महापालिकेतील नरेंद्र सोनवणे यांच्या गटनेतेपदाला आव्हान देऊन तिसऱ्या आघाडीच्या बंडखोर गटाने गत महिन्यात झालेल्या स्थायी समितीच्या निवडणुकीत मर्जीतील लोकांची सदस्यपदी वर्णी लावून घेतल्यावर या गटाने सोनवणे यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली आहे. हा त्यांना अजून एक धक्का देण्याचा प्रयत्न मानला जात आहे. आपल्या मालकीच्या हॉटेलमध्ये अनधिकृत बांधकाम केल्याचा ठपका ठेऊन सोनवणे यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी या गटाने केली असून त्यासाठी आयुक्त अजित जाधव यांना निवेदनही देण्यात आले आहे.
पालिकेची निवडणूक झाल्यानंतर आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांच्या ‘तिसरा महाज’च्या १९ सदस्यांनी मोहंमद सुलतान मोहंमद हारूण यांची गटनेतेपदी निवड करून तशी विभागीय आयुक्तांकडे नोंदणी केली होती.
त्यानंतर तिसरा महाजचे १९, समाजवादी पक्षाचा एक सदस्य तसेच तिघा अपक्षांनी एकत्र येऊन ‘तिसरी आघाडी’ स्थापन केली. या गटाने गटनेतेपदी निवड केलेल्या नरेंद्र सोनवणे यांच्या नावाला विभागीय आयुक्तांनी मान्यता दिली होती. त्यानुसार इतके दिवस ते गटनेतेपदाचे कामकाज बघत होते.
दरम्यान, अंतर्गत मतभेंदामुळे आघाडीत दोन गट पडले होते. त्यातून स्थायी समितीच्या निवडणुकीच्यावेळी बंडखोर गटाने तिसरा महाजच्या गटनेतेपदी सुलतान हेच कायम असल्याचा दावा करत तिसऱ्या आघाडीला आव्हान दिले होते. महापौर ताहेरा शेख यांनी सुलतान गटाचा दावा मान्य करीत स्थायीसाठी त्यांनी सूचविलेली नावे अधिकृत असल्याचे जाहीर करून काँग्रेसविरोधी सूर आळवणाऱ्या मौलानांना अप्रत्यक्षरित्या शह दिला होता.
तिसऱ्या आघाडीचे गटनेते सोनवणे यांनी सूचविलेली नावे महापौरांनी नाकारल्यानंतर त्या विरोधातील वाद उच्च न्यायालयात गेला.
ही बाब न्यायप्रविष्ठ असतानाच सुलतान यांच्या गटाने सोनवणे व तिसऱ्या आघाडीला पुन्हा अडचणीत आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. सोनवणे यांच्या संगमेश्वर भागातील हॉटेलसाठी २००८ आणि २०१३ मध्ये महापालिकेकडून बांधकाम परवानगी घेण्यात आली असली तरी या परवानगीव्यतिरिक्त तेथे बांधकाम झाल्याची तक्रार यासंबंधी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
मंजुरी नसताना हॉटेललगत दुकान थाटण्यात आले. बांधकाम पूर्ण झाल्यावर पूर्णत्वाचा दाखला घेण्यात आला नसून त्यासाठी सोनवणे यांनी आपल्या पदाचा दुरोपयोग केल्याचा आरोपदेखील या निवेदनात करण्यात आला आहे.
पालिकेतील तिसऱ्या आघाडीला पुन्हा धक्का
महापालिकेतील नरेंद्र सोनवणे यांच्या गटनेतेपदाला आव्हान देऊन तिसऱ्या आघाडीच्या बंडखोर गटाने गत महिन्यात झालेल्या स्थायी समितीच्या निवडणुकीत मर्जीतील लोकांची सदस्यपदी
First published on: 22-08-2014 at 07:06 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nashik politics news