फलक उभे करावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.