प्रतिमापूजन, वृक्षारोपण, बुद्धवंदना अशा विविध कार्यक्रमांद्वारे शुक्रवारी नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. या दिवशी शाळा, राजकीय पक्ष, सामाजिक संघटना यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
गुरुवारी मध्यरात्रीच शिवाजी रस्त्यावरील डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याभोवती भीमसैनिकांनी गर्दी करून अभिवादन केले. ठिकठिकाणी मेणबत्ती फेरी काढण्यात आली. नाशिकरोड, मनमाड रेल्वे स्थानकांवर चैत्यभूमीवर जाणाऱ्या भीमसैनिकांसाठी अल्पोपाहाराची व्यवस्था करण्यात आली होती. नाशिक शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने डॉ. आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. शहराध्यक्ष शरद कोशिरे उपस्थित होते. संजय खैरनार यांनी बुद्धप्रार्थना केली.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आणि फाळके स्मारक कर्मचारी यांच्यातर्फे कार्यक्रम झाला. या वेळी नगरसेवक संजय साबळे व समता परिषदेचे शहर संघटक नाना साबळे उपस्थित होते. या वेळी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या सी. डी. ओ. मेरी हायस्कूल येथे मुख्याध्यापिका सी. एम. कुलकर्णी, उपमुख्याध्यापक यादव यांच्या हस्ते डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी बुद्धवंदना म्हटली. पर्यवेक्षिका मुग्धा काळकर, संस्था सहकार्यवाह व शाळा प्रतिनिधी दिलीप अहिरे यांनी डॉ. आंबेडकर यांच्या जीवन कार्याविषयी माहिती दिली. या वेळी विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील प्रसंगाचे नाटकातून सादरीकरण केले. मान्यवरांच्या हस्ते भित्तिपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले.
अमृतधाम येथील विडी कामगार वसाहतीतील महापालिकेच्या शाळा क्र. ६५ येथे मुख्याध्यापिका मंगला शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी केंद्रप्रमुख बाळासाहेब कडलग यांच्या हस्ते डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
गौतमी बुद्ध विहार, गौतमी महिला मंडळ आणि इंडो-तिबेटियन महासंघाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात धम्म सेविका शैला उघाडे यांच्या हस्ते डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
नाशिक जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी बँकेतर्फे डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस अध्यक्ष सुनील बच्छाव, उपाध्यक्ष प्रमोद निरगुडे यांनी पुष्पहार अर्पण केला. या वेळी संचालक व कर्मचारी उपस्थित होते.

    

Story img Loader