तालुक्यातील निगडोळसारख्या आदिवासी भागात माध्यमिक शाळा सुरू होण्यासाठी २२ वर्षे संघर्ष केल्यानंतर आता गावकऱ्यांनी लोकवर्गणी जमा करून शाळेची इमारत उभी केली. निगडोळकरांच्या दातृत्वाचा आदर्श इतरांनी घ्यावा, असे आवाहन रयत शिक्षण संस्थेचे उत्तर महाराष्ट्र विभागीय सल्लागार समितीचे अध्यक्ष अरुण कडू पाटील यांनी केले आहे. तालुक्यातील निगडोळ येथील शरदरावजी पवार माध्यमिक विद्यालयाच्या इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून अ‍ॅड. भगीरथ शिंदे, कादवा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे, अ‍ॅड. एन. एम. आव्हाड आदी उपस्थित होते. अ‍ॅड. शिंदे यांनी आगामी वर्षांत अकरावी विज्ञान वर्ग सुरू करण्यासाठी संस्था सर्वतोपरी मदत करणार असून या शाळेच्या माध्यमातून परिसरातील आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी संस्था कटिबद्ध असल्याचे नमूद केले. गावकऱ्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल तसेच बबनराव मालसाने व दौलत मालसाने यांनी शाळेसाठी मोफत जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. शेटे यांनी गावकऱ्यांच्या जिद्दीचे कौतुक करत शाळेसाठी यापुढेही मदत केली जाईल, असे सांगितले. अ‍ॅड. एन. एम. आव्हाड, भास्कर भगरे, डी. एम. वडजे आदींचेही भाषण झाले. प्रास्ताविक शालेय समितीचे अध्यक्ष बबनराव मालसाने, मुख्याध्यापक जे. एस. थवील यांनी केले.
निगडोळ या आदिवासीबहुल भागात मुलींच्या शिक्षणासाठी सातवीनंतर विशेषत: खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची सोय नव्हती. अशा परिस्थितीत निगडोळ येथील बबनराव मालसाने यांनी गावकऱ्यांच्या सहभागातून ९ जून १९९२ रोजी माध्यमिक शाळा सुरू केली. या शाळेमुळे परिसरातील वाघाड, उमराळे, नळवाडी, नळवाडपाडा, पिंपळगाव धूम या भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय झाली. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांचे नाव शाळेला देत राज्यातील अग्रणी रयत शिक्षण संस्थेशी शाळा संलग्न केली. ही शाळा सुरुवातीपासून राजकारणाच्या फेऱ्यात अडकली. या शाळेला गावकीची जागा मिळू न देण्याबरोबरच शाळा सुरूच होऊ नये यासाठी मंजुरी मिळू नये, अनुदान मिळू नये यासाठी काहींनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. अनेक वेळा गावांनी ठराव करून शाळेसाठी देऊ केलेल्या जागेच्या प्रस्तावात अडथळे आणले गेले. कधी मारुती मंदिरात, कधी गोठय़ात, पडक्या घरात, पत्र्याच्या शेडमध्ये गोदामात तर कधी उघडय़ावर झाडाच्या सावलीत शाळा सुरू राहिली. निगडोळ गावातील सर्व मालसाने परिवारांनी एकत्र येत शिक्षकांच्या जेवणासह शालेय साहित्य पुरविण्याचे काम केले. कोणत्याही परिस्थितीत शाळा चालवायची आणि इमारत बांधायचीच असा चंग बांधला गेला. शेवटी गावाची जागा शासनाने शैक्षणिक संस्थेला देण्याचे बंद केल्यावर अखेर ज्यांनी ही शाळा सुरू केली, अनेक संकटे पेलली, संघर्ष केला. त्या बबनराव मालसाने यांनी आपले बंधू दौलतराव यांना आपली एक एकर जागा शाळेला दान देण्याची कल्पना सांगितली. दौलतराव मालसाने यांनीही त्यास होकार दिला. त्यामुळे शाळेला तब्बल २२ वर्षांनी जागा मिळाली.
संस्थेचे व्यवस्थापकीय मंचचे सदस्य अ‍ॅड. भगीरथ शिंदे यांना गावकऱ्यांनी इमारत बांधून देण्याची विनंती केली. त्यांनी तुम्ही ३० टक्के वाटा उचला. आपण संस्थेकडून इतर निधी मिळवून देतो, अशी ग्वाही दिली. गावकऱ्यांनी पुन्हा एकीने लोकवर्गणी जमा करत सुमारे १० लाख रुपये जमा केले. संस्थेच्या मदतीने शाळेची इमारत उभी राहिली. या शाळा उभारणीच्या बबनराव मालसाने यांच्या संघर्षांत त्यांना त्यांचे कुटुंबीय तसेच कादवा कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे, अ‍ॅड. एन. एम. आव्हाड, माजी सदस्य डी. एस. वडजे आदींसह गेली २३ वर्षे संस्थेचे विविध पदाधिकारी, पंचायत समितीचे सभापती, अधिकरी, शालेचे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. आजही या परिसरातील अनेक विद्यार्थ्यांना अकरावी, बारावीसह उच्च शिक्षणाची सोय उपलब्ध नसल्याने अनेकांना शिक्षण अर्धवट सोडावे लागते. अशा परिस्थितीत आता ही सोय येथे उपलब्ध करून देण्याचा बबनराव मालसाने यांचा मानस आहे.