नाशिक जिल्ह्य़ाची महत्त्वपूर्ण बाजारपेठ अशी ओळख असणाऱ्या घोटी शहरातील वाहतूक कोंडीचे ग्रहण सुटण्याचे कोणतेच चिन्ह दिसत नसून उलट दिवसेंदिवस ते अधिकच गडद होत आहे. शहरातील बाजार समितीत येणाऱ्या शेतकऱ्यांच्या वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी होत असल्याचे कारण पुढे करणाऱ्या पोलिसांच्या दुर्लक्षामुळेच ही कोंडी वाढत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. शहरातील भंडारदरा चौकातील कोंडी फोडण्यासाठी तत्कालीन पोलीस अधीक्षक प्रवीण पडवळ यांनी या ठिकाणी कायमस्वरूपी पोलीस तैनात करण्याचे आदेश दिले होते, परंतु त्याकडे पाठ फिरवण्यात आली असून विद्यमान पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी या आदेशाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी होत आहे.
घोटी येथे शनिवार व मंगळवार हे दोन दिवस आठवडे बाजाराचे असतात. याशिवाय दररोजचा बाजार असतोच. या बाजारात इगतपुरी तालुक्यासह त्र्यंबकेश्वर, अकोले, सिन्नर, शहापूर, मोखाडा या भागांतील नागरिक मोठय़ा संख्येने येत असतात. वीर वासुदेव राऊत आणि भंडारदरा हे शहरातील प्रमुख चौक. केंद्रीय मार्ग निधीतून शहरातून जाणाऱ्या जुन्या महामार्गाचे दूरध्वनी कार्यालय ते जैन मंदिर यादरम्यान डाव्या बाजूचे दुरुस्ती काम पूर्ण करण्यात आले आहे. तर दुसऱ्या बाजूने स्टेशन रस्त्यापासून जैन मंदिर चौकापर्यंत काम पूर्ण झालेले आहे. या काम पूर्ण झालेल्या रस्त्यावर भाजीपाला विक्रेते आपली दुकाने लावतात. काही दुकाने रस्त्याच्या कडेला, तर काही विक्रेते मध्यभागी बसतात. या रस्त्यालाच आपली हक्काची दुकाने समजून काही जण दुकानावर ताडपत्री बांधत असल्याने वाहतूक कोंडीत वाढ होते.शहरातील बैल बाजाराचे महिन्यापासून स्थलांतर करून ते शहराबाहेर हलविण्यात आले आहे. आठवडय़ापूर्वी बाजार समितीतील बाजाराचेही शहराबाहेर स्थलांतर करण्यात आले. स्थलांतरानंतर शहरातील वाहतूक कोंडी दूर होण्याची अपेक्षा असताना केवळ पोलिसांच्या दुर्लक्षामुळे आणि नियोजनाअभावी परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. घोटी शहर व हद्दीतील सुरक्षिततेची जबाबदारी असणाऱ्या घोटी पोलीस ठाण्याला चक्क चार अधिकारी आणि वाहतुकीवर नियंत्रणासाठी सहा वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्यात आली आहे. परंतु हे वाहतूक पोलीस केवळ शनिवारी उपस्थित राहात असल्याचे दिसते. या पोलिसांसमोरच व्यापाऱ्यांची वाहने बऱ्याच वेळा रस्त्यावर कित्येक तास उभी राहात असतात, परंतु त्यांचे संपूर्ण दुर्लक्ष होते. शहरातील सर्वाधिक वर्दळ असणाऱ्या भंडारदरा चौकात अवैध प्रवासी वाहने रस्त्यावरच थांबत असल्याने त्याचा वाहतुकीला अडथळा होतो. शहरातील वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी अवजड वाहनांना दिवसा शहरात प्रवेश नसावा, अवजड वाहने शहरात येऊ नयेत म्हणून गोठी उद्यान, रेल्वे फाटक, हॉटेल किनारा या शहराच्या प्रवेशद्वारांवर वाहतूक पोलीस तैनात करावेत, भाजीपाला विक्रीसाठी स्वतंत्र बाजारपेठेची गरज, स्वतंत्र रिक्षा व टॅक्सी स्थानक असावे, रस्त्यांवरील वाहनतळ हटवावे, असे उपाय करता येऊ शकतील.
संग्रहित लेख, दिनांक 19th May 2015 रोजी प्रकाशित
पोलिसांच्या बेफिकिरीमुळे घोटीला कोंडीचे ग्रहण
नाशिक जिल्ह्य़ाची महत्त्वपूर्ण बाजारपेठ अशी ओळख असणाऱ्या घोटी शहरातील वाहतूक कोंडीचे ग्रहण सुटण्याचे कोणतेच चिन्ह दिसत नसून उलट
First published on: 19-05-2015 at 06:51 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nashik news