परमेश्वराने पुरूषाला शरीर बळकट दिले आहे. तर, स्त्रीला मन खंबीर दिले आहे. महिलांनी मातृत्व जपलेच पाहिजे, असा सल्ला ज्येष्ठ समाजसेविका अ‍ॅड. अपर्णा रामतीर्थकर यांनी दिला आहे. येथील स्वराज्य फाऊंडेशनतर्फे आयोजित साई उत्सव कार्यक्रमात रामतीर्थकर यांचे ‘आई तु जागी हो’ या विषयावर व्याख्यान झाले.
आ. बाळासाहेब सानप हे कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. व्याख्यानाव्दारे मार्गदर्शन करताना रामतीर्थकर यांनी मानवी स्वभावाच्या विविध पैलुंवर प्रकाश टाकला. आजकाल स्त्री-पुरूष समानतेच्या गप्पा मारल्या जातात. परंतु आईने खरं सांगावे मुलीला आपण मुलासारखे वाढवू शकतो का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. जीन्स, टी शर्ट घातला तरी मुलींना मिशी येणार नाही. त्यामुळे महिलांनी मातृत्व जपलेच पाहिजे. आईच्या दुधाच्या धारा पिऊन साने गुरूजी, वीर सावरकर, सुकदेव, भगतसिंग, शिवाजी महाराज यांच्यासारखे महापुरूष घडले. शिक्षणासाठी कित्येक वर्ष घराबाहेर राहणाऱ्या आजकालच्या मुलींना स्वयंपाक येत नाही. मग त्या लग्नानंतर स्वयंपाक घरात कशा रमणार? तुम्ही डॉक्टर, इंजिनिअर, वकील, आमदार, राष्ट्रपती व्हा, अगदी अंतराळात जा, परंतु भाकरी आलीच पाहिजे. आजकाल इंटरनेटमुळे मुली कोणाशीही जोडल्या जातात आणि त्यातून गुन्ह्य़ांची संख्या वाढत आहे. घरगुती वादातून लगेच चार पाणी अर्ज करून नवऱ्याला न्यायालयात खेचतात. न्यायालयात जाऊन कोणाचे भले होत नाही, असा सल्लाही त्यांनी दिला. आपणही सोलापूरच्या न्यायालयात वकिली केली असती तर आपल्याही चार गाडय़ा झाल्या असत्या. थोडं समजून घेऊन संसार टिकवायला शिका. पैशाने प्रेम मिळत नसते. त्यासाठी मनात स्थान निर्माण करावे लागते, असे त्यांनी नमूद केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nashik news