विधी अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वकिलीसाठी आवश्यक संभाषणकौशल्य, सभाधीटपणे कायद्याचा अर्थ व अन्वयार्थ याची मुद्देसूद मांडणी करता यावी, या उद्देशाने माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालयातर्फे तेरावी राष्ट्रीय अभिरूप न्यायालय स्पर्धा आयोजित केली आहे. शनिवारी (दि. २३) स्पर्धेचे तापडिया नाटय़मंदिरात उद्घाटन होणार आहे.
महाराष्ट्रासह दिल्ली, राजस्थान, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, ओरिसा, गुजरात या राज्यांतील विद्यार्थी स्पर्धेत सहभागी होतील. प्राथमिक फेरीसाठी उच्च न्यायालयातील विधिज्ञ परीक्षक आहेत. प्रथम फेरीत विजयी पाच संघांची निवड अंतिम फेरीसाठी होणार असून, रविवारी (दि. २४) सकाळी ८ वाजता अंतिम परीक्षण होणार आहे. न्या. पी. व्ही. हरदास, मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. अफझलपूरकर व आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती परीक्षक आहेत. पहिल्या फेरीसाठी भ्रष्टाचारावरील काल्पनिक खटला तयार केला असून त्यावर विद्यार्थ्यांना चर्चा-वादविवाद करावयाचा आहे. उद्या (शुक्रवारी) पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन स्पर्धा होईल. यात १२ स्पर्धक सादरीकरण, तर डॉ. एस. कंडास्वामी व डॉ. वाजपेयी मूल्यांकन करणार आहेत.