ग्रामीण भागाची अस्सल लोककला असलेल्या भारुडावरील तिसरा राष्ट्रीय भारुड महोत्सव जिल्ह्य़ातील दरडवाडी येथे येत्या २ ते ४ मार्चदरम्यान होणार आहे. राष्ट्रीय नाटय़ विद्यालयाचे संचालक प्रा. वामन केंद्रे यांनी आपल्या जन्मगावी हा लोककलेचा जागर महोत्सव सुरू केला आहे. मुंबईतील रंगपीठ थिएटरच्या वतीने होणाऱ्या या महोत्सवात देशभरातील भारुड कलाकारांना निमंत्रित केले जाते.
मराठवाडय़ातील संतांनी समाज प्रबोधनासाठी अभंग, गवळणी व भारुडे रचली. भारुड हा लवचिक नाटय़मय प्रकार. भारुडाचे आगर असलेल्या मराठवाडय़ाच्या या कलेची सर्वदूर ओळख व्हावी आणि ही अस्सल ग्रामीण लोककला पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावी, यासाठी हा महोत्सव महत्त्वपूर्ण मानला जातो.
दरडवाडी (तालुका केज) येथील प्रा. वामन केंद्रे यांनी नाटय़सृष्टीत आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले. मागील वर्षी केंद्रे यांची राष्ट्रीय नाटय़ विद्यालयाच्या संचालकपदी निवड झाली. प्रा. केंद्रे यांचे वडील दिवंगत माधवराव केंद्रे हे प्रसिद्ध भारुडकार होते. त्यांच्या स्मरणार्थ ३ वर्षांपासून राष्ट्रीय भारुड महोत्सव आयोजित केला जातो. ग्रामीण भागाची अस्सल लोककला असलेल्या भारुडाचा देशातील हा एकमेव महोत्सव आहे. राज्यभरातील कलावंतांना यात निमंत्रित करण्यात येते. भारुड कला प्रकारातील व्यावसायिक, तसेच पारंपरिक कलाकारांना प्रोत्साहन देणारा हा महोत्सव आहे.
‘ग्रामीण भागातच खरा रंगमंच- प्रेक्षक’
भारुड ही ग्रामीण कलाकारांची रंगभूमी आहे. शेतकरी, कष्टकरी यांच्यासाठी विरंगुळा असावा आणि त्यातून समाज प्रबोधन व्हावे, हा यामागील उद्देश आहे. सोप्या, साध्या भाषेत रुपके देऊन उदयाला आलेली भारुडे ग्रामीण भागातच पाहायला मिळतात. ग्रामीण भागात यासाठी वेगळा साज लागत नाही. आजोबा माधवराव केंद्रे यांच्यापासूनच आमचे कुटुंब भारुडाच्या प्रेमात पडले. ग्रामीण भागाची नाळ लोककलेशी जोडली आहे. भारुड महोत्सव घेण्यासाठी मुंबई, बीड येथूनही मागणी होत होती. परंतु ग्रामीण भागातच भारुडाचा खरा रंगमंच आणि खरा प्रेक्षक असल्याची प्रतिक्रिया माधव केंद्रे यांचे नातू अशोक केंद्रे यांनी दिली.
बीडमध्ये २ मार्चपासून राष्ट्रीय भारुड महोत्सव
ग्रामीण भागाची अस्सल लोककला असलेल्या भारुडावरील तिसरा राष्ट्रीय भारुड महोत्सव जिल्ह्य़ातील दरडवाडी येथे येत्या २ ते ४ मार्चदरम्यान होणार आहे. राष्ट्रीय नाटय़ विद्यालयाचे संचालक प्रा. वामन केंद्रे यांनी आपल्या जन्मगावी हा लोककलेचा जागर महोत्सव सुरू केला आहे.
First published on: 21-02-2014 at 01:15 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: National bharud festival in beed from 2 march