आगामी लोकसभा निवडणूक कोणकोणत्या मुद्यांवर लढविली जाईल याविषयी राजकीय पातळीवर बराच खल सुरू असला तरी नाशिक मतदारसंघात मात्र सिंहस्थ कुंभमेळा आणि त्याचे व्यवस्थापन हा कळीचा मुद्दा ठरणार आहे. कारण, तोच मुद्दा मांडून राष्ट्रवादीच्या ताब्यातील ही जागा खेचण्याची तयारी काँग्रेसच्या काही नेत्यांनी सुरू केल्यामुळे उभय पक्षात नव्या वादंगाला तोंड फुटले आहे.
मागील कुंभमेळ्याच्या नियोजनाचे संदर्भ देत ही जागा मिळविण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असला तरी राष्ट्रवादी त्यास राजी होण्याची चिन्हे सध्या तरी दिसत नाहीत. महापालिकेत सत्ताधारी मनसेने देखील सिंहस्थाच्या कामांना वेग दिला आहे. एकूणच आगामी निवडणुकीत नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा हाच सर्वच राजकीय पक्षांच्या प्रचार पत्रिकेवर ठळकपणे झळकणारा मुद्दा राहणार आहे.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागू होण्याची शक्यता असल्याने त्या दृष्टिकोनातून राजकीय पक्षांची व्युहरचना सुरू झाली आहे. त्यात २०१५-१६ मध्ये होणारा सिंहस्थ कुंभमेळा महत्वपूर्ण भूमिका बजावणार असल्याने स्थानिक राजकीय नेत्यांनी त्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. नाशिक व त्र्यंबकेश्वर या ठिकाणी दर बारा वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा भरतो. नाशिक लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या या दोन्ही ठिकाणी कुंभमेळ्यात शाही पर्वणीच्या दिवशी किमान एक कोटी नागरिक उपस्थित राहतील असा अंदाज आहे. त्यातही नाशिक व त्र्यंबकेश्वरच्या शाही स्नानाच्या दोन तीथी एकाच दिवशी येत असल्याने त्या दिवशी लाखो भाविक दोन्ही ठिकाणी स्नानाचा अपूर्व योग साधण्याचा प्रयत्न करतील. यामुळे जनसागराचे व्यवस्थापन आणि जागेची मर्यादा यांसारख्या अनेक बाबी आगामी सिंहस्थात आव्हान ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सिंहस्थास केवळ दीड वर्षांचा कालावधी शिल्लक राहिल्याने त्या अनुषंगाने तातडीने विकास कामांचा श्रीगणेशा करून श्रेय लाटण्याचा प्रयत्न सर्वाकडून होत आहे.
या घडामोडी सुरू असतानाच मागील सिंहस्थातील नियोजन व व्यवस्थापनाचे संदर्भ देऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेली नाशिक लोकसभेची जागा काँग्रेसला मिळावी, अशी मागणी माजी महापौर दशरथ पाटील यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याकडे केली. मित्रपक्षाच्या जागेवर हक्क सांगण्यासाठी कुंभमेळा आयुध बनले आहे. श्रेयाच्या शर्यतीत राष्ट्रवादीही मागे नाही. नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्याच्या विस्तारीकरणाचे काम सुरू झाल्यावर त्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ आणि खा. समीर भुजबळ यांच्या नावाने झळकणारे फलक हे त्याचे निदर्शक. पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून कुंभमेळ्यातील कामांचे श्रेय आपल्या पदरात पाडून घेण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे. तथापि एखाद्या कामासाठी केवळ निधी आणणे, काम करणे म्हणजे कुंभमेळा नाही. तर, जगभरातून येणाऱ्या लाखो भाविकांची योग्य व्यवस्था, नियोजन हे घटक महत्वाचे असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर, काँग्रेस व राष्ट्रवादीने सर्वेक्षण करुन या ठिकाणी कोणला जिंकण्याची संधी आहे याची चाचपणी करुन निर्णय घ्यावा अशी सूचना त्यांनी केली आहे. ज्याच्या बाजूने कौल असेल त्याच्यासाठी मतदारसंघ सोडण्यात यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे. महापालिकेतील सत्ताधारी मनसेने साधुग्राम, शहरातील अंतर्गत रस्त्यांचे विस्तारीकरण, पाणी पुरवठा व गोदावरी स्वच्छता, वाहतूक बेटांचे सुशोभिकरण आदी अनेक कामांच्या माध्यमातून सिंहस्थ श्रेयवादाच्या लढाईत आपण मागे पडणार नाही याची धडपड सुरू ठेवली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा