‘कॉस्मोपॉलिटन’ मुंबईत मराठी, गुजराती, हिंदी, बंगाली, दाक्षिणात्य आदी विविध समाजांमध्ये सांस्कृतिक देवाणघेवाण जितक्या सहजपणे होते तशी ती धार्मिक बाबतीत होताना दिसत नाही. उदाहरणार्थ गुजराथ्यांचा घागरो-चोळी हा पेहराव जसा इतर मुंबईकरांनी स्वीकारला, तसे त्यांच्या गरबी पूजनाचे झाले नाही. दीप प्रज्वलन, प्रत्येक दिवशी माळा बांधणे, उपवास, जागरण आदी प्रकार प्रत्येक समाजात आढळून येत असले तरी प्रत्येक समाजाची पूजेची विशिष्ट पद्धती आहे. पण, या सर्वच समाजांमध्ये नवरात्रीनिमित्त केल्या जाणाऱ्या पूजाअर्चामध्ये एक सूत्र सामाईक आहे, ते म्हणजे सृजनाच्या पूजेचे.
गर्भाची पूजा
गुजराती बांधवांमध्ये नवरात्रीत पुजली जाणारी गरबी ही खरेतर ‘गर्भी’ (गर्भ) आहे. गर्भाला जशी छिद्रे असतात, तशी ती गरबीलाही असतात. आजकाल नाना पद्धतीने सजविलेल्या गरबी बाजारात मिळतात. गरबीत दिवा सतत तेवत ठेवला जातो. हा आत्मशक्तीचा दिवा. या दिव्याचा प्रकाश छिद्रातून बाहेर पडतो. हा प्रकाश म्हणजे आपल्या आत्मशक्तीचे तेज. ते पकडण्याच प्रयत्न जो तो करीत असतो. गुजराथ्यांमध्ये नवरात्रीत पूजा करण्याचे चार वेगवेगळे प्रकार आहे. उदाहरणार्थ पंच उपचार पद्धतीने १६ प्रकारांचे शोडषोपचार आहेत. त्यात मातेला सिंदूर, सुरमा, छत्र देणे या देवीच्या श्रृगांराकरिता कराव्या लागणाऱ्या प्रत्येक क्रियेकरिता १६ वेगवेगळे मंत्र उच्चारले जातात, अशी माहिती या समाजाचे पुरोहित नलीन भाई यांनी दिली. या गरबीभोवती फेर धरून नाचणे म्हणजे गरबा खेळणे. त्रिनषोत्चार या पूजेच्या प्रकारामध्ये ३०० वेगवेगळे मंत्र म्हटले जातात.
हिंदी समाजात कुंभाची पूजा
मराठी समाजात ज्याप्रमाणे नवरात्रात नऊ धान्यांची रुजवण केली जाते त्याप्रमाणे हिंदी समाजामध्ये पाच धान्यांची रुजवण करतात. एका पसरट भांडय़ात लाल माती किंवा वाळू घेऊन त्यात ही धान्ये पेरली जातात. एका कुंभात (घडा) जव, हळद-कुंकू वगैरे टाकून हा घडा मातीच्या मध्यभागी ठेवला जातो. अशा रितीने या कुंभात ३३ कोटी देव स्थापले जातात, असा समज आहे. ज्यांना शक्य असते, त्या कुटुंबांमध्ये पुरोहित नऊ दिवस येऊन पाठ म्हणतात. अन्यथा नऊ दिवस रात्री आणि दुपारी देवीसमोर बसून तिची आराधना केली तरी चालते. नऊ दिवस अखंडपणे दिवा तेवत राहिला पाहिजे. हिंदी समाजात कुटुंबातील प्रमुख व्यक्तीने नवरात्रात नऊ दिवस उपवास ठेवण्याची पद्धत आहे. या व्यक्तीला शक्य नसल्यास कुटुंबातील इतरांनी उपवास ठेवला तरी चालतो, असे पुरोहित मनोज पांडे यांनी सांगितले.
दुर्गापूजा
बंगाल्यांमध्ये दुर्गापूजा म्हणजे शक्तिपूजा. दुर्गापूजा ललिता पंचमीपासून सुरू होते. नवरात्र म्हणजे देवी दुर्गा आपल्या मुलांबाळांसह माहेरी येते. एखाद्या माहेरवाशीणीशी जशी बडदास्त ठेवली जाते तशी देवीची या काळात ठेवली जाते. म्हणूनच बंगाल्यांच्या पूजेत मध्यभागी देवीच्या बरोबर गणपती, कार्तिकेय अशी तिची मुलेबाळेही असतात. कुमारी पूजन आणि अष्टमी व नवमीच्या दिवशी होणारी संधी पूजा हे महत्त्वाचे. आठव्या दिवशी सवाष्ण बंगाली स्त्रिया पायात कुंकवाचा आळता रंगवितात. त्या दिवशी घरी येणाऱ्या प्रत्येक स्त्रीला भरभरून कुंकू दिले जाते. हे कुंकू तिने वर्षभर आपल्या भांगात घालायचे असते, असे बेंगाल क्लबचे प्रसून रक्षित यांनी सांगितले. गुजराथ्यांमध्ये जसा गरबा असतो तसा बंगाल्यांमध्ये धाक धुनुची दांडिया खेळला जातो. शंखध्वनी करणे हे देखील बंगाल्यांचे वैशिष्टय़. काही ठिकाणी शंखध्वनीच्या स्पर्धाही आयोजिल्या जातात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा