नाशिक पोलीस परीक्षेत्रीय क्रीडा स्पर्धाना मंगळवारपासून येथे सुरूवात होत आहे. चार डिसेंबपर्यंत या स्पर्धा सुरू राहणार असून औपचारिक उद्घाटन दोन डिसेंबर रोजी होणार आहे. साखळी पद्धतीने वेगवेगळ्या मैदानांवर या स्पर्धा होणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी दिली.
स्पर्धा यशस्वीतेसाठी राज्यस्तरीय संघ निवड समिती आणि नाशिक परीक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा २०१२ आयोजन समिती गठीत करण्यात आली आहे.
नाशिक परीक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक धनंजय कमलाकर यांच्या अध्यक्षतेखालील या समितीचे सचिव  प्रदीप देशपांडे हे असून सदस्यांमध्ये रावसाहेब शिंदे (अहमदनगर), प्रविणकुमार पडवळ (नाशिक ग्रामीण), एस. जयकुमार (जळगाव), डॉ. संजय अपरांती (नंदुरबार) या अधीक्षकांसह नाशिकचे पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल आणि अपर पोलीस अधीक्षक मोहन पवार यांचा समावेश आहे.
मैदानी खेळांची स्पर्धा राज्य राखीव पोलीस दलाच्या मैदानावर तर क्रीडा संकुलात फुटबॉलची स्पर्धा होईल. क्युमाईन क्लबवर  व्हॉलीबॉल, खो-खो स्पर्धा घेण्यात येईल. पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर अन्य खेळांच्या स्पर्धा होतील.
४२ किलोमीटर धावण्याची स्पर्धा नगावबारी ते सोनगीर पर्यंत होईल. हॉकी, फुटबॉल, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, वजन उचलणे, जलतरण, ज्युदो (पुरूष) व क्रॉसकंट्री या खेळांच्या स्पर्धा होणार असल्याने त्यांची पूर्वतयारी पूर्ण झाली आहे.
नाशिक पोलीस आयुक्तालय, नाशिक ग्रामीण, अहमदनगर, जळगाव, नंदुरबार व धुळे येथील पोलीस संघ धुळ्यात दाखल झाले आहेत, अशीही माहिती यावेळी देण्यात आली.

Story img Loader