स्थावर मालमत्तेचे बनावट दस्तावेज तयार करून फसवणुकीचे प्रकार शहरात वाढत असतानाच दुसरीकडे न्यायप्रविष्ट प्रकरणाचे कारण पुढे करत पोलीस यंत्रणा जिवे मारण्याची धमकी देणाऱ्याविरोधात कारवाई करण्यात दिरंगाई करत असल्याची अनुभूती शहरातील वृध्द दाम्पत्याला घ्यावी लागत आहे. पोलीस ठाण्यातील यंत्रणा दाद देत नसल्याने या दांपत्याने पोलीस आयुक्तांची भेट घेतली. पोलीस आयुक्तांच्या निर्देशानुसार मग पोलीस उपायुक्तांसमोर पुन्हा कैफियत मांडली. परंतु, जवळपास सात महिन्यांचा कालावधी लोटूनही पोलीस यंत्रणा दखल घेत नसल्याने हे दाम्पत्य हतबल झाले असून भीतीच्या सावटाखाली वावरत आहे.
मागील तीन ते चार वर्षांत जमिनींचे भाव गगनाला भिडल्यानंतर या क्षेत्रात फसवणुकीचे प्रकार वाढीस लागल्याचे पोलीस दप्तरी दाखल झालेल्या अनेक गुन्ह्यांवरून लक्षात येते. मूळ मालकाच्या नावे बनावट दस्तावेज तयार करून परस्पर भूखंड विक्रीचे काही प्रकारही आधीच उघड झाले आहे. फसवणुकीच्या प्रकारांमध्ये गुंतलेल्या संशयितांना जेरबंद करूनही हे प्रकार नियंत्रणात आले नसल्याचे निदर्शनास येते. अशाच एका प्रकरणात पोलीस यंत्रणा तक्रारीची दखल घेत नसल्याची अनुभूती शैलजा व किशोर पाटील या दाम्पत्याला येत आहे. पेशाने शिक्षिका असणाऱ्या शैलजा व त्यांचे पती किशोर पाटील यांनी २००४ मध्ये सातपूर शिवारात गट क्रमांक ४५५/अ मध्ये शेतजमीन खरेदी केली होती. तेव्हापासून या जमिनीत शेती करतानाच पाटील यांनी तिथे छोटेखानी घर बांधले असल्याचे पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या जमिनीची बनावट कागदपत्रे तयार करून सचिन संतु गुंजाळ यांनी हे प्रकरण न्यायालयात नेले.
हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून या काळात शेतातील पिकांची पाहणी करण्यास गेले असताना सचिन संतु गुंजाळ व संतु गुंजाळ यांनी पुन्हा या ठिकाणी दिसल्यास जिवे मारण्याची धमकी दिल्याची बाब शैलजा पाटील यांनी सातपूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केली आहे. ऑगस्ट महिन्यात दिलेल्या या तक्रारीवर कारवाई केली जात नसल्याने या दाम्पत्याने पोलीस आयुक्तांचे दरवाजे ठोठावले. पोलीस आयुक्तांनी दिलेल्या सूचनेनुसार उपायुक्तांशी भेट घेऊन संपूर्ण घटनाक्रमाबद्दल माहिती दिली. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असल्याने कारवाई करता येणार नसल्याची भूमिका पोलीस यंत्रणेने घेतल्याचे पाटील यांच्याकडून सांगण्यात आले. संशयितांमधील एक जण राष्ट्रीय वडार सेवा समिती अध्यक्ष असा फलक मोटारीवर लावून फिरतो.
पोलीस यंत्रणा कारवाई करत नसल्याने आम्ही आपल्या शेतात व घरातही जाऊ शकत नसल्याचे पाटील यांनी सांगितले. जिवे मारण्याची धमकी देणाऱ्याविरुद्ध खुद्द पोलीस आयुक्तांनी निर्देश देऊनही कारवाई होत नसल्याने पाटील दाम्पत्य भीतीच्या सावटाखाली वावरत आहे.

Story img Loader