भूकंपाच्या धक्क्यानंतर पावसाचे आक्रमण सहन करत ओढवलेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी नेपाळचे नागरीक सज्ज होत असताना भूकंपाचा धक्का आणि त्यानंतर उडालेल्या हाहाकारामुळे थरकाप उडालेले नाशिकचे यात्रेकरू अजूनही सावरू शकलेले नाहीत. हे यात्रेकरू सुखरूप असले तरी भूकंपाचे निसर्गाने रेखाटलेले विद्रूप चित्र त्यांच्या काळजावर कायमचे कोरले गेले आहे. त्यांच्या या आठवणींचा ठाव घेण्याचा हा छोटासा प्रयत्न.
समोर लांबवर पसरलेल्या डोंगर रांगा. डोंगरांवरील हिरवाई डोळ्यांना सुखावत असताना अचानक जोरदार धक्का बसला. काहीतरी भयंकर झाल्याची जाणीव झाली आणि आम्ही सुन्न झालो..
बहुतेकांची हीच प्रतिक्रिया. या प्रतिक्रियेतून जाणवणारी अनामिक भीती या दुर्घटनेतून बचावलेल्या नाशिकच्या यात्रेकरूंचा पाठलाग सोडण्यास तयार नाही. येथील चौधरी यात्रा कंपनीच्या वतीने नेपाळ पर्यटनांसाठी २०० पेक्षा अधिक पर्यटक गेले असून ते सर्व सुखरूप आहेत. त्यापैकी ज्यांना या भूकंपाच्या धक्क्याची कोणतीच तीव्रता जाणवली नाही, अशा अनेकांनी पुढील प्रवासासाठी प्रस्थान केले. तर, काहींनी माघारी येण्यास सुरूवात केली आहे.
चौधरी यात्रा कंपनीकडून भारतातील काही मोजक्या शहरांसह नेपाळ पर्यटनांसाठी राज्यातून चार गाडय़ांमधून हे यात्रेकरू मागील आठवडय़ात रवाना झाले. त्यामध्ये नाशिकच्या १९ यात्रेकरूंचा समावेश आहे. त्यातील अनेकांनी परतीच्या प्रवासाला सुरूवात केली आहे. तर, भूकंपामुळे इतरांना काही दिवसांसाठी मुक्काम वाढविणे भाग पडले आहे. शनिवारी बसलेल्या भूकंपाच्या धक्क्याने क्षणार्धात सारे कसे होत्याचे नव्हते होते, याचा अनुभव या यात्रेकरूंसाठी काळजाचा थरकाप उडविणारा ठरला. या धक्क्यातून अनेक पर्यटक अद्याप बाहेर आलेले नसून त्यांनी थेट दार्जिलिंग, गंगटोक असा आपला मार्ग बदलून घेतला आहे.
नाशिकरोड येथील निवृत्ती घुले यांनी भूकंपाच्या या आपबितीचा अनुभव ‘नाशिक वृत्तान्त’कडे कथन केला. आम्ही १०-१२ मित्र उन्हाळी सुटीचा आनंद घेण्यासाठी नेपाळला जाण्याचे ठरविले. नियोजनानुसार प्रवास सुरू होता. शनिवारी सकाळी सीमारेषेजवळ आझमगड येथे चहा नाश्तासाठी शंकराच्या मंदिराच्या बाजूला असलेल्या एका हॉटेलमध्ये थांबलो. चेष्ठा मस्करी सुरू असताना अचानक कसला तरी आवाज झाला. काही कळण्याच्या आत आम्ही मागे-पुढे ढकललो गेलो. काय होतंय ते काहीच कळेनासे झाल्याने भीतीने इकडे-तिकडे पळण्यास सुरूवात केली. थोडय़ा वेळाने पुन्हा सर्वजण गाडीत बसले.
पुढे सीमारेषेवर गाडी पोहोचल्यावर कळले की भूकंप झाला असून पुढे जाता येणार नाही. भूकंप या शब्दानेच आम्ही सर्व हादरलो. म्हणजे आम्ही थोडय़ा वेळापूर्वी जो अनुभव घेतला, तो भूकंप होता तर..केवळ कल्पनेने पुन्हा घाबरण्यास झाले. त्यामुळे पुढे गाडी न नेण्याचा निर्णय घेण्यात आला.
रामनाथ मुठाळ यांच्या म्हणण्यानुसार गाडी नेपाळची सीमारेषा ओलांडण्याच्या तयारीत असतानाच जोरदार आवाज झाला. गाडी थांबली. आम्ही बाहेर निघालो. एखादा दहशतवादी हल्ला झाला असावा किंवा युध्दाचा सराव सुरू असावा, असे वाटले. परंतु अचानक अक्षरश: पायाखालची जमीन थरथरली. म लक्षात आले हा तर भूकंप आहे. आम्ही सीमारेषेवर होतो. नेपाळ सरकारच्या आदेशामुळे तसेच सुरक्षिततेच्या दृष्टिने आम्हाला सीमारेषेवरूनच मागे फिरण्याचा सल्ला दिला गेला. केवळ दैव बलवत्तर म्हणून वाचलो. सीमारेषा ओलांडली असती आणि नेपाळमध्ये गेलो असतो तर काय झाले असते या विचारानेच हृदयाची धडधड वाढते. आयुष्यात पहिल्यांदाच नैसर्गिक आपत्तीची भीषणता इतक्या जवळून अनुभवली असे रणमाळे यांनी नमूद केले. विजय शिकरे यांनी भूकंपामुळे सर्व प्रवासी वाहतूक ठप्प झाली. दूरदूरर्प्यत रस्त्यावर केवळ वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसत होत्या, असे सांगितले. हा प्रसंग आयुष्यभर स्मरणात राहील, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
दुसरीकडे दूरचित्रवाणीवर भूकंपामुळे झालेल्या हानीचे दृश्य पाहून यात्रेकरूंचे नाशिकमधील नातेवाईक चिंताक्रांत झाले होते. बहुतेकांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क होणेही बंद झाल्याने त्यांची नेमकी परिस्थिती काय आहे, याविषयी ठोस माहिती मिळत नव्हती. परंतु नंतर सर्वजण सुखरूप असल्याने आणि अनेकांनी नाशिककडे येण्यास प्रस्थान केल्याचा निरोप मिळाल्यानंतर नातेवाईकांचे चेहरे काहीसे फुलले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा