कणकवली येथील वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या नाथ पै एकांकिका स्पर्धेचे स्वरूप यंदा पुनश्च बदलण्यात आले असून, २४ ते ३० जानेवारी २०१५ या कालावधीत होणाऱ्या या स्पर्धेत रसिकांना २०१४ सालातील सर्वोत्तम एकांकिका पाहण्याची संधी मिळणार आहे.
त्यासाठी १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१४ या वर्षभरात महाराष्ट्रातील निरनिराळ्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धामध्ये प्रथम विजेत्या एकांकिकांची स्पर्धा यंदापासून घेण्यात येणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांच्या बक्षीस रकमांमध्येही भरीव वाढ करण्यात आली असून प्रथम- २१ हजार, द्वितीय- ११ हजार आणि तृतीय विजेत्यास सात हजार रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. याखेरीज वैयक्तिक बक्षिसांच्या रकमेतही वाढ केली गेली आहे. खुल्या गटाच्या या स्पर्धेबरोबरच शालेय गटाच्या एकांकिका स्पर्धाही होणार आहेत. त्यांच्या बक्षीस रकमांतही अशीच वाढ करण्यात आली असून प्रथम विजेत्यास पाच हजार, द्वितीय- तीन हजार रुपये आणि तृतीय विजेत्यास दोन हजार रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. शालेय गटांचे प्रवेश अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख ५ जानेवारी, तर खुल्या गटासाठी १५ जानेवारी आहे. स्पर्धेसंबंधीच्या अधिक माहितीसाठी- कार्यवाह, वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान, कणकवली, द्वारा- स्टेटस फुटवेअर, मुंबई-गोवा महामार्ग, मु. पो. ता. कणकवली, जिल्हा- सिंधुदुर्ग, येथे संपर्क साधावा. मोबाइल संपर्क- शरद सावंत- ९४२२५८४०५४. ई-मेल : wapandit@gmail.com स्पर्धेचे प्रवेश अर्ज WWW.AcharekarPratishthan.Org या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा